सतरावे आयपीएल बघता बघता सातवा दिवस ओलांडून गेले. सहभागी दहा संघाना प्रत्येकी चौदा सामने या सत्रात प्राथमिक फेरी अंतर्गत खेळायचे असून त्यापैकी दुसरी फेरी अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धेतले दोन प्रमुख संघ मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. आपापले सुरूवातीचे दोन्ही साखळी सामने गमावून हे दोन्ही संघ गुणतालिकेत सध्या तरी तळाला गटांगळ्या खात आहेत.
मुंबईचा संघ कर्णधार हार्दिक पांड्याच्या चुकीचे निर्णय व अरेरावीच्या जंजाळात फसला असून वरकरणी सर्व साफसुत्र भासवले जात असले तरी त्यांच्या गोटात बिलकुल अलबेल दिसत नाही.
तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स जिवघेण्या अपघातातून वाचलेल्या रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळत आहे. त्यांच्या गोटात अंतर्गत कलह दिसत नाहीत. पण अजून टिम मॅनेजमेंट व खेळाडू यांच्यात हवा तितका समन्वय दिसत नसल्याने त्यांचेही वारू विजयाच्या मार्गावरून भटकलेले दिसतात.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुरुवारी स्पर्धेतला नववा सामना खेळला गेला. त्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्सने पाहुण्या दिल्ली कॅपिटल्सला एका रंगलेल्या सामन्यात बारा धावांनी मात देत आपला सलग दुसरा विजय नोंदविला. राजस्थानच्या विजयात खऱ्या अर्थाने हिरो ठरला आसामचा रियान पराग. संपूर्ण सामन्यात त्याचेच वर्चस्व होते हे सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात दिसून आले. जवळ जवळ सर्वच बक्षिसे त्याने मिळवून राजस्थानला रॉयल विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकात पाच बाद १८५ धावा बनविल्या. मात्र प्रत्युत्तरात निर्धारीत षटकात पाच बाद १७३ धावांपर्यंतच मजल मारू शकणाऱ्या दिल्लीला आपला पहिला विजय नोंदविण्यापासून रोखण्यात राजस्थानचे गोलंदाज यशस्वी ठरले. सध्या गुणतालिकेत दिल्ली आठव्या तर मुंबई नवव्या क्रमांकावर आहेत.
राजस्थानच्या डावाची सुरुवात निराशजनक झाली. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालितकेत धावांच्या राशी ओतणारा यशस्वी जयस्वाल पाच, इंग्लिश कर्णधार जोश बटलर ११, व आर आरचा कर्णधार संजू सॅमसन १५ धावांवर बाद झाल्याने राजस्थान रॉयल्स ३ बाद ३६ अशा अडचणीत सापडला. मात्र त्यानंतर या सत्रात चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेला रियान पराग मागच्या काही सत्रात आलेल्या अनुभवातून शिकलेला दिसतो. त्याने रविचंद्रन आश्विनसह ५४ धावा जोडून संघास मोठा हातभार लावला. आश्विनने १९ चेंडूत तीन षटकारांसह २९ बहुमुल्य धावा जोडल्या. त्यानंतर यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने बारा चेंडूत वीस धावा केल्याने राजस्थानच्या धावांना आकार मिळाला. ४५ चेंडूत सात चौकार व सहा षटकारांची आतिषबाजी करत नाबाद ८४ धावांची खेळी करणाऱ्या रियान परागाला डावाच्या शेवटी सातव्या क्रमांकावरील शिमरन हेटमायरने ४३ धावांची भागीदारी करून मोलाची मदत केली. हेटमायर १४ धावा काढून नाबाद राहिला पण तो पर्यंत राजस्थान सुस्थितीत पोहोचले होते. दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार, एनरिच नॉर्खिया, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने एक-एक विकेट घेतली.
विजयासाठी मैदानात उतरलेले दिल्लीचे ऑस्ट्रेलियन सलामीवीर मिचेल मार्श व डेव्हीड वॉर्नरने बऱ्यापैकी ३० धावांची सलामी दिली. पण नांद्रे बर्गरने मार्श २३ व नंतर आलेल्या रिकी भुईचे शुन्यावरच सँडविच बनवून दिल्लीचे भरीत केले. त्यानंतर वॉर्नर व कर्णधार रिषभ पंतने तिसऱ्या गड्यासाठी ६७ धावा जोडल्या. वॉर्नरने ३४ चेंडूत पाच चौकार व तीन षटकारांसह ४९ धावा केल्या तर रिषभने २८ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या पतनानंतर अभिषेक पोरेल चहलचा बळी ठरला आणि दिल्ली पुन्हा पराभवाच्या गर्तेत सापडली. ट्रिस्टन स्टब्स व अक्षर पटेलने ५१ धावांची भागीदारी करून पुन्हा निकराचे प्रयत्न केले. स्टब्स ४४ धावांवर बाद झाला. तर पटेल १५ धावांवर नाबाद राहिला. शेवटच्या षटकात १७ धावांचा बचाव करताना आवेश खानने आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. राजस्थानकडून नांद्रे बर्गर व युजवेंद्र चहलने दोन-दोन बळी मिळविले तर आवेश खानला एक बळी मिळाला.
दिल्लीचा डाव सुरु झाल्यानंतर दोन चेंडूंचा खेळ कुठे झाला आणि मैदानावर एक नाट्यमय प्रसंग घडला. यामध्ये सहभागी होते दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंग टीम आणि डायरेक्टर सौरव गांगुली. प्रत्यक्ष या दोघांनाही नियम व राजस्थान संघ प्रबंधनाने काय निर्णय घेतला याची माहिती नव्हती. त्यामुळे सामना थांबवण्याची वेळ आली. गैरसमजाचं मुख्य कारण होता राजस्थानचा खेळाडू रोवमन पॉवेल. पॉवेल क्षेत्ररक्षणासाठी मैदानात येताच पाँटींग व गांगुली यांनी जोरात आवाज उठवला. राजस्थान रॉयल्सने शेमरान हेटमायरच्या ऐवजी नांद्रे बर्गरला इंपॅक्ट प्लेअर म्हणून नामनिर्देशित केले. परंतु दिल्लीचा डाव सुरू होताना पॉवेलही मैदानात आला. पावेलला राखीव खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणास आणले होते. तेंव्हा पाँटींग व गांगुलीला वाटले की राजस्थानने पाच परदेशी खेळाडू मैदानात उतरवले. वास्तविक या सामन्याच्या मुळ अकरा जणांच्या संघात राजस्थानने चार ऐवजी तीनच परदेशी खेळाडू निवडले होते. हे गांगुली व पाँटिगला माहिती नव्हते. प्रत्यक्षात पॉवेल मैदानात होता तरीही नांद्रे बर्गर, जोश बटलर व ट्रेंट बोल्ट हे चारच विदेशी खेळाडू मैदानात होते व मुळ संघातला हेटमायर बाहेर गेला होता.
गांगुली व पाँटिगने परिस्थितीचे कुठलेही अवलोकन न करता सामन्यात अडथळा आणला व चौथ्या पंचाशी वाद घातला. त्यानंतर मैदानी पंच विनित कुलकर्णी यांनी या दोघांनाही वस्तुस्थिती समजावून सांगितल्याने त्यांचे समाधान झाले व खेळ पूर्ववत सुरु झाला. पण एक गोष्ट मात्र निश्चित की,
गांगुली व पाँटिग खेळाडू म्हणून कितीही मोठे असले तरी परिस्थिती समजून न घेता विवादात अडकलेच आता त्यांच्यावर काय दंडात्मक कारवाई होते त्यावर सर्वांचेच लक्ष असेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
मो. नंबर -९०९६३७२०८२