shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

धर्मशाळा कसोटीचा पहिला दिवस विक्रमविरांच्या नावे



              धर्मशाळा येथील क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात उंचावर असलेले निसर्गसंपन्न व सर्वांना आनंद देणारे स्टेडियम आहे. येथील थंड वातावरण इंग्लिश खेळाडूंना इंग्लंडमध्येच खेळत असल्याचा भास निर्माण करणारे आहे.  या मालिकेत हैद्राबाद कसोटी वगळता निरस खेळ केलेल्या इंग्लंडला जाता जाता आपली पत राखण्याची मोठी संधी नाणेफेक जिंकल्याने चालून आली. या गोष्टीचा लाभ उठवत इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजी पत्करली. त्यानंतर त्याचे सलामीवीर झॅक काऊली व बेन डकेटने शतकी सलामी देऊन आशादायक स्थिती निर्माण केली. वेगवान गोलंदाजांसाठी पोषक वातावरण होते. मात्र येथे वेगळाच प्रकार घडला. उपहारापूर्वी कुलदिप यादवने डकेट व ओली पोपचा काटा काढला. तरीही पहिले सत्र इंग्लंडच्या नावे गेले. मग त्यानंतर संपूर्ण दिवसभर त्यांच्या मर्जीनुसार काहीच झाले नाही.

           हा सामना जणू विक्रमांचाच सामना आहे असे वाटत होते. भारताकडून रविचंद्रन आश्विन व इंग्लंडचा जॉनी बॅरीअस्टोने कसोटींचे शतकं एकत्र साजरा करण्याचा कसोटी क्रिकेट इतिहासातला केवळ चौथा प्रसंग होता. भारताकडून देवदत्त पडिक्कलने कसोटी पदार्पण केलं. भारतातर्फे एकाच मालिकेत पाच खेळाडूंनी कसोटी पदार्पण करण्याचा विक्रम या मालिकेत घडला. रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आकाशदिप व देवदत्त पडिक्कलने हा पराक्रम करण्यात भूमिका निभावली.
            कुलदिप यादवने इंग्लंडच्या डावात पहिल्या सहापैकी पाच गडी बाद करून इंग्लंडच्या शिडातली हवाच काढून घेतली. ३ बाद १७५ अशा सुस्थितीतून २१८ धावात इंग्लंडला गुंडाळण्यात कुलदिपचे पाच, शंभरावी कसोटी खेळणाऱ्या आर.आश्विनने चार, तर रविंद्र जडेजाने एक गडी बाद करून या स्टेडियमच्या इतिहासात एकाच डावात सर्वच्या सर्व दहा गडी फिरकी गोलंदाजांनी बाद करण्याचा विक्रम केला. कुलदिप यादवने आपले कसोटीतील पन्नास बळी या सामन्यात पूर्ण केले. सर्वात कमी १२ कसोटयात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज कुलदिप ठरला.
             इंग्लंडचा झॅक क्राऊली ७९ धावांवर बाद झाला. या मालिकेत तो  ५० ते ८० दरम्यान पाच वेळा बाद झाला. भारताविरूद्ध भारतात अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला सलामीवीर ठरला.
            टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या नावावर विश्वविक्रम नोंदवला आहे.  रोहितने हा विश्वविक्रम कर्णधारपद किंवा फलंदाजीत नाही तर क्षेत्ररक्षणात केला आहे.  रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये किमान ६० झेल घेणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.   इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या डावात मार्क वुडचा झेल घेऊन रोहितने हा विश्वविक्रम केला.  रोहित शर्माचा कसोटी क्रिकेटमधील हा साठावा झेल होता.  रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांमध्ये ९३ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६० झेल घेतले आहेत.  आता त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ६० झेल आहेत.  
             इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वालने पहिल्या डावात पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या.  यासह त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला.  एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा तो भारतीय फलंदाज ठरला.  मुंबईच्या या खेळाडूने ९ डावात २६ षटकार ठोकले. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ डावात २५ षटकार ठोकले होते.  तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे ज्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० डावात २२ षटकार ठोकले होते.  चौथ्या आणि पाचव्या स्थानावर माजी क्रिकेटपटू कपिल देव आणि ऋषभ पंत यांचे नाव आहे, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध ३९ डावांत प्रत्येकी २१ षटकार ठोकले.  
             डावखुऱ्या यशस्वीने कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत.  सर्वात जलद हजार कसोटी धावा पूर्ण करणारा तो  भारतीय सलामीवीर ठरला आहे.  त्याने सोळाव्या डावात एक हजार धावा पूर्ण केल्या.  त्याच वेळी, तो एकंदरीत कसोटी धावा करणारा दुसरा सर्वात वेगवान भारतीय आहे.  विनोद कांबळीने १४ डावात एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

            इंग्लंडला सुरुवात चांगली मिळाली पण उपहारानंतर त्यांच्या फलंदाजांचा उतावळापणा त्यांना नडला व या गोष्टीचा भारतीय गोलंदाजांनी लाभ उठवला. नंतर यशस्वी जयस्वाल व रोहित शर्माने शतकी सलामी देऊन भारतासाठी रेड कार्पेट सुरुवात केली. यशस्वी स्वतःवर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे बाद झाला. त्यामुळे त्याला सुनिल गावस्कारचा एका मालिकेत सर्वाधिक ७७४ धावा करण्याचा विक्रम मोडता आला नाही. त्याच्या एकूण ७१२ धावा झाल्या. भारताचा या सामन्यातला दुसरा डाव बाकी आहे. त्यामध्ये तो गावस्करला मागे टाकू शकतो. पण मला तरी मनोमन वाटतं की भारतीय फलंदाज पहिल्या डावातच इतक्या धावा करतील की दुसरा डाव खेळण्याची वेळच येणार नाही.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close