कोलकाता नाईट रायडर्सने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सात गडी राखून विजय मिळवला. या सामन्यातील विजयासह केकेआरने आरसीबीविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवली. आरसीबीने शेवटचा केकेआरविरुद्ध सन २०१५ मध्ये विजय मिळवला होता. केकेआरने घरच्या मैदानावर आपला विक्रम कायम ठेवला. या विजयासह कोलकात्याने विराट कोहलीची स्फोटक खेळी निरर्थक ठरविली.
आयपीएल २०२४ च्या दहाव्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने १९ चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले. या विजयासह कोलकात्याने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले. प्रस्तुत लेख लिहीला जाईपर्यंत केकेआरच्या खात्यात चार गुण आहेत तर आरसीबी दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
विजयासाठी १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायणन यांनी केकेआरला दमदार सुरुवात करून दिली. आरसीबीच्या गोलंदाजांवर निशाणा साधत दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयंक डागरने ही भागीदारी मोडली. नारायणने २२ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. त्याने २१३.६३ च्या स्ट्राईक रेटने दोन चौकार आणि पाच षटकारानिशी धावा बनविल्या. त्याचवेळी फिलिप सॉल्टने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने तीस धावा काढल्या.
या सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. संघाला तिसरा धक्का व्यंकटेशच्या रूपाने बसला, २९ चेंडूत अर्धशतक झळकावून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. सोळाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश दयालने त्याचा बळी घेतला. त्याने कर्णधार श्रेयससोबत ७५ धावांची भागीदारी केली. रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पाच धावा करून नाबाद परतला. तर श्रेयस अय्यरने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. त्याने आरसीबीविरुद्ध २४ चेंडूंचा सामना केला आणि १६२.५० च्या स्ट्राइक रेटने ३९ धावा केल्या आणि संघाला विजयी करूनच मैदान सोडले. आरसीबीकडून विजयकुमार, मयंक डागर आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
सामन्याच्या सुरुवातीला आपल्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दमदार कामगिरी केली. घरच्या मैदानाचा फायदा घेत आरसीबीने २० षटकांत सहा गडी गमावून १८२ धावा केल्या. यामध्ये विराट कोहलीच्या नाबाद ८३ धावांचा प्रमुख वाटा होता. त्याच्या या खेळीमुळेच १८३ धावांचे लक्ष्य ठेवणे आरसीबीला शक्य झाले. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. ग्रीन २१ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रसेलने ग्रीनला आपला बळी बनवले.
आरसीबीलला तिसरा धक्का मॅक्सवेलच्या रूपाने बसला, त्याला नारायणने बाद केले. या सामन्यात रजत पाटीदार आणि अनुज रावत प्रत्येकी तीन धावा करून बाद झाले. पुन्हा एकदा पाटीदार फ्लॉप ठरला. त्याचवेळी दिनेश कार्तिकने कोहलीसोबत सहाव्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली. केकेआरकडून आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर सुनील नरेनला एक बळी मिळाला.
या सत्राच्या पहिल्या नऊ सामन्यात होम टिम्सनी विजय मिळविले होते. मात्र या सामन्यात तो पायंडा मोडला व पाहुणे संघही सामना जिंकू शकतात हे इतर संघांना दाखवून देत केकेआरने स्वतःचा वेगळा ठसा जमवला. या सामन्यात आरसीबीची गोलंदाजी लंगडी दिसली. कोणताही गोलंदाज केकेआरच्या जालंदाजांच्या मनात भय निर्माण करू शकला नाही. वास्तविक केकेआरने ज्या घडाक्यात सुरुवात केली होती ती बघता ते हा सामना पंधरा षटकातच जिंकतील असे वाटत होते. परंतु त्यांनी कुठलीही गडबड न करता १९ चेंडू शिल्लक ठेवून उद्दीष्ट गाठले.
सध्या तरी केकेआरची गाडी योग्य ट्रॅकवर सुरू आहे. पण आरसीबीच्या खेळात सातत्य व फलंदाजांतही आत्मविश्वासाचा अभाव दिसत असल्याने ते ट्रॅकवरून घसरल्याचे चित्र दिसत आहे. अजून बरेच सामने बाकी असल्याने प्रत्येक संघाला आपल्या चुका दुरूस्त करण्यास वाव आहे. त्यामुळे कोणत्याही संघाच्या आताच्या कामगिरीवरून तर्क काढणे चुकीचे ठरेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
मो. नंबर -९०९६३७२०८२