shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आश्विन व बॅरिअस्टो बनणार कसोट्यांचे शतकी मनसबदार


         देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जगातील सर्वात उंचावरील क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी ७ मार्चला क्रिकेट जगतातले दोन प्रबळ संघ इंग्लंड व भारत सध्या सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीसाठी मैदानात उतरतील तेंव्हा त्या कसोटीच्या पाऊली काही ऐतिहासिक घटनाही मैदानात वावरणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीला मैदानात उतरतील आणि आपापल्या अंतिम अकरा खेळाडूंची यादी एकमेकांना सुपूर्द करतील तेंव्हा त्या सुचिमध्ये भारताकडून रविचंद्रन आश्विन व इंग्लंडकडून जॉनी बॅरिअस्टोचे नाव असल्यास एक वेगळाच पराक्रम घडेल. एकाच कसोटीत  दोन्ही संघांच्या एकेका खेळाडूची ती शंभरावी कसोटी असेल आणि कसोटी क्रिकेट मधील तो एक दुर्मिळ प्रसंग असणार आहे. याच मालिकेच्या राजकोट येथील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सही आपल्या कारकिर्दीतील शंभरावी कसोटी खेळला आहे.

             सध्या खेळल्या जात असलेल्या या मालिकेचा विचार केला तर इंग्लंडसाठी स्वतःची इभ्रत वाचविण्याची ही शेवटची संधी आहे. अन्यथा यापूर्वीच ते मालिकेत निर्णायक रित्या १-३ असे पिछाडीवर आहे. ज्या डब्ल्यूटीसी अंतर्गत हि मालिका सुरू आहे त्यात सहभागी नऊ देशांच्या गुणतक्त्यात त्यांचे नाव आठव्या क्रमांकावर असून हा सामनाच काय तर पुढचे सर्व सामने जिंकले तरी ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार नाही. मात्र सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या टिम इंडियाच्या वाटचालीत ते अडथळा मात्र आणू शकतात. इंग्लंडने या मालिकेत त्यांचे अलिखित पेटंट असलेले बॅजबॉल सामिकरण वापरले मात्र त्याचा काही एक उपयोग न झाल्याने त्यांच्यावर मालिका संपण्यापूर्वीच हताश होण्याची वेळ आली. इंग्लंडची फुल फ्लो फलंदाजी निकामी ठरली. भारताचे फिरकी गोलंदाज व बुमराहा -आकाशदिप -सिराज हे जलदगती गोलंदाज इंग्लिश फलंदाजांना भारी ठरले. तर भारताच्या एकटा रोहित शर्मा सोडला तर सगळ्याच नवख्या फलंदाजांच्या ताफ्याने इंग्लंडचे नऊ बारा तीन तेरा वाजवले.  भारताच्या फलंदाजांना नवोदित इंग्लिश फिरकी गोलंदाजांनी खूप सतावले पण भारतीय खेळपट्टया दोन्ही संघातील फरक सिध्द करून गेल्या. भारतीय फलंदाजांनी स्पिन व सिमचं गणित हैद्राबाद सोडून इतरत्र चांगल्या पैकी सोडविलं. तर इंग्लिश फलंदाज बॅजबॉलच्या अट्टाहासापायी स्वतःच अडचणीत सापडले. या चुकलेल्या गणिताचा निकाल चौथ्या कसोटी अखेर इंग्लंडच्या विरोधात १-३ असा लागला. इंग्लंडच्या या सफसेल लोटांगण घालण्यामुळे त्यांची जगभर निंदानालस्ती झालीच शिवाय घरच्या माजी क्रिकेटपटू, मिडीयाने चांगलाच महाआहेर केला.
              भारताचा रविचंद्रन आश्विन व इंग्लंडचा जॉनी बॅरिअस्टो आपापली शंभरावी कसोटी धर्मशाळात खेळणार आहे. एवढा मोठा टप्पा गाठणं हे जगभरातल्या मोजक्यात खेळाडूंना शक्य झालं असून बॅरिअस्टो १९७७ ते २०२४ या १४७ वर्षातला शंभर कसोटी खेळणारा इंग्लंडचा केवळ सतरावा खेळाडू आहे. भले भारत दौऱ्यात त्याची कामगीरी त्याच्या लौकिकाला साजेशी झाली नसली तरी एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इंग्लंडसाठी त्याचे या पूर्वीचे योगदान कौतुकास्पद असेच आहे. त्यामुळे तर तो एवढ्या मोठ्या माईलस्टोनपर्यंत