लातूर । प्रतिनिधी :-
कोरोनाच्या परिस्थितीत आधीच आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडलेला आणि आता दिवाळीच्या तोंडावर आर्थिक अडचणीत असणारा बांधकाम कामगार हा अद्यापही शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित असल्याने यंदाची बांधकाम कामगारांची दिवाळी ही अंधारातच जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी सांगितले.
दिवाळी जवळ आली की, सरकारी कर्मचारी बोनस आणि पगाराचा हिशोब करून दिवाळी कशी साजरी करावी याचा विचार करत असतात. मात्र असंघटीत कामगारांकडे दिवाळीचा झगमगाट दिसत नाही. रोजच्या मजुरीवरच त्यांची दिवाळी अवलंबून असते. दगडखाण कामगार दगडखाणीतच सामुदायिकरित्या दिवाळी साजरी करतात तेथे हातोड्याची पूजा करतात. मात्र त्यांच्या घराची सजावट होत नाही, फराळ नसतो, चांगले कपडे घालून त्यांचे मुले फटाके उडवत नाहीत असेही यावेळी श्रीकांत मुद्दे म्हणाले. महाराष्ट्र सरकारने कामगारांसाठी असलेली आरोग्य विमा योजना बंद केली. घरासाठी योग्य अनुदान दिले नाही. ६० वर्षांवरील कामगारांना महिना पाच हजार रूपये पेन्शन दिले नाही. वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला नाही. मंडळाच्या कामाचे खाजगीकरण केले. कामगारांच्या मुलीच्या लग्नाकरिता अनुदान दिले नाही. यामुळे राज्यभर खऱ्या कामगाराला न्यायापासून आणि लाभापासून वंचित ठेवले आहे. त्यातच सरकारने पाच हजार रूपयांची योजना बंद करून याही सरकारने कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलेले नाही.
वडार समाज हा मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार क्षेत्रात येत असल्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात या बांधकाम कामगार योजनांबाबत अनभिज्ञ आहे. गेल्या अनेक महिन्यापासून नवीन नोंदणी व पुनर्नोदणी होत नाही. त्यामुळे अनेक कामगार लाभापासून वंचित राहत आहेत. असा आरोप करीत यंदाच्या दिवाळीला १० हजार बोनस मिळाला पाहिजे. या आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी येणाऱ्या काळात तीव्र असा लढा देण्यार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भटक्या- विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी सांगितले.