संजय माकणे - तालुका प्रतिनिधी
चाकुर :- दिवाळी सणानिमित्त राज्य शासनाच्या वतीने अंत्योदय, अन्नसुरक्षा व शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना शंभर रुपयात देण्यात येणाऱ्या चार वस्तूंच्या शिधाजिन्नस कीटच्या वाटपाचा शुभारंभ येथील विशाल विविध कार्यकारी सोसायटीच्या रास्तभाव दुकानात तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, नगराध्यक्ष कपील माकणे यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालूक्यात तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, नायब तहसीलदार बालाजी चितळे यांनी रास्तभाव दुकानदारांची बैठक घेऊन किट वाटपाचे नियोजन केले आहे. त्यानुसार ३१ हजार कार्ड धारकांना हे किट वाटप केले जाणार आहे. शंभर रूपयांमध्ये रवा, हरभरा डाळ, साखर व १ लिटर तेल दिले जाणार आहे. सोसायटीचे चेअरमन डाॅ. गोविंदराव माकणे यांनी ही सर्व शिधापत्रीकाधारकांना दिवाळीपुर्वी हे किट वाटप करता यावे.
यासाठी गुरूवार पासून किटच्या वाटपाला सुरूवात केली. यावेळी सोसायटीचे संचालक शिरीष रेड्डी, जाकीरहुसेन कोतवाल, तलाठी नवनाथ खंदाडे, लिपीक संजय कासराळीकर, कपील आलमाजी, संगम ढोबळे उपस्थित होते.