अमानत पतसंस्थेकडून विद्यार्थ्यांना
प्रेरणादायी शंभर पुस्तकांचे वाटप
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : विज्ञान युगातील प्रगत तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे,मात्र या संस्कृतीची प्रामाणिकपणे जोपासणूक केल्यास ही वाचन संस्कृती प्रत्येक वाचकाला त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर नेते,त्यास नेता बनवते, त्यांचे जीवन समृद्ध करते असे प्रतिपादन सार्थक संस्थेचे मानद सचिव शकील बागवान यांनी केले.
येथील खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये विद्यार्थी वर्गाला सतत प्रेरणादायी ठरलेले माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे निमित्ताने अमानत नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रेरणादायी पुस्तके वाटण्यात आली त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बागवान बोलत होते. अध्यक्षस्थानी अमानत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष याकुब बागवान होते.
शकील बागवान पुढे म्हणाले,आजच्या तरुण वर्गामध्ये मोबाईल संस्कृतीचे खूप मोठे आकर्षण आहे. मात्र मोबाईल संस्कृती माणसाला माणसापासून दूर नेण्याचे कार्य करीत आहे, अशा कुसंस्कृतीला फाटा देत वाचन संस्कृतिचे संस्कार रुजविणे हा वाचन प्रेरणा दिनाचा मुख्य उद्देश आहे.आपल्या वाचनात जी पुस्तके येतात त्यांचाच प्रभाव आपल्यावर पडत असतो, त्याप्रमाणेच घडण्याचा प्रयत्न प्रत्येक वाचक प्रयत्न करीत असतो.वाचनाचे महत्व विषद करताना इंग्लंड देशाचे उदाहरण देताना बागवान पुढे म्हणाले, येथील नागरिक म्हणतात आमच्यावर कितीही अतिक्रमणे झाली,संपत्ती नष्ट झाली तरी चालेल मात्र शेक्सपियरने लिहिलेली पुस्तकांचा अनमोल साठा तसाच राहू द्या.ती वाचून आम्ही उध्वस्त झालेला देश पुन्हा उभा करू.प्रत्येक विद्यार्थ्याने आभ्यासाची भूक ठेवली पाहिजे, सतत चांगल्या शोधाचा ध्यास विद्यार्थ्याने घ्यायला हवा.
घरातील वारकरी संप्रदायातील वाचन संस्कृती लहानपणापासून जोपासल्याने त्याच बळावर आपण हव्या असलेल्या उच्च पदापर्यंत पोहोचू शकलो.
अमानत पतसंस्थेचे अध्यक्ष याकुब बागवान यांनी कार्यक्रमचे प्रास्ताविक करताना संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात सतत प्रयोगशील राहण्याचे आहावण केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या माजी विद्यार्थिनी महेजबीन बागवान लिखित तरगिब का जरीया अर्थात प्रेरणास्रोत हे उर्दू माध्यमातील पुस्तक देण्यात आले. पुस्तक वाटपातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका महेजबीन खान ,प्राध्यापक उमर बागवान,वासीम सय्यद,फहेमीदा सय्यद ,आरेफा तांबोळी,मोहम्मद तनविर,नहिदअख्तर शेख, बँकेच्या शाखाधिकारी सुलताना शेख आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद उमर बागवान यांनी तर आभाराचा कार्यक्रम मुख्याध्यापिका महेजबीन खान यांनी केले.