चालू वर्षाच्या रमजान महिन्यातील आजचा तिसरा अंक म्हणजे जुमआ अर्थात शुक्रवार.ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात सोमवारला महत्व आहे तसेच महत्व रमजान महिन्यात शुक्रवारला आहे. ईश्वराने पृथ्वीचा पाया शुक्रवारी रचला. इस्लामी इतिहासानुसार जगाच्या इतिहासातील अनेक महत्वपूर्ण घटना या शुक्रवारीच घडल्या आहेत.पृथ्वीवरील पहिला मानव असणारे हजरत आदम अलैसलाम (जे समस्त मानवजातीचे पिताश्री आहेत) हे शुक्रवारीच स्वर्गातून पृथ्वीतलावर पाठवले गेले.याच दिवशी अल्लाहने त्यांची माफी स्विकारली. शुक्रवारीच हजरत नुह अलैसलाम यांची नौका प्रचंड प्रलयानंतर किनारी लागली.शुक्रवारीच हजरत इब्राहीम अलै सलाम नमरुदच्या आगीतून सुखरुप बचावले.हजरत मुसा अलैसलाम फिरऔनच्या जाचातून मुक्त झाले. हजरत युनूस अलै सलाम माशाच्या पोटातून सुखरूप बाहेर आले.
अशा खूप घटना सांगता येतील.शुक्रवारला ईद - ऊल- मोमीनीन ही म्हटले जाते.
आजच्या दिवशी विशेष साप्ताहिक प्रार्थना नमाज ए जुमआ ही आदा केली जाते.दुपारी नमाजची अजान झाल्याबरोबर सर्व व्यवहार बंद करुन नमाजला जावे अशी हजरत पैगंबरांची शिकवण आहे.शुक्रवारी एक क्षण (पल) असा आहे कि या क्षणाला जे काही मागाल, दुआ कराल ती स्विकार केली जाते.पण तो क्षण नेमका कोणता हे अल्लाहने गुप्त ठेवलेले आहे.मात्र तो क्षण दुपारच्या वेळेत आहे असे म्हणतात. रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार हा जमातुल विदाअ अर्थात निरोपाचा शुक्रवार म्हणूनही पाळला जातो.रमजान महिन्यात मिळणारे 70 पट पुण्य हे प्रत्येकासाठी एक पर्वणी आहे. या संधीचा सदुपयोग करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.रमजान महिना सुरू झाला आणि आता तो पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करीत आहे. 18 दिवस कसे निघून गेले हे समजले देखील नाही.त्यामुळे उर्वरित दिवसांचा जास्तीत जास्त पुण्य संचय करून घेण्यासाठी प्रयत्न करावा.(क्रमशः)
*सलीमखान पठाण (सर)
श्रीरामपूर - 9226408082
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111