shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

इन्सानियत (माणूसकी) हाच मोठा धर्म रमजानुल मुबारक -११ (शुक्रवार दि.२२ मार्च २०२४)


रमजान महिन्याचा पहिल्या दहा दिवसांचा भाग (अशरा) काल ( गुरुवार दि.२१ मार्च रोजी) पूर्ण झाला आहे.रहेमत (कृपादृष्टी) चा हा काळ पूर्ण होऊन मगफिरत (माफी) चा दुसरा भाग आज सुरु झाला आहे. कुरआन आणि त्याची शिकवण यावर जे संशोधन,विचारमंथन आजपर्यंत झालेले आहे, त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि कुरआन हा मानवनिर्मित ग्रंथ नाही.कुणा विद्वानाने तो लिहीलेला नाही तर त्यातील शब्द,आयती, सुरए हे साक्षात परमेश्वर अर्थात अल्लाहने निर्माण केले आहे.अरब जगतासह अनेक ठिकाणी कुरआन मधील आयता सारखी वाक्ये तयार करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला पण त्यात कुणी यशस्वी होऊ शकला नाही.त्यातील एक एक शब्द हा मोठा अर्थपूर्ण असून कुरआन हा दैवी ईश्वरीय ग्रंथ आहे.


यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाहच्या आदेशाने ज्यावेळी इस्लामचा प्रसार सुरु केला, त्यावेळी सामाजिक परिस्थिती खूप बिघडलेली होती. सामाजिक अधापतनाच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या होत्या. रानटी प्रवृत्तीनी थैमान घातले होते.गडद अंधारात एक काजवा चमकावा व त्यामुळे क्षणभर तरी तो अंधार दूर व्हावा त्याप्रमाणे हजरत पैगंबरांच्या रुपाने समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक अल्लाहने निर्माण केला.त्यांनी अल्लाह कडून प्राप्त होणारे आदेश लोकांपर्यंत पोहोचविले व नविन समाज निर्मितीचा प्रारंभ झाला.सुरुवातीला हे सर्व आरंभ करतांना हजरत पैगंबरांना मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु जसजसे सत्य समोर येत गेले तसे त्यांचे विरोधकही समर्थक बनले. समाजातील अनेक अनिष्ट प्रथा हजरत पैगंबरांनी झुगारुन दिल्या. इन्सानियत (मानवता), समता व समरसतेचा संदेश समाजाला दिला.आपण सर्व समान आहोत. कुणीही ज्येष्ठ अथवा कनिष्ठ नाही. सर्वजण आपसात भाऊ भाऊ आहोत ही नवी संकल्पना त्यiनी समाजाला दिली. सामाजिक न्यायाच्या अनेक गोष्टी त्यांनी विशद केल्या. 
मुलींच्या जन्माचा तिटकारा करणारांना समज दिली. अल्लाहची उपासना हीच एकमेव भक्ती असून तोच एकमेव उपास्य आहे. इतर कुणीही पूजनीय नाही असे सांगून एकेश्वर वादाचा पाया घातला.
आपसातील भांडण, तंटे,वाद हे निरर्थक असल्याचे सांगून क्षुल्लक गोष्टींवरून रक्तपात करणारांना माणुसकीची शिकवण दिली.सुख,दुःख,हमदर्दी यांची नवी संकल्पना त्यांनी मांडली. ईश्वरभक्ति केल्याने मनाला प्राप्त होणारी शांती हेच जीवनाचे सार आहे हे स्पष्ट केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगा. समाजाच्या प्रति तुमची ही काही कर्तव्ये आहेत हे त्यांनी स्पष्टपणे मांडले.
 स्वार्थ आणि परमार्थ यातील फरक स्पष्ट केला.जो ईतरांच्या भल्यासाठी जगला तोच इन्सान होय ही नवी संकल्पना त्यांनी निर्माण केली. 
जगभरातील सर्व मानव हे ईश्वराचे भक्त आहेत. त्यामुळे कोणीही आपसात द्वेष बाळगू नका ही शिकवण त्यांनी दिली. हजरत पैगंबर यांच्या याच शिकवणुकीनुसार आम्ही श्रीरामपूरमध्ये पयामे इन्सानियत फोरम या सामाजिक सेवेचे कार्य करणाऱ्या संघटनेचे मानवता संदेश फाउंडेशन या नावात रूपांतर करून शहरांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि या आमच्या कार्याला समाजातील सर्व थरातील नागरिक मोठ्या प्रमाणात साथ देत आहेत.धर्म कोणताही असला तरी सर्वांचा उद्देश मानवता अर्थात इन्सानियत हाच आहे आणि या कामासाठी पुढे येणारे लोक समाजामध्ये मोठ्या संख्येने आहेत याची प्रचिती वारंवार येते आहे.सामाजिक उत्तरदायित्वासाठी योगदान देणाऱ्या अशा सर्वधर्मीय मित्रांना या रमजानच्या पवित्र पर्वाच्या निमित्ताने मनापासून धन्यवाद.(क्रमशः)   

 *सलीमखान पठाण (सर)
*श्रीरामपूर - 9226408082
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close