अफाट गुणवत्ता, तुफानी वेग, धारदार यॉर्कर, विजिगुषी वृत्ती असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी म्हणजे एक शापीत हस्ती असल्याचे वारंवार सिद्ध होत गेले आहे. कधी क्रिकेट मैदानात थरारक कामगिरी करूनही उपेक्षित राहिला तर कधी कौटुंबिक कलहाचा त्रास सहन करावा लागला.
क्रिकेटच्या तिनही प्रारूपांत मिळालेल्या संधीचं शमीने सातत्याने सोनं केलं असतानाही निवड समितीच्या वक्रदृष्टीची अवकृपा सन २०२१ च्या टि विश्वचषक स्पर्धेनंतर जरा जास्तच झाल्याचे समस्त क्रिकेट जगताने अनुभवलं आहे. युएईत झालेल्या त्या स्पर्धेत भारत पाकिस्तान विरुद्ध पराभूत झाला. त्या पराभवात सर्वच जण दोषी असताना त्याचं खापर एकट्या मोहम्मद शमीवर फोडण्यात आलं, इतकंच नाही तर देशद्रोहाची टिकाही त्याला सहन करावी लागली, आणि त्यानंतर देश - विदेशात अनेक टि२० द्विपक्षीय मालिका झाल्या परंतु मोहम्मद शमीला प्रत्येक वेळी डावलण्यात आले. त्या दरम्यान अनेक नव्या - जुन्या वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली. त्यातील काही जण सातत्याने अपयशी ठरत असतानाही शमीकडे दुर्लक्षच करण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वी दुबईत आशिया चषक स्पर्धा झाली. त्यात खास करून भारताच्या वेगवान गोलंदाजीचा मोठा फज्जा उडाला. प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहा जायबंदी होता तरीही शमीला संघात घेण्याच्या मोठया मागणीकडेही निवड समितीने दुर्लक्षच केलं. शमी मागच्या टि२० विश्वचषकानंतर एकही टि२० सामना खेळू शकला नाही. इतकं नाही तर केवळ नऊच आंतरराष्ट्रीय सामने तो भारताकडून खेळला. त्यात सहा कसोटी व तीन वनडे सामन्यांचा समावेश होता. या नऊ सामन्यात २५ बळी त्याला मिळाले होते. आयपीएलमध्ये पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद मिळविणाऱ्या गुजरात टायटन्सच्या यशात शमीची कामगिरी लक्षवेधकच होती. इतकी चांगली कामगिरी करत असताना त्याला डावलण्यात येण्याचं कोडंच उलगडत नाही.
आशिया चषकानंतर भारत दौऱ्यावर दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया संघ आले होते, त्यावेळी त्याची भारतीय संघात निवड झाली होती मात्र कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने त्याची पुनरागमनाची संधी हुकली. मात्र त्याचे नशीब बलवत्तर की, बुमराहाच्या दुखापतीनंतर त्याची संघात वर्णी लागली.
अखेर विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात राखीव खेळाडू म्हणून शमीची निवड झाली. मात्र भारताच्या गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रित बुमराहा पाठदुखीतून सावरू न शकल्याने शमीची लॉटरी लागली. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचल्या नंतर पहिले दोन सामने त्याला खेळायलाच मिळाले नाही तर स्पर्धेच्या सोमवारी ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या अधिकृत सराव सामन्यातही शेवटच्या षटकापर्यंत तो बाहेरच बसला होता.
भारतीय संघाने दिलेल्या १८७ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी विजयाकडे शिस्तबद्धपणे वाटचाल सुरू केली असताना शेवटच्या षटकात अकरा धावांचा बचाव करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा पुढे पर्यायच उरला नव्हता. त्याचे सर्व लाडके मोहरे पिटले होते. अशा वेळी सर्वांना भारताचा पराभव अक्षरश: डोळ्यासमोर दिसत असताना कर्णधार रोहितला डग आऊटमध्ये बसलेल्या मोहम्मद शमीचा धावा करावा लागला. सर्वांना वाटलं होतं की, शमी आता बळीचा बकरा बनणार.
परंतु त्यानंतर घडला तो केवळ चमत्कारच होता. पहिल्या दोन चेंडूवर दोन - दोन धावा निघाल्या तेंव्हा शमीच्या अंगात वेगळाच संचार झाला आणि पुढच्या चार चेंडूवर स्वतःच केलेल्या अचूक थ्रोवर एका धावबादसह चार गडी बाद करून भारताला सहा धावांचा आत्मविश्वास वाढविणारा विजय मिळाला व अवघ्या चार चेंडूत शमी हिरो ठरला आणि समस्त भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या. शमी भारताची वेगवान गोलंदाजीची बाजू सांभाळणारच, शिवाय भारताच्या विश्व विजेतेपदाचा शिल्पकार ठरण्याच्या अपेक्षांना पुष्टीच मिळाली. सराव सामन्यात निर्णायक क्षणी ठोस कामगिरी करून कमकुवत वाटू लागलेल्या भारतीय गोलंदाजीस बुस्टर डोस देण्याचेच काम केले.
शमी सारख्या मोहऱ्याला योग्य संधी दिली तर टिम इंडियाचाच फायदा होईल. शमीला सडविण्याचे जर कोणी राजकारण करत असेल तर कृपया करून त्याने ते देशहित बघून थांबवावे. यातच सर्वांचे सौख्य सामावले जाईल.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com