१९८० साली मी जेव्हा रत्नागिरीत नोकरीसाठी पोहोचलो तेव्हा माझा पगार जेमतेम रुपये ४५०/ इतकाच होता. काही दिवस दररोज दहा रुपये प्रमाणे एका हॉटेलात रहावे लागले तेव्हा विचार केला की ही नोकरी करावी की नाही कारण खर्चापेक्षा पगार कमी होता. दिवसांमागून दिवस जात होते आणि निवृत्तीच्या वेळी माझा पगार ५० हजाराहून अधिक झाला. जसा पगार वाढत होता तसे इतर वस्तूंचे भावदेखील वाढत होते. वस्तूचे भाव वाढतात म्हणून बोंबाबोंब होत होती आणि पगार वाढतात म्हणून त्याचे स्वागत होत होते.
लेबरकॉस्ट वाढते म्हणून वाढणाऱ्या पगाराची चर्चा कारखानदार करीत असतात. शेती उत्पादन फायद्यात नाही म्हणून शेतकरी तक्रार करीत असतात. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार व ज्ञानानुसार विचार करीत असतो पण महागाई कधीच थांबत नाही. याला महागाई म्हणायची की उत्पादन खर्चात होणारी नैसर्गिक वाढ याचाच विचार अर्थशास्त्राच्या परिभाषेतून करणे गरजेचे आहे.
जेव्हा आपण व्याजावर आधारित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करतो म्हणजे मोठ्या प्रमाणात कर्जाऊ रकमा घेऊन त्यातून व्यवसायाची उभारणी व मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याची परतफेड करावयाची हा विचार करतो किंवा हा विचार अमलात आणतो, तेव्हा नैसर्गिक तत्त्वानुसार जे व्याज दरमहा आपण कर्जावर भरीत असतो त्या पटीने क्षणाक्षणाला उत्पादनाचे मूल्य हे वाढतच राहते. बँकांचे कर्जाचा दर हा द.सा.द.शे. अठरा रुपये असेल तर आपण घेतलेले कर्ज हे त्या दराने निश्चितच वाढत जाणार. तेवढ्या रकमेची परतफेड आपल्याला करावी लागणार. ही कशी होणार? तर जी उत्पादने आपण तयार करणार आहोत ती उत्पादने वाढीव दराने विक्री करूनच परत करणार.
इथूनच महागाई हा विषय सुरू होतो. पण तो नैसर्गिक आहे हे आपण समजत नाही आणि उगाच बोंबाबोंब करत सुटतो.
नीट अभ्यास केला तर लक्षात येते की फक्त आकडे वाढलेले आहेत. पूर्वी आमदारांचे पेन्शन हे रुपये २५० होते ते आज किती झालेले आहे? वस्तुस्थिती तीच आहे. रुपयाचे मूल्य कमी झाले आहे एवढेच. पूर्वी चारशे रुपयात महिना आनंदाने जात होता. आज चारशे रुपयांच्या जागी चाळीस हजार रुपये पगार झाला आणि महिना आनंदाने जात आहे. तेव्हा जमिनीचे दर शेकड्यात तर घरांच्या किमती हजारात होत्या म्हणजे फारच कमी होत्या. आज त्याच किमती करोडोंच्या घरात पोहोचल्या आहेत. तेव्हा देखील सर्वसामान्य माणसे घर खरेदीसाठी कर्ज काढत होती व आज देखील कर्ज काढतच आहे. फक्त आकडे वाढले याचे कारण व्याजावर आधारित अर्थव्यवस्था.
तुलनेने आज व्याजदर कमी आहेत. पूर्वी साडेपाच/सहा वर्षांत बँकेत ठेवलेले पैसे दुप्पट होत असत. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. बचत खात्यावरील व्याज अत्यल्प झालेले आहे.
प्रत्येकाने हा विचार करायला हवा की महागाई वाढत आहे हे बोलणे तितकेसे प्रशस्त वाटत नाही. पूर्वी अल्प उत्पन्न होते व ते फक्त आवश्यक गरजांवर खर्च होत होते. आज गरजेशिवाय मौजमस्तीसाठी लागणाऱ्या घटकांवर वायफळ खर्च होत आहे. त्यामुळे जीवनावश्यक गरजा भागविताना ओढाताण होत आहे व आपण महागाई वाढते आहे म्हणून बोंब मारत आहोत. महागाई वाढत आहे याची बोंब मारणे हा एक स्वभाव धर्म झालेला आहे.
लेखक :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने, पुणे. ९८८१३७३५८५