आठव्या टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील अत्यंत महत्वाचा सामना म्हणून गणला जाणारा सामना दोन सख्खे शेजारी व पक्के हाडवैरी भारत व पाकिस्तान यांच्यात ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या मेलबोर्नच्या एमसीजी स्टेडियमवर जवळजवळ लाखभर प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भारत व पाक यांच्यात जी टस्सल अपेक्षित असते त्याच्या कितीतरी पट अटीतटीचा सामना झाला. क्षणाक्षणाला तराजू जसा हिंदोळके घेतो अगदी तसा सामना एकीकडून दुसरीकडे फिरत होता आणि शेवटच्या चेंडूवर एकदाचा भारताच्या झोळीत पडला आणि साडेतीन तास चाललेलं रहस्यनाट्य संपलं आणि समस्त भारतीयांच्या चेहऱ्यावर ऐन दिवाळीत आनंदाने मधूर हास्य उमटलं.
पावसाच्या सावटात सुरू झालेल्या सामन्याच्या सुरुवातीलाच कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून टिम इंडियाच्या मनोधैर्यात वाढ केली. राष्ट्रगीत गाताना कर्णधार रोहितचे डोळे पाणावले ते दृश्य हृदयद्रावक असेच होते. परंतु त्याही पेक्षा सुरुवात भारताला नवोदित डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदिपसिंगने मागच्या वर्षी पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने भारतीय फलंदाजीला दिला होता त्याहीपेक्षा मोठा धक्का पाकच्या फलंदाजीला दिला. त्याने पाकच्या फलंदाजीचे अधारस्तंभ असलेले सलामीवीर कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवानला स्वस्तात टिपून दिला.
पाकची फलंदाजी बाबर व रिझवान यांच्यावरच आहे याचा गोड गैरसमज भारतीयांना असल्याचं दिसलं. बाबर व रिझवानला लवकर टिपल्यानंतर पाकचा डाव लवकरच कोलमडेल हे भारतीयांचे मनसुबे इफ्तीखार व शान मसूदने खोटे ठरवून पाकिस्तानला समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली. पहिल्या १० षटकात पाकच्या ६० धावा होत्या. तेंव्हा पाकची धावसंख्या फुगणार नाही असे वाटत असताना मसूद - इफ्तीखार व आफ्रिदीने शेवटच्या दहा षटकात ९९ धावा जोडल्या.
या दरम्यान भारतीय क्षेत्ररक्षकांनी हातातले झेल सोडले. त्यातले दोन तर एकटया रविचंद्रन आश्विननेच सोडले. इतर क्षेत्ररक्षकांनीही धावा अडविताना फारसे प्रयत्न न केल्याने पाकचे फलंदाज सतत स्ट्राईक रोटेट करत होते, एकच्या ऐवजी दोन तर कधी दोन ऐवजी तीन धावा पळून काढत होते. शिवाय शेवटी शेवटी तर सुरूवातीला चांगला मारा करणारी गोलंदाजही भरकटल्याचे चित्र अतिशय विदारक वाटत होते. त्यामुळेच पाकला १५९ धावांपर्यंत पोहोचता आले अन्यथा १३५ च्या आतच त्यांचा डाव गुंडाळायला हवा होता. यामध्ये पाकला हलक्यात घेण्याची चुक भारताला महागात पडली व त्याचा त्रास धावांचा पाठलाग करताना भारताच्याच फलंदाजांना झाला. मात्र अर्शदिप, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार यांनी प्रभावी मारा केला. शमीने एक वर्षानंतर प्रथमच खेळताना आपल्यावर अन्याय होत असल्याचे दाखवून दिले.
विजयासाठी १६० धावांचा पाठलाग करताना मागच्या वर्षी दुबईत झालेल्या सामन्याप्रमाणे भारताची तारांबळ उडाली. ४ बाद ३१ अशी पावर प्लेमध्येच केविलवाणी अवस्था झाली तेंव्हा पाकिस्तान मोठा विजय मिळवून उलटफेर करतो की काय असे वाटत होते. मात्र फॉर्मात परतलेल्या माजी कर्णधार विराट कोहलीने अष्टपैलू हार्दिक पांङ्याच्या मदतीने शतकी भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु धावगती आवाक्याबाहेर जात असल्याने विजय दुरावत चालला होता. नेमका त्याच वेळी कोहलीने पाकच्या आफ्रिदी, रऊफ व नवाज यांना फोडून काढत शेवटच्या तीन षटकात ४८ धावा काढण्याचे अवघड कार्य पार पाडले. मोहम्मद नवाजचे शेवटचे षटक तर अतिशय नाट्यमय ठरले. पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्या बाद झाला. त्यानंतर नवाजने तीन वाईड व एक नोबॉल टाकून भारताचे कार्य सोपे केले. नवाजच्या दानशूरतेचा अचूक फायदा उठवत कोहलीने तुफानी फटकेबाजी करत भारताला विजयाच्या समीप नेले. त्याने ५३ चेंडूत ८२ धावा काढल्या खऱ्या मात्र हाणामारीच्या नादात दिनेश कार्तिक यष्टीचित झाल्यावर शेवटच्या चेंडूवर ऐन तणावात एक विजयी धाव काढण्याचे कठीण काम आश्विनवर आले. क्षेत्ररक्षण व गोलंदाजीत शिथील ठरलेल्या आश्विनने मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू टोलवून एक धाव काढून आपले सामन्यातले पाप धुवून काढत टिम इंडियाला पाकवर बदला घेणारा विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी भारताच्या डावाची सुरुवात गचाळ झाली. सराव सामन्यात तुफानी टोलेबाजी करणारा के एल राहुल शुन्यावर बाद झाला. तर कर्णधार रोहित आपली जबाबदारी ओळखून खेळला नाही तर नेतृत्वातही त्याच्या नेतृत्वगुणांची क्षेत्ररक्षणादरम्यान चांगलीच परिक्षा झाली. एरव्ही मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू टोलावण्याची क्षमता असलेला सुर्यकुमार यादव सलग चौथ्यांदा पाकविरूध्द अपयशी ठरल्याने भारताच्या अडचणीत मोठी वाढ झाली. सुर्याला आपल्या कुवतीला यापुढे न्याय देण्याची गरज आहे.
त्यानंतरचा फलंदाज अक्षर पटेल तिसऱ्या पंचाच्या चुकीचा बळी ठरला व भारताच्या अडचणीत वाढ झाली. यष्टीरक्षक रिझवानकडून चेंडू ऐवजी हॅंडग्लोवज स्टंप्सला आधी लागल्याचे रिप्लेत दिसत होते. मात्र तिसऱ्या पंचांच्या चुकीचा फटका टिम इंडियाला बसला.
भारताने हा सामना जिंकून विश्वजेतेपद मिळविण्याच्या दृष्टीने एक झेप घेतली असली तरी भारताला फलंदाजीबरोबर अंतिम टप्प्यात गोलंदाजीत मोठया सुधारणा कराव्या लागतील. तसेच क्षेत्ररक्षकांनाही मोठी मेहनत करावी लागेल अन्यथा भारताला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. कारण टि२० प्रकारात सावरायला वारंवार संधी मिळत नसते.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com