shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आठव्या टि ट्वेंटी स्पर्धेत उलटफेरांचा सिलसिला सुरूच !

सन २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टि२० विश्वचषक स्पर्धेनंतर जागतिक क्रिकेटमध्ये टि-२० या छोट्या पण चटपटीत प्रारूपाने जागतिक क्रिकेटवर जणू कब्जाच मिळविला ! आता त्या घटनेला पंधरा वर्ष पुर्ण झालीत. अनेक देशांत लिग क्रिकेटचे पेव फुटल्याने पारंपारीक कसोटी, वनडे या प्रकारांवर संकटाचे डोंगर उभे राहिले आहेत. काही देशांचे क्रिकेटपटू तर स्वतःच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा घवघवीत पैसा मिळवून देणाऱ्या खाजगी लिग स्पर्धांना प्राधान्य देऊ लागले आहेत.
           याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वेस्ट इंडिज व त्यांचे मतलबी खेळाडू हे होय. वेस्ट इंडिज हा मुळात हा एकसंघ सार्वभौम देश नाहीच. कॅरेबीयन बेटांवरच्या अनेक स्वतंत्र देशांचा मिळून हा फक्त क्रिकेटच्या खेळापुरताच एकत्र येणारा संघ आहे. यामुळे खेळाडूंचा देशप्रेमापेक्षा पैशावरच डोळा असल्याने वेस्ट इंडिज क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. 
        आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी काही निकष ठरविले जातात व त्या निकषांच्या आधारे संघ निवडले जातात. मागील काही वर्षांपासून वेस्ट इंडिज हे निकष पार करत नसल्याने त्यांच्यावर पात्रता फेरी खेळण्याची वेळ येत आहे.
          मात्र यावेळी प्रत्येकी दोन वेळच्या टि२० व वनडे क्रिकेटचे विजेतेपद मिळविलेल्या विंडीजवर पात्रता फेरीतच बाद होण्याची नामुष्की आली आहे. यामुळे कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत सहभाग नसण्याची विंडीजची ही पहिलीच वेळ आहे. विंडीजच्या पात्रता फेरीतील पराभवाने स्कॉटलंड व आयर्लंडचे नशिब फळफळले व त्यांना विश्वचषकाच्या बारा संघ असलेल्या मुख्य स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.
          विंडीज सारखीच परिस्थिती श्रीलंकेसाठीही निर्माण झाली होती मात्र त्यांनी नामिबीया विरूद्ध झालेल्या पात्रता फेरीतील पहिल्या फेरीतील पराभवानंतर स्वतःला सावरले व मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले. श्रीलंकेतील राजकीय व आर्थिक परिस्थिती जगाच्या चव्हाट्यावर आल्यानंतर श्रीलंकेत अराजकता माजली होती. परंतु आशिया चषकात अफगाणिस्तानविरूध्द सलामीच्या सामन्यात असाच लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर त्यांनी आपल्या खेळात अविश्वनीस सुधारणा आणून चक्क आशिया चषकाचे विजेतेपदच मिळविले होते. आताही श्रीलंका असा चमत्कार करतो का ? हा औत्सुक्याचा विषय बनला आहे.
            शनिवारी २२ ऑक्टोबरला प्रत्यक्ष मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. तेंव्हा मागच्याच वर्षी युएईत झालेल्या सातव्या टि ट्वेंटी विश्वचषकाचे विजेते ऑस्ट्रेलिया व उपविजेते न्युझिलंड यांच्यात सलामीचा सामना झाला. आश्चर्याची बाब म्हणजे मागच्या तीन वर्षापासून न्यूझिलंड ऑस्ट्रेलियाला टि ट्वेंटी, वनडे व कसोटीत एकाही सामन्यात हरवू शकले नव्हते. शिवाय हा सामना दस्तुरखुद्द ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर होत असल्याने ऑस्ट्रेलियाचे पारडे वरचढ दिसत होते. त्यातच मागील काही दिवसात न्यूझिलंडचा खेळ त्यांच्या लौकिकाप्रमाणे होत नव्हता, पराभवाचा ससेमिराच जणू त्यांच्या मागे लागला होता. मायदेशात झालेल्या तिरंगी स्पर्धेत पाकिस्तान विरूध्द अंतिम सामनाही न्युझिलंडला गमवावा लागला होता. म्हणून या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडेच संभाव्य विजेता म्हणून बघितलं जात होतं. मात्र प्रत्यक्ष सामना सुरू झाला तेंव्हा अगदी सुरुवाती पासून शेवटपर्यंत न्यूझिलंड संघाने खेळाच्या सर्वच क्षेत्रात कांगारूंना निष्प्रभ करत ८९ धावांचा मोठा विजय मिळवून स्पर्धेतला मोठा उलटफेर केलाच, शिवाय आपणही विजेतेपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार असल्याचे समस्त क्रिकेट जगताच्या निदर्शनास आणून दिले. 
            रविवारी स्पर्धेतला सर्वात मोठा सामना भारत व पाकिस्तान या हाडवैऱ्यात होणार असून यातील जिंकणारा संघ विजयी मानसिका मिळवून आपली घोडदौड सुरू करेल तर हरलेल्या संघावर पराभूत मानसिकतेवर मात करून पुढचे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल. त्यामुळे कोणता संघ आणखी एक उलटफेर करून स्पर्धेत रंगत आणतो हे बघणं नुसतं मनोरंजकच ठरणार नाही तर तो सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय असेल.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close