कुरआन -रमजानची भेट
(रमजानुल मुबारक - ९ )
रमजान महिन्यातील रोजा नंतरचे महत्वाचे कार्य म्हणजे कुरआन शरीफ पठन होय. कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे.तो रमजान महिन्यातच अल्लाहतआला ने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांचे पर्यंत आपल्या खास फरिश्त्या मार्फत पोहोचविला. हजरत पैगंबरांनी फरिश्ता हजरत जिब्रईल अलैसलाम यांचेकडून शिकून घेऊन तो आपल्या अनुयायी लोकांपर्यत पोहोच केला. रमजान मध्येच कुरआन शरीफचे अवतरण पृथ्वीवर झाले.त्यामुळे रमजान महिन्यात जगातील प्रत्येक मशिदीत दररोज रात्रीच्या नमाजे तरावीह मध्ये कुरआन पठन केले जाते.घराघरातही माता भगिनी तसेच बंधू लोक त्याचे वाचन करतात .
सुमारे २३ वर्षाचा काळ पूर्ण कुरआन शरीफ अवतीर्ण होण्यास लागला.जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती व मार्गदर्शन अल्लाहने कुरआन मध्ये केलेले आहे.आज जगातील जवळपास प्रत्येक भाषेत कुरआन शरीफ चे भाषांतर उपलब्ध आहे. मराठी मध्ये देखील ते उपलब्ध असून वाचकांना देखील ज्यांनी मराठी कुरआन शरीफ वाचण्याची इच्छा दाखवल्यास ते दिले जाते.गेली अनेक वर्ष हा उपक्रम सुरु असून वाचकांचा उत्तम प्रतिसाद यासाठी मिळत असतो. गेली २७ वर्षे या लेखमालेचे लेखन करतांना असंख्य वाचकांचे फोन व मेसेज दररोजच येतात.
इस्लाम धर्माबद्दलचे इतर धर्मिय बांधवात असलेले अनेक गैरसमज या लेखमाले मुळे दूर होऊन इस्लाम धर्म,कुरआन, इस्लामी जीवन प्रणाली, अल्लाह व पैगंबरांचे आदेश,प्रेषित यांचे बाबतची वस्तुनिष्ठ माहिती वाचकांपर्यंत पोहोचवून धार्मिक समज, गैरसमज व शंकानिरसन करण्यात या लेखमालेने मोठी भूमिका बजावली आहे. अनेक बंधू भगिनी दररोज फोन करुन इस्लामशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करतात. शंकानिरसन करतात.कुरआन शरीफ मध्ये जीवनासाठी आवश्यक अशा सर्व बाबींचे मार्गदर्शन केलेले आहे. कुरआन किवा कोणताही धार्मिक ग्रंथ मग बायबल,गीता, तौरेत, इंजिल,जबूर हे एका विशिष्ट समाज समूहासाठी नसून सर्व मानवजातीसाठी आहे, म्हणूनच जागतिक पातळीवर जगाच्या सर्व भाषातून कुरआन चा प्रसार झाला असून विविध धर्माचे लोक आज कुरआन बाबत संशोधन करीत आहेत. तो समजून घेत आहेत. सर्व धर्मिय संमेलनातून त्यावर चर्चा होत असून कुरआन मध्ये नमूद बाबींची तूलना केली जात आहे.जगातील अनेक विद्यापीठातून कुरआन शरीफ मध्ये सांगितलेल्या गोष्टींबाबत संशोधन केंद्रे स्थापित करण्यात आलेली असून त्यावर अव्याहत संशोधन सुरु आहे. कुरआन म्हणजे मानवासाठी जीवन कसे जगावे याची ईश्वरनिर्मित घटना आहे,या घटनेत नमूद नियमावलीनुसार जो जीवन जगेल तो यशस्वी होईल.सोशल मीडियावर देखील कुराणबाबत महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. youtube च्या माध्यमातून कुरआन शरीफ चे सर्व खंड तिलावतसह उपलब्ध आहेत.जगभरातील सर्व धर्मीय लोक आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी या माध्यमांचा उपयोग करीत आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे जगातील सर्व भाषेमध्ये त्यावर भाष्य व विश्लेषण उपलब्ध असल्याने जगाच्या विविध भागातील लोक त्याचा अभ्यास करून आपले ज्ञान अद्यावत करीत आहेत. त्याचबरोबर वास्तव आणि कल्पनाविस्तार याचा अभ्यास करून सत्य जाणून घेत आहे. यातूनच कुरआन शरीफ हा ग्रंथ फक्त मुस्लिमांसाठी नसून तो जगभरातील लोकांसाठी ईश्वराची एक अमोल अशी देणगी आहे. प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित प्रत्येक प्रश्नाची उकल त्यामध्ये सामावलेली आहे. याची प्रचिती जगभरातील लोक घेत आहेत.( क्रमशः)
*सलीमखान पठाण (सर) श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111