shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अतिवृष्टी बाधित पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत ; महाविकास आघाडीने दिले प्रांताधिकार्‍यांना निवेदन

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १९ /   नगर तालुक्यातील अतिवृष्टी बाधित पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी महाविकास आघाडी नगर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र भगत, संदीप कोकाटे, गणेश वाडेकर आदींच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची भेट घेवून निवेदन दिले आहे .

 नगर तालुक्याला परतीच्या पावसाने खूप झोडपले आहे. बऱ्याचशा भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे . त्यामुळे नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. हाता तोंडाशी आलेली पिके पाण्यात सडत आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, तूर, कापूस, उडीद, बाजरी, कांदा आदींसह इतरही आणखी पिके पाण्यात अक्षरश: सडत आहेत. तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. बऱ्याचशा घरांची पडझड झालेली आहे. यामुळे अनेक संसार उघड्यावर आलेले आहेत.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील, वाळकी, जेऊर, निंबाळक, चास, देहरे, नालेगाव, कापूरवाडी या महसूल मंडलामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या त्या ठिकाणची पाहणी करून सरसकट पिकांचे पंचनामे करण्यात यावे. चिचोंडी पाटील परिसरामध्ये दिनांक १४ ऑक्टोबर रोजी ८५ मिलिमीटर तसेच दि. १६ ऑक्टोबर रोजी ७७ मिलिमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. अशाच प्रकारे सरासरी नगर तालुक्यामध्ये सर्वत्र पावसाचे प्रमाण आहे व शासन दरबारी ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस एका दिवसात झाला तर त्यास अतिवृष्टी असे संबोधले जाते. त्यामुळे आपण वरील बाबींची दखल घेऊन सरसकट पिकांचे पंचनामे तातडीने करावेत व बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, जेणेकरून शेतकर्यांची दिवाळी गोड होईल असे निवेदनात म्हटले आहे .
close