१६८) पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता
मोबाईल आणि मनोनिग्रह
जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला असे सुभाषित आपण बालपणापासून ऐकत आहोत आणि सध्याच्या संगणक युगात मोबाईल हे एक असे साधन उपलब्ध झालेले आहे की प्रत्येक व्यक्ती मोबाईलवर विसंबून आहे. सर्वच कामे एकाच माध्यमातून करायची सवय आपण लावून घेतलेली आहे. सकाळी उठल्याबरोबर घड्याळ बघायचे तर मोबाईलमध्ये, कुठे जायचे असेल तर लगेच लोकेशन टाकून पुढे जायचे, कुठली नोंद तपासायची असेल, कुठले गाणे ऐकायचे असेल, पैसे भरायचे तरी मोबाईल किंवा अगदी कोणाचेही नाव स्मरणात ठेवायचे असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये मोबाईलवर आपण विसंबून आहोत.
आज मोबाईलच्या सानिध्यात आपण २४ तास आहोत. त्यामुळे आपली झोप, विश्रांती, व्यायाम आणि हाताने करावयाची कामे या सर्वांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळेच मला असे म्हणायचे आहे की आपण उठता बसता मोबाईलवर विसंबून राहत असून हतबल झालेलो आहोत. जेव्हा एखादी सवय, आवड आपल्याला विनाशाकडे घेऊन जात आहे असं जाणवतं तेव्हा आपणास त्या सवयीचे व्यसन लागले आहे असे सिद्ध होते.
व्यसनाचे दुसरे नाव अधोगतीकडे घेऊन जाणारी क्रिया.
मनोनिग्रह हे मोबाईल मधून बाहेर पडायचे हत्यार आहे. अगदी ठरवून मोबाईल पासून दूर रहा. कामापुरते मोबाईलच्या जवळ जा. उठता बसता मोबाईलमध्ये आपण आपोआप गुरफटत जातो ते टाळा. डोळ्यांना, मेंदूला विश्रांती द्या.
अत्यंत घातकी असे जर कोणते व्यसन असेल तर ते मोबाईलचे आहे. संपूर्ण राष्ट्र उध्वस्त करण्याची ताकद या मोबाईलच्या व्यसनात आहे. तेव्हा मनोनिग्रह करा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या व राष्ट्राच्या हितासाठी मोबाईलपासून दूर रहा.
लेखक : पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने.
मो.क्र. ९८८१३७३५८५
पुणे.