shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बदलत्या युगात शंभर कसोटींचा टप्पा धोक्यात ?


              सध्या झटपट यश अपेक्षित असलेल्या लोकांचं युग असून कमी श्रमात जास्त काळ टिकणारं मोठं यश प्रत्येकाला हवं असतं. पण शॉर्टकटने मिळविलेलं यश मोठं तर नसतंच अन् चुकून मिळालंच तर त्याचा आनंद दिर्घ काळ टिकणारा नसतो. आता हेच आपण क्रिकेटच्या बाबत बघितलं तर पूर्वीच्या काळी फक्त कसोटी क्रिकेट होतं. कसोटी क्रिकेट म्हणजे पाच दिवस खेळला जाणारा खेळ. हा निव्वळ खेळ नाही तर यामध्ये कसोटीच्या नावाप्रमाणेच खेळाडूची परीक्षा घेतली जाते आणि नुसती परीक्षाच नाही तर सत्वपरीक्षा घेतली जाते. यामध्ये सर्वप्रथम शारिरीक, मानसिक आणि खेळाच्या प्रत्येक क्षेत्रातील कौशल्याचा समावेश असतो. इतका धीरगंभीर खेळाडू जेंव्हा प्रत्यक्ष मैदानावर सातत्याने आपले कर्तृत्व सिध्द करतो तेंव्हा तो दिर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळू शकतो. 

              पण काळाच्या ओघात परिस्थिती बदलली लोकांना झटपट निकालाची ओढ लागली. पाच पाच दिवस बसून कसोटीच्या निकालाची प्रतिक्षा करण्याची लोकांची मानसिकता संपली आणि एका दिवसात संपणारे वनडे क्रिकेट जन्मास घातले तेही अपघाताने. कालांतराने लोकांना वनडे क्रिकेटचाही विट आला. मग चित्रपट थिएटरमध्ये जाऊन एखादा चित्रपट बघून यावे इतक्या कमी वेळात निकाल देणाऱ्या टिट्वेंटीव त्याच्या विविध लिग स्पर्धा या नव्या प्रकाराचा जन्म झाला. या टि२० मुळे निकाल तर झटपट मिळू लागले, पैश्यांचा ओघ वाढला. मात्र खेळाडूंची शारिरीक क्षमता घटू लागली. मोठी मेहनत करून स्वतःला जास्त तंदुरुस्त ठेवण्याची त्यांची तयारीच संपली. खेळाडूंना कसोटी, वनडे क्रिकेट नकोसं वाटायला लागले. अमाप पैसा देणाऱ्या टिट्वेंटीकडे त्यांचा ओघ वाढला. पण खरं क्रिकेट ते विसरले.
             तरीही एवढया मोठ्या स्पर्धेच्या युगात ज्या खेळाडूंना कसोटी क्रिकेटचं महत्व कळलं त्यांनी कसोटीची पाठ सोडली नाही. यामुळेच तर ते क्रिकेटच्या अजरामर ठरलेल्या इतिहासाच्या पुस्तकात घुसले. कसोटी क्रिकेटला १४७ वर्षांचा फार मोठा इतिहास आहे. जवळजवळ तीन हजारच्या आसपास कसोटी खेळले असून ६ मार्च २०२४ पर्यंत जवळ जवळ ५००० पेक्षा जास्त खेळाडूंपैकी फक्त ७६ खेळाडूच शंभर किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी खेळू शकले आहेत. यावरून खेळाडू खरोखर किती तयारीचे व क्षमतेचे आहेत हे सिध्द होते. 
            गुरुवारी, भारत व इंग्लंड यांच्या मालिकेतील पाचवी व शेवटची कसोटी धर्मशाळा येथे सुरू होईल तेंव्हा कसोटीच्या इतिहासातील दोन खेळाडू कसोटींचे शतक पूर्ण करण्याचा पराक्रम करतील तेंव्हा जागतिक क्रिकेटमधील तो केवळ चौथा प्रसंग असेल. धर्मशाळा कसोटीत भारताचा रविचंद्रन आश्विन व इंग्लंडचा जॉनी बॅरिअस्टो आपला शंभरावा कसोटी सामना खेळतील. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्युझिलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात ख्राईस्टचर्च येथे त्यांच्या मालिकेतला दुसरा कसोटी सुरू होईल तेंव्हा न्युझिलंडचे आजी माजी कर्णधार टिम साऊदी व केन विल्यमसन हे आपले वैयक्तिक शंभरावे कसोटी खेळतील. एकाच कसोटीत दोन खेळाडू कसोटींचे शतक पूर्ण करण्याचा हा केवळ पाचवा प्रसंग ठरेल.
             सन २००० मध्ये अशा प्रकारचा पहिला किस्सा घडला तो ओल्ड ट्रॅफोर्ड मधील इंग्लंड व वेस्ट इंडिज कसोटीत. इंग्लंडचे मायकेल आर्थरटन व एलेक स्टुअर्ट आपला शंभरावा कसोटी एकाच सामन्यात खेळले होते. त्यानंतर सन २००६ च्या सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिका व न्युझिलंड कसोटीत तीन खेळाडूंनी कसोटीची सेंच्