shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

स्वराज्य संकल्पक :- छत्रपती शहाजीराजे भोसले

 पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणजे शहाजीराजे भोसले हे  होय.
      शहाजीराजे यांचा जन्म बाबाजीराजे भोसले यांच्या घराण्यात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी वेरूळ इथे दि.१८ मार्च १५९४ रोजी झाला. शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स.१६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजाम शाहीत होते.  
          शहाजीराजे जसेजसे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. अहमदनगर जवळच्या भातवडी येथे झालेल्या युद्धात शहाजीराजे यांनी प्रथम गनिमी काव्याचा वापर केला. जिथे मोघल सैन्य वस्तीला होते त्यावरील भागात असलेल्या धरणाची भिंत फोडून दहा हजार सैन्यानिशी दोन लाख सैन्याच्या पाडाव केला. 
        छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्याआधी शहाजी राजेंनी एका किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. तो किल्ला म्हणजे पेमगिरी होय. दि.१६ सप्टेंबर १६३३ रोजी कळस गावापासून पाच किलोमीटर वर असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भिमगड म्हणजे शहागडावर लहानग्या मुर्तजा या निजमास मांडीवर घेऊन स्वतः सिंहासनाधिश्वर झाले व हे राज्य सलग तीन वर्षे चालवले म्हणजेच स्वराज्याचा संकल्प शाहगडवर घेतला. म्हणूनच शहागड हा किल्ला पुढे शहाजी महाराजांची स्वराज्य संकल्पभूमी म्हणून उदयास आली.
छत्रपती शिवाजीराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून त्यांच्या पणजोबांचे व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. पण स्वराज्याचे बीज, स्वराज्याची संकल्पना शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या मनात पेरली होती. त्यामुळे शहाजीराजांना 'स्वराज्य संकल्पक' म्हटले जाते .
      निजामशाहीत वजीर फतेह खान, जहान खानने निजामाला मारले. . शहाजहानने दरम्यान निजामशाहीतील सगळ्या पुरुषाना ठार केले. तेव्हा शहाजीराजांनी निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादीवर बसवून राज्याचा कारभार हाती घेतला. आणि एकहाती महाराष्ट्राचा कारभार चालवला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. त्यांनी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली. दरम्यान छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी शहाजीराजांनी शहाजहानशी तह केला. शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली. पेमगिरी किल्ल्याला भिमगड उर्फ शहागड किल्ला म्हणूनही ओळखले जाते. शहाजी राजांचा हा प्रयत्न जरी अयशस्वी ठरला असला तरी येऊ घातलेल्या हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली.
     फेब्रुवारी 1637 मध्ये शहाजीराजे हे जिजाऊ, मुलगा संभाजी व बाल शिवाजींसह विजापूरला गेले. येथे या सर्वांना शहाजीराजे यांनी स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला. येथूनच शिवाजी महाराज यांच्या मनात स्वराज्याचे बीज रुजत गेले. शिवाजी महाराज यांचे मोठे बंधू संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायांनी मातोश्री जिजाबाई यांच्यासह पुण्यात राहून महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना करावी, असे शहाजीराजे यांनी सांगितले. त्यांचा आदेश खाली न पडू देता छत्रपतींनी स्वराज्य उभारलं आणि ते योग्यरित्या चालवलेही.
1638 मध्ये, सेनापती शाहजी भोसले यांच्यासोबत रानादुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली आदिलशाही विजापूर सेनेने बेंगलोरवर ताबा मिळवला. आणि बेंगलोरची शाहजी यांना जहागिर च्या स्वरूपात देण्यात आली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता तोही त्यांच्याकडेच ठेवला.
     शहाजीराजांनी आपले पुत्र छ. शिवाजी महाराजांना पुण्यात आपल्या जहागिरीचा स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. राज्यकारभारा साठी आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली. 
        छ. शिवाजींच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांस फूस आहे या संशयाने आदिलशाहीने मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै १६४८चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात, असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी, ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते, हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि.१६ मे १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. शहाजी मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. त्यानी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजाना शिक्षा किंवा देहदंड न करता त्याना मांडलिक केले. त्यामुळे गरज पडली तेव्हा हे राजे शहाजींच्या मदतीला आले.
शहाजीराजे आपल्या कारकीर्दित निजाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले तरी त्यान्ची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची होती. त्यानी तसा दोनदा प्रयत्न केला, पण त्यास यश नाही आले. त्यांचे स्वप्न त्यांचे पुत्र शिवाजीराजे (महाराष्ट्र) आणि व्यंकोजीराजे ( तंजावर ) यानी प्रत्यक्षात आणले. शहाजीराजें नी कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करून कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका, मोठ्या मुलगा संभाजीराजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला. मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला‌ तंजावर येथे  संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे मावळ्यांसह जिजाऊ व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. 
      इ.स. १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. 

माघ शुद्ध ५. म्हणजेच दि.२३ जानेवारी, इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा पाय एका वृक्षवेलीमध्ये अडकला, ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी जिल्हा दावणगिरी- कर्नाटक येथे आहे. सरलष्कर, महाराज फरझन्द अश्या पदवी नी सन्मानित असले तरी स्वराज संकल्पक हिच खरी पदवी शोभते.

संकलन:-
श्री.  भाऊसाहेब वाकचौरे पाटील 
अखिल भारतीय मराठा महासंघ, नगर जिल्हा
close