shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आव्हानांना हिंमतीने सामोरे गेल्यास अवघे जीवन उजळते - युवा वक्ते विशाल कांबळे

 *छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‘व्यक्तिमत्व विकास व भाषिक कौशल्ये’ कार्यशाळा संपन्न

सातारा प्रतिनिधी:
मानवी जीवन गुंतागुंतीचे असून सकारात्मक विचार केल्यास  निश्चित वाट मिळू शकते. विद्यार्थ्यांनी आपलं व्यक्तिमत्व सर्व अंगाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे,जीवनात अनेक आव्हाने उभी राहत असतात पण माणसाने  हिंमतीने  वाटचाल केल्यास त्याचे अवघे  जीवन उजळून जाते. व्यक्तिमत्व धैर्याने व्यापक होत जाते ,असे विचार युवावक्ते विशाल कांबळे यांनी व्यक्त केले. येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात  छत्रपती शिवाजी कॉलेजच्या   मराठी विभागाने आयोजित  केलेल्या ‘व्यक्तिमत्व विकास आणि भाषिक कौशल्ये’ या एक दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी भाषा संचालक डॉ. सुभाष वाघमारे हे होते. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 


     विशाल कांबळे म्हणाले की,‘ जीवनाची वाटचाल करत असताना वक्तशीरपणा,आदर्श आणि नेमकेपणाने वाटचाल या दिशेने आपला प्रवास सुरू झाला तर जीवनात काही अशक्य नाही. केवळ चांगले  दिसणे म्हणजे व्यक्तिमत्व नसून चांगले लिहिता येणे,चांगले बोलता येणे, चांगले समजून घेता येणे हा सुद्धा व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.महात्मा गांधी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या महान समाजसुधारकांनी समाज उद्धारासाठी रात्रंदिवस कष्ट केले अशी परिपूर्ण व्यक्तिमत्वे  समाजात  होती म्हणूनच  समाज घडला. ध्यास घेऊन विधायक कार्य आणि ध्येये अखंड परिश्रम करून  पूर्ण करण्याने आपला विकास होत असते. त्यासाठी आत्मपरीक्षण करून आत्मभान जागृत करावे ,असे ते म्हणाले.

      या कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात भोलेनाथ  केवटे म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध भाषिक कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. आपले सर्व ज्ञान व्यवहार हे भाषेमधून होत असतात. म्हणून चांगले ऐकून घेणे, चांगले बोलणे ,चांगले लिहिणे,चांगले वाचणे या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. कोणत्याही व्यवसायात भाषा नीट समजून घेतली तरच व्यवहार होत असतो. कोणतेही करियर करताना तुमची भाषा आणि काम चांगले नसेल तर आपल्याला किंमत मिळत नाही. स्वतःबरोबरच समाजाची प्रगती साधत असताना त्या समाजाचे काहीतरी देणे लागतोय असा विचार करून काम केल्याने आपोआप आपले व्यक्तिमत्व सुधारत जाते. 

     प्रारंभी या कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. संजयकुमार सरगडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.समीक्षा चव्हाण हिने केले .आभार  समन्वयक प्रा. श्रीकांत भोकरे यांनी मांडले.  एकदिवसीय कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मराठी विभागातील कार्यशाळा समन्वयक प्रा.प्रियंका कुंभार,प्रा.डॉ.कांचन नलवडे,प्रा.डॉ. विद्या नावडकर यांनी प्रयत्न केले.या कार्यशाळेत महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत युवा वक्ते विशाल कांबळे यांचे स्वागत करताना प्रा.डॉ.सुभाष वाघमारे ,डावीकडून...समन्वयक डॉ.संजयकुमार सरगडे  समन्वयक प्रा.श्रीकांत भोकरे,डॉ.कांचन नलवडे आणि दैनिक सकाळचे भोलेनाथ केवटे.

*पत्रकार उद्धव फंगाळ - मेहकर
उपाध्यक्ष: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close