आठवणीतील रंगपंचमी ;
रंगपंचमी सण रंगांचा-- सण आनंदाचा!
इंदापूर:- रंगपंचमी हा आमचा आवडता सण असायचा.त्यावेळी रंग विकत घ्यायला पैसे नसायचे.मग आम्ही शेवरी,झाडाची पाने,गवत दगडाने बारीक करून त्याचा रस काढायचो तो बाटलीत भरायचो,त्यात पाणी ओतायचे मग झाला आमचा हिरवा रंग तयार काही मुले मात्र वीट घासायची व त्यापासून तपकिरी रंग तयार करायची.रंगपंचमी येण्याअगोदर आमची आठ दिवसापासून तयारी असायची.रंगपंचमी सणादिवशी आम्ही जुनी कपडे घालायचो.नवीन कपडे खराब होतील म्हणून घरचे जुनी कपडे घालायला देत असत.मग दिवसभर शाळेच्या मैदानावर किंवा मोकळ्या जागेत रंगपंचमी चालायची. जवळपास वीस पंचवीस मुले एकत्र असायचो.एकमेकांना धावत जाऊन रंग लायवाचो पण वादविवाद होत नव्हता.रंग थोडेच पाणीच जास्त असायचं.रंग संपले की पाणी कोणाच्या टाकीतील, ड्रममधील घ्यायचो पण सण असल्याने कोणी काही म्हणत नसायचे.रंग खेळायचा संपला की घरी जायचो.घरी गेल्यानंतर नातेवाईक आलेले असायचे दाजी,मामाचा मुलगा ,वहिनी यांना रंग लावायचो.दिवसभर रंगपंचमी असायची.संध्याकाळी पुरणपोळी चा बेत असायचा.खरच त्या वेळी प्रत्येक सण असाच साजरा व्हायचा.
आजच्या मुलांना रंगपंचमी माहीतच होतं नाही.काही मुलांना तर रंगपंचमी सण असतो हेच माहीत नाही.फक्त मोबाईल वर स्टेटस ठेवण्यापूरतेच सण राहिले आहेत.रंग लावला तरी वादविवाद होण्याची भीती असते.त्यामुळे हळूहळू सण संपून जातील अशी भीती वाटत आहे.खरतर सर्व पालकांनी आपापल्या मुलांना सण समारंभात सहभागी होण्यास सांगितले पाहिजे.सण उत्सवामुळे मुलांमध्ये एकी वाढते.मुले सर्वगुणसंपन्न होतात. एकात्मता वाढीस लागून एक सुजाण नागरिक तयार होण्यास मदत होईल.चला तर मग उद्या सर्व पालकांनी आपापल्या मुलांना मार्गदर्शन करून रंग खेळण्यास प्रोत्साहित करा----सण आहे तर आनंदाने साजरा केलाच पाहिजे.
रंग नात्याचा, रंग आनंदाचा, रंग विश्वासाचा, रंग आपुलकीचा...
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
------------भारत ननवरे सर
कोषाध्यक्ष,शिक्षक समिती इंदापूर