shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लाकडी-निंबोडी योजनेचा वाढीव सिंचन क्षेत्रासाठी तात्काळ फेर सर्व्हे - हर्षवर्धन पाटील

लाकडी-निंबोडी योजनेचा वाढीव सिंचन क्षेत्रासाठी तात्काळ फेर सर्व्हे - हर्षवर्धन पाटील

 - पिंपळे, अकोले गावांच्या समावेश होणार 
 - समाविष्ट गावातील वाढीव क्षेत्राचा समावेश करणार 
 -• कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे योजनेस नाव!

फोटो :- निरगुडे येथे लाकडी -निंबोडी योजनेच्या फेर सर्वेक्षणाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील.
इंदापूर : प्रतिनिधी दि.18/10/22
                    प्रस्तावित लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेमध्ये दुष्काळी पिंपळे, अकोले ही २ गावे पुन्हा समाविष्ट करणे तसेच लामजेवाडी, शेटफळगढे, शिंदेवाडी, म्हसोबाचीवाडी, काझड, लाकडी, निंबोडी, निरगुडे या समाविष्ट दुष्काळी गावांमधील वंचित शेतकऱ्यांचे क्षेत्र हे सिंचन योजनेत सामावून घेणे बाबतचा फेर सर्व्ह करून तात्काळ सुधारित प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजना ही कुठल्याही परिस्थितीत तातडीने पूर्ण करणारच, असा शब्द भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.१७) दिला.
           निरगुडे (ता.इंदापूर) येथे लाकडी-निंबोडी योजनेच्या फेर सर्वेक्षणाच्या मागणीसाठी  शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहून हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले. या योजने संदर्भात सिंचन भवन पुणे येथे जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आमची शनिवारी दि.15 बैठक झाली. जलसंपदा कडून   फेरसर्व्हेचे काम तातडीने काही दिवसातच पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
      हर्षवर्धन पाटील म्हणाले, युती शासनाच्या काळात कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या सूचनेनुसार मी लाकडी- निंबोडी उपसा जलसिंचन योजनेची कल्पना मांडली व त्यानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दि.13/7/1998 रोजी ' इंदापूर सिंचन योजना ' या नावाने योजनेचा आराखडा जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आला. सन २००४ मध्ये योजनेस तत्वता मंजूरी मिळाली, तर २००७ मध्ये प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्यावेळी राज्यपालांकडे सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र कृष्णा खोऱ्यातील प्रस्तावित ५२ टी. एम. सी. पाणीसाठ्याच्या वापर करावयाच्या योजनेत या योजनेचा समावेश नसल्याने व थेट राज्यपालांकडे अधिकार असल्याने या योजनेस निधी उपलब्ध होऊ शकला नाही, असे यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. तरीही सातत्याने या योजनेसाठी माझा पाठपुरावा व शासनस्तरावर आमच्या बैठका चालू होत्या.
         हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, सन २०१२ मध्ये या योजनेसाठी उजनी धरण पाणी वापर आराखड्यामध्ये ०.८६ टी.एम.सी. पाणी आरक्षित ठेवण्यात आले. या लाकडी निंबोडी योजनेमध्ये प्रारंभी पिंपळे, अकोले या दुष्काळी गावांचा समावेश होता. मात्र सध्या या योजनेतून पिंपळे, अकोले या दुष्काळी गावांना वगळण्यात आले आहे. पिंपळे, अकोले ही दुष्काळी गावे भौगोलिकदृष्ट्या शेजारी असल्याने तेथील शेतकऱ्यांना फेर सर्व्हे मध्ये समविष्ठ होऊन न्याय मिळेल.
      या योजनेत समाविष्ट इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये सुमारे ९००० हेक्टर क्षेत्र आहे, मात्र योजनेमध्ये सुमारे ४००० हेक्टर क्षेत्र घेण्यात आलेले आहे.  समाविष्ट असलेल्या लामजेवाडी, शेटफळगढे, शिंदेवाडी, म्हसोबाचीवाडी, काझड, लाकडी, निंबोडी, निरगुडे या गावातील अल्प क्षेत्र हे सिंचनासाठी घेण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना अन्य कोणत्याही पाणी मिळत नाही. परिणामी, या गावांमधील इतर शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे समाविष्ट गावामधील वाढीव क्षेत्र सिंचन योजनेमध्ये समाविष्ट करून वंचित शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फेर सर्व्हे उपयुक्त ठरणार आहे. तसेच या योजनेची सविस्तर माहिती समाविष्ठ गावातील शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
       या बैठकीत योजनेचा फेर सर्व्हे करून इंदापूर तालुक्यातील शेतीचे अधिकचे क्षेत्र सिंचन खाली आणण्यात यावे, फेर सर्व्हे नंतरच्या होणाऱ्या नवीन आराखड्यानुसार लागेल तेवढा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती  भाषणामध्ये शेतकऱ्यांनी केली.
         यावेळी हनुमंत काजळे पाटील, हनुमंत वाबळे, हरिभाऊ दराडे, रामभाऊ काजळे, बाळासाहेब बागल, भास्कर वनवे, मनोज चांदगुडे, संतोष घोळवे, रामभाऊ घुले आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास मारुती वनवे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन बाळासाहेब पानसरे तर आभार हनुमंत काजळे पाटील यांनी मानले.
* • चौकट :-
=======
लाकडी-निंबोडी योजनेस शंकररावजी पाटील यांचे नाव!
   ------------------------------------------------
कर्मयोगी शंकररावजी पाटील हे ऋषितुल्य असे नेतृत्व आहे. सदरची योजना व्हावी हे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे या योजनेस " कर्मयोगी शंकररावजी पाटील उपसा सिंचन योजना " असे नाव देण्याचा ठराव बाजार समितीचे माजी सभापती हनुमंतराव वाबळे यांनी बैठकीत मांडला, त्यास हनुमंत काजळे पाटील यांनी अनुमोदन दिले. सदरचा नावाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.


close