shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

निष्पाप कोंकरू - प्रभू येशू ख्रिस्त


निर्दोष आणि निष्पाप ख्रिस्ताचे जीवन आणि मरण हा नेहमीच अभ्यासकांसाठी महत्त्वाचा विषय राहिलेला आहे कारण ; ख्रिस्त निरपराध असतानाही त्याच्या पदरी निंदा, कुचेष्टा व हाल-अपेष्टा आल्या. राज मुकुटाचा मानकरी असणाऱ्या स्वर्गीय राजकुमाराच्या शिरावरती काट्यांचा मुकुट चढविला. ज्याच्या कृतीत जीवनाचा सार दडलेला होता त्याला चाबकाच्या फटक्यांचा मार मिळाला. शापित व बदनाम असलेला अवजड क्रूस ख्रिस्ताला वाहावा लागला. चोर दरोडेखोरांना दिली जाणारी वधस्तंभावरील शिक्षा त्याला मिळाली. 
अखेर का? व कोणासाठी? 


या निर्दोष कोंकराला मरण दंडाला सामोरे जावे लागले. का ? या निरपराध कोंकराचा बळी गेला. कोणताही दोष नसताना ख्रिस्ताने विरोध न करता ही शिक्षा का स्वीकारली असेल ?

हा प्रश्न सातत्याने पुढे येतो तो अगदी दरवर्षीच.
 गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार जवळ आला की, असे प्रश्न मनाला भेडसावू लागतात.
खरचं,ख्रिस्ताच्या निर्दोष रक्ताने मानवाच्या पापमुक्तीसाठी ही खंडणी का भरली असेल ? या प्रश्नाच्या मुळाशी जायचे असेल तर आपणांस पवित्र शास्त्र हाती घ्यावी लागते.
पवित्र शास्त्र (बायबल) चे प्रामुख्याने दोन भाग पडतात :-
१) ख्रिस्ताच्या जन्मा अगोदरचा शास्त्र भाग ज्याला 'जुना करार' असे म्हणतात. 
२) ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा शास्त्र भाग ज्याला 'नवा करार' असे म्हणतात.
 जुना करार व नवा करार यांचा अभ्यास करण्या अगोदर 'करार' म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. 
दोन व्यक्तींमध्ये मध्यस्थाद्वारे एखाद्या मुद्द्यावर एका विचाराने झालेली अधिकृत सहमती म्हणजे करार होय.
जगाच्या उत्पत्ती नंतर आपल्या प्रजेशी हितगुज करण्यासाठी परमेश्वर संदेष्ट्यांची निवड करीत असे. याच प्रकारे मोशे नावाच्या संदेष्ट्यांसह अनेक संदेष्टे ज्यांना स्वर्गीय पिता दृष्टांत देऊन आपले म्हणणे कळवीत असे.
 ते म्हणणे जसेच्या तसे हे संदेष्टे लोकांपर्यंत पोहोचवीत असे. थोडक्यात संदेष्ट्यांच्या मध्यस्थीने परमेश्वराचा आदेश,आज्ञा किंवा निरोप देवाच्या प्रजेपर्यंत पोहचविला जात असे व त्याद्वारे परमेश्वर व लोकांमध्ये ज्या गोष्टींवर शिक्कामोर्तब होई त्यास करार असे म्हटले जाई.
हा करार ख्रिस्त जन्मापूर्वीचा व नव्या कराराच्या अगोदरचा असल्याने याला जुना करार असे संबोधतात.
याच जुन्या करारात उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, परमेश्वराने सात दिवसात ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली. या सुंदर सृष्टीवरती अधिराज्य गाजविण्यासाठी त्याने त्याच्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने या दोघांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला की, फलद्रुप व्हा, बहुगुणीत व्हा,  पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.
निर्माण केलेल्या या पुरुष व स्त्री दोघांची नावे अनुक्रमे आदाम आणि हवा असे होते.
 देवाने यांना राहण्यासाठी एक अतिशय मनमोहक बाग निर्माण केली होती. त्या बागेचे नाव एदेन बाग असे होते. या बागेत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्याचा अधिकार देवाने या दोघांना दिला होता. मात्र याच बागेसंदर्भात देवाने एक गोष्ट त्यांना निक्षून सांगितली होती, ती म्हणजे बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या बागेतील मधल्या झाडाचे फळ खाऊ नका. तसे केल्यास तुम्हास मरण प्राप्त होईल.
 परंतु धुर्त सैतानाने मात्र सापाच्या रूपात येऊन आदाम आणि हवेला भुरळ घातली अन् सांगितले की, मधल्या झाडाचे फळ खाल्ले तर तुम्हालाही देवासारखे ज्ञान प्राप्त होईल. सैतानाचे ऐकून हळव्या मनाची स्री असणाऱ्या हवेच्या मनात स्वार्थ निर्माण झाला. तिने त्या झाडाचे फळ स्वतःही खाल्ले आणि आदामाला सुद्धा खाण्यास भाग पाडले. फळ खाताच तात्काळ त्यांना ते नग्न असण्याची जाणीव झाली.
 अर्थात त्यांना बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान झाले. तोपर्यंत ते निष्पाप बालकासारखे होते. त्यांची जाणीव जागृती म्हणजे पापाचा प्रारंभ होता. पापातून मरण हे अटळ असते. आपल्या प्रतिरूपाच्या प्रथम मानवाने केलेली ही कृती देवाला आवडली नाही; कारण माती पासून बनविलेल्या मानवात स्वतःचा श्वास फुंकून देवाने त्यांना जीवन दिलेले होते. मानव ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती होती मात्र मधल्या झाडाचे फळ खाल्ल्याने आज्ञाभंग झाला व देवाने अगोदर सुचित केल्याप्रमाणे मानवास मृत्यू मिळाला. 
पुढे देवाने आदाम आणि हवेला शापित केले, तो त्यांना म्हणाला की, "तुम्ही माती आहात आणि मातीला मिळणार आहात ; कारण मातीतून तुमची उत्पत्ती आहे." घडलेल्या या घटनेने परमेश्वर व्यतीत झाला होता. मानवावरती शाप आल्याने तो अधिक दुःखी झाला होता. कारण परमेश्वर प्रेमस्वरूप आहे, तो दयाळू व क्षमाशील आहे.
 हा शाप मानवावरती कायमस्वरूपी असावा ही गोष्ट देवाला कदापिही मान्य नव्हती. या पापातून मानवाची मुक्तता व्हावी, त्याचे तारण व्हावे, पुनरुत्थनाद्वारे त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून, योहानकृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, "देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले, ते यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे."
 यावरून देवाची मानवावरील प्रीती प्रकट होते. जुन्या करारात आदाम आणि हवेने केलेल्या आज्ञाभंगामुळे शाप अर्थात मरण अधोरेखित होते तर नव्या करारात ख्रिस्ताच्या आगमनाने पुनरुत्थनाद्वारे जीवन अर्थात तारण अधोरेखित होते.

ख्रिस्त जन्मापूर्वी जुन्या करारात पाप क्षालनासाठी किंवा पापाची भरपाई म्हणून देवाला कोंकराचा बळी दिला जात असे. रोमकरांस पत्र आठवा अध्याय व बत्तीसाव्या वचनात मानवास आश्वासित केल्याप्रमाणे स्वर्गीय पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरती पाठविला.

 त्याला पृथ्वीवरती पाठविण्यासाठी माध्यम म्हणून येरुसलमेची निष्कलंक कुमारी पवित्र मारिया हिची निवड परमेश्वराने केली. पवित्र मारिया पवित्र आत्म्याचे योगाने गर्भी संपवली व तिने दैवी योजनेचा आदर करून ख्रिस्ताला जन्मास घातले. 

ख्रिस्ताचे येणे, पृथ्वीवरील जीवन व्यथीत करणे, लोकांना देवाचा संदेश कळविणे, त्याचे दुःखसहन, त्याचा मृत्यू व पुनरुत्थान हे सर्व काही दैवी योजनेचा एक भाग होते. ख्रिस्ताला पृथ्वीवरती साडे तेहतीस वर्षाचे आयुष्य लाभले.

 महामंदीरावरील वयाच्या बाराव्या वर्षी केलेल्या प्रवचना पासून ते आयुष्याच्या शेवटापर्यंत ख्रिस्ताने लोकांना सत्याचे ज्ञान दिले.

 दया, क्षमा व शांतीची महान देणगी दिली.
 याचमुळे तत्कालीन शास्त्री,पंडित दुखावले गेले. येशू ख्रिस्त धर्माच्या आणि राजाच्या विरोधात बोलतो, असा आरोप त्यांनी ख्रिस्तावरती ठेवला.
 लोकांना एकत्र करून त्यांना चिथावणी देऊन ख्रिस्ताच्या विरोधात उभे केले. तत्कालीन राजा पिलात याच्यासमोर आरोपी म्हणून त्याला उभे केले. त्याच्यावरती खटला चालविण्यात आला. पिलात जनसमुदायाच्या दबावाला घाबरला. खरं तर तो जाणून होता की, ख्रिस्त निर्दोष आहे. ख्रिस्ताला शिक्षा करणे त्याला योग्य वाटले नाही म्हणून त्याने त्याला लोकांच्या हवाली केले. यहुदी लोकांनी ख्रिस्ताचा अतोनात छळ केला.

 ख्रिस्तावरती खोटे आरोप करून त्याची निंदानालस्ती केली. त्याच्या तोंडावर थुंकले. त्याला चापकाचे फटके मारिले. त्याच्या मस्तकी काटेरी मुगुट घातला.
 तो रक्तबंबाळ झाला होता. त्याचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले. त्याच्या हातीपायी खिळे ठोकिले. त्याला वधस्तंभी दिले. त्याच्या कुशीत भाला भोकसला. ज्या ख्रिस्ताला जीवनी पाण्याचा झरा म्हणून संबोधले जाते त्याच ख्रिस्ताने पूर्ण झाले आहे, असे म्हणून पाण्याविना क्रूसासावरती प्राण सोडला. शास्त्रलेख पूर्ण झाला. निरपराध कोंकराने मानव जातीची पापातून सुटका केली. पित्याची योजना पूर्ण करण्यासाठी येशूने आपल्या निर्दोष रक्ताने मानवाच्या पापाची खंडणी भरली. समस्त मानव जातीचे तारण झाले. त्याग, धैर्य, संयम, समर्पण, दया, क्षमा, शांती व प्रीतीच्या या अद्वितीय उदाहरणास, या निष्पाप, निर्दोष कोकरांस, प्रभू येशू ख्रिस्तास  शतशः नमन.

- *रवींद्र त्रिभुवन (सर)
   *श्रीरामपूर - 9623280978
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close