पोहोचला आहे. वयाच्या आठव्या वर्षीच त्याच्या वडिलांनी राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. डेव्हीड बॅरिअस्टो हे जॉनीचे वडील इंग्लंडकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणूनच कसोटी खेळले. त्यांची कारकिर्द फारशी लांबली नाही. मात्र जॉनीने त्यांचे सर्वच स्वप्न व्याजा सकट पुर्ण केले. शिवाय जॉनीच्या आईने स्वतः कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करून दोन मुलं निव्वळ वाढविलेच नाही तर त्यातील जॉनीला इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातला महान खेळाडू बनविण्याइतपत स्वतःच्या जीवनाचा त्याग केला. जॉनीकडून या ऐतिहासिक सामन्यात काहीतरी स्पेशल कामगिरी व्हावी ही अपेक्षा इंग्लंड संघ नक्कीच बाळगून असेल.
            या सामन्यातील दुसरा उत्सव मूर्ती आहे टिम इंडियाचा खराखुरा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन आश्विन. १९३२ ते २०२४ या ९२ वर्षातला कसोटीचं शतक गाठणारा १४ वा भारतीय खेळाडू.  तसं बघाल तर आश्विन टिम इंडिया कडून शंभरावी कसोटी खेळत आहे. या दरम्यान त्याने त्याच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने जगभरातील नामवंत फलंदाजांना सळो की पळो करून सोडताना पाचशे बळींचा टप्पा ९८ व्या कसोटीतच ओलांडला. डावात पाच किंवा अधिक बळी घेणारा भारताचा अव्वल खेळाडू ठरला. एखाद्या निव्वळ फलंदाजाप्रमाणे पाच कसोटी शतकं व तीन हजारावर अधिक धावा ठोकून शब्दशः अष्टपैलू कामगिरी केली. मात्र एवढं सारं करून मागील तेरा वर्ष टिम इंडियासाठी अक्षरशः वाहूनही कसोटीत खास करून परदेशात त्याला डावलले जाते. याचा अर्थ त्याचा योग्य तो मानसन्मान केला जात नाही. कधी कधी त्याचा फटका टिम इंडियाला बसलाही आहे. २०२३ मध्येच डब्ल्यूटिसी फायनल व वनडे वर्ल्डकप फायनल भारत ज्या ऑस्ट्रेलिया बरोबर हारला त्या संघात आश्विन नव्हता. महत्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताच्या एकूण गोलंदाजात फक्त आश्विनलाच घाबरतात. शिवाय डावखुऱ्या फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून आश्विनने क्रिकेट जगतात स्वतःची वेगळीच ओळख करून दिली असताना तसेच ऑस्ट्रेलियन संघात डावखुऱ्या फलंदाजांचा भरणा मोठ्या प्रमाणात असतानाही त्यालाच महत्वाच्या सामन्यात न खेळविण्याची चुक इंडियन टिम मॅनेजमेंट करत आले आहे. क्रिकेटच्या नियमांची व चालू घडामोडींची माहिती कदाचित आश्विन सोडून जगातल्या कुठल्याच खेळाडूकडे नसेल, इतका मुळचा पेशाने इंजिनियर असलेला आश्विन बुध्दीमान खेळाडू आहे. म्हणून तर आश्विन केवळ भारतीय क्रिकेटचा हिराच नसून जागतिक क्रिकेटमधील कोहीनूर हिरा आहे.
              
             रविचंद्रन आश्विन व  जॉनी बॅरिअस्टोच्या या पराक्रमी कारकिर्दीचा महत्वाचा टप्पा साजरा होत असताना क्रिकेट रसिकांना दोन्ही संघातील इतर खेळाडू, थिंक टँक यांच्या जुगलबंदीचा अजब नमुना धर्मशाळेत येत्या पाच दिवसात बघायला मिळणार असून येथील वातावरण रक्त गोठविणारे असल्याने खेळाडूंसाठी ती एक सत्वपरिक्षाच ठरणार आहे. इंग्लिश खेळाडू अशा वातावरणाशी जरी चिर परिचित असले तरी मागच्या चार सामन्यांपेक्षा वेगळं चित्र बघायला मिळू शकतं. दोन्ही संघात जलदगती गोलंदाजांना मोठं प्राधान्य मिळू शकतं. तरीही सामन्याचा निकाल सरस फलंदाजी करणाऱ्या संघाच्याच बाजूने लागणार हे मात्र त्रिकलाबादीतील सत्य आहे.


लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close