shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भाजपने उमेदवारी दिल्यास बौद्ध समाज साळवेंसोबत


'राखीव' मध्ये सतत डावलले;
श्रीरामपूरच्या सामाजिक ऐक्य मेळाव्यात उद्रेक

श्रीरामपूर प्रतिनिधी:
शिर्डी लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यापासून उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्ष बौद्ध समाजाला डावलत आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या समाजाला उमेदवारी न दिल्यास या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा सोमवारी श्रीरामपूर येथे झालेल्या सामाजिक ऐक्य मेळाव्यात देण्यात आला. भाजपने मिलिंदकुमार साळवे यांना उमेदवारी दिल्यास समाज त्यांच्या पाठीशी भक्कम पण उभा राहील, असे रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी मेळाव्यात स्पष्ट केले.


 नॅशनल ख्रिश्चन कौन्सिलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रवीणराजे शिंदे अध्यक्षस्थानी होते. संयोजक भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकातून मांडली. यावेळी बहुतांश वक्त्यांनी बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम समाजासोबतच इतर बारा बलुतेदार समाज घटकांना सोबत घेऊन बौद्ध समाजाचा एकच उमेदवार आगामी निवडणुकांमध्ये उभा करावा असा सूर व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी न दिल्यास या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात यावा, असा ठराव रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी मांडला. तो टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आला. जो पक्ष बौद्ध समाजाला उमेदवारी देईल त्याच्यासोबत समाज राहील. अगदी भाजपचे पदाधिकारी मिलिंदकुमार साळवे यांना भाजपने उमेदवारी दिल्यास बौद्ध समाज एकसंघपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्रिभुवन यांनी यावेळी दिली. तसेच बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम व इतर समाजाचा लवकरच मेळावा घेणार असल्याचे ते म्हणाले. 


शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांना उमेदवारी न मिळाल्यास जो पक्ष बौद्ध समाजास उमेदवारी देईल, त्या उमेदवाराचे काम करण्याचा निर्णय रिपाइंने घेतल्याचे या पक्षाचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांनी सांगितले. भारत मुक्ती मोर्चाचे रमेश मकासरे यांनी आरक्षित मतदारसंघाचा पूर्वेतिहास सांगत सविस्तर मांडणी करताना आजच्या स्थितीत एक जाती भूमिका न घेता इतर जातींनाही सोबत घेऊन आपली ताकद एकवटली तर निश्चितपणे न्याय मिळेल. यापुढे जातींना जोडण्याचे अभियान सुरू केले पाहिजे असे सांगितले. डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन म्हणाले, इतरांच्या मताची गरज आहेच, पण बौद्ध समाजाने अगोदर एकत्र येण्याची गरज आहे. समाज एकत्र आल्याशिवाय आपल्याला उमेदवारी मिळणार नाही. भाजपचे पदाधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी शिर्डी लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सातत्याने बौद्ध समाजाला उमेदवारी नाकारली जात असल्याबद्दल समाजाने आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करून इतरांना दोष न देता समाजाचा एकच उमेदवार निश्चित केला पाहिजे, अशी सर्वसमावेशक व्यापक भूमिका मांडली. बौद्ध समाजाची सर्वाधिक लोकसंख्या व मतदार संख्या असतानाही या समाजाला उमेदवारी देताना डावलले जात आहे, असे बौद्धाचार्य राहुल पठारे म्हणाले. समाजाचा एकच उमेदवार दिल्यास हमखास समाजाचा आमदार, खासदार होईल, असे ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी सांगितले. आपण कुठेही कमी नसून स्वार्थी, संधीसाधू कार्यकर्त्यांमुळे आंबेडकरी चळवळ बदनाम होत असून काही विकाऊ कार्यकर्त्यांमुळे निवडणुकीत समाजाची पिछेहाट होत आहे, असे सचिन ब्राह्मणे म्हणाले. समाजातील फुटीरतावादी प्रवृत्तीमुळे पीछेहाट होत असून निवडणुकीसाठी समाजाने एकास एक पर्याय म्हणून दोन उमेदवार निश्चित करावेत. तसेच याबाबत सुकाणू समिती गठित करावी, अशी सूचना डॉ. दिलीप शेजवळ यांनी केली. काही घटकांनी बौद्ध समाजाविषयी गैरसमज पसरवून द्वेष भावना निर्माण केली आहे. या पुढील काळात मागासवर्गीय, मुस्लिम व बारा बलुतेदारांची मोट बांधल्यास आगामी निवडणुकांमध्ये बौद्ध समाजाला निश्चित यश मिळेल. त्यासाठी समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजाने चारित्र्यवान उमेदवार दिला तर निश्चित यश मिळेल. पैशावर हा समाज विकला जातो, हा गैरसमज दूर केला पाहिजे, असे शंभूक वसतिगृहाचे अधीक्षक व परिवर्तन फाउंडेशनचे अशोक दिवे यांनी सांगितले. पंधरा वर्षांपासून बौद्ध समाजास लोकसभा व विधानसभा निवडणुकीत डावलले जात आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी अहंकार बाजूला ठेवून समाजाची एकजूट करीत एकच उमेदवार दिला पाहिजे, असे दत्तनगरचे माजी सरपंच रवींद्र गायकवाड यांनी सांगितले. पक्ष कोणताही असला तरी, जो पक्ष उमेदवारी देईल त्याच्या मागे समाजाची ताकद उभी करावी, असे मत अशोक कारखान्याचे माजी संचालक प्रा. कार्लस् साठे यांनी व्यक्त केले. रितेश एडके यांनीही जो पक्ष बौद्ध समाजाचे उमेदवार देईल त्यामागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. बौद्ध-ख्रिश्चन समाज आर्थिक सक्षम, उच्चशिक्षित आहे. पण या समाजाला हेतू पुरस्सर बदनाम केले जात आहे. एका जातीचा मेळावा न घेता सामाजिक ऐक्य मेळावा घ्यावा, अशी सूचना दत्तनगरचे माजी सरपंच पी. एस. निकम यांनी केली. खा. रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित आहे. पण दुसरा उमेदवार दिल्यास आम्ही वंचित बहुजन आघाडीचे काम करणार आहोत. आजच्या बैठकीप्रमाणेच सर्व निवडणुकांपर्यंत अशा चिंतन बैठका घेण्याची गरज आहे,असे रिपाइंचे नाशिक विभागीय प्रमुख भिमाभाऊ बागुल म्हणाले.

भाजपप्रमाणे थिंकटँक बनवा
अजूनही वेळ गेलेली नाही. अशक्य काही नाही. लढून बौद्ध-ख्रिश्चन समाजास न्याय मिळवावा लागेल. उपद्रवमूल्य दाखवून न्याय पदरात पाडून घ्यावा लागेल. ख्रिश्चन समाज सदैव बौद्ध समाजासोबत आहे. निवणुकांसाठी समाजाची  भाजपप्रमाणे थिंकटँक तयार करावी, असे नॅशनल ख्रिश्चन कौन्सिलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रवीणराजे शिंदे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले.
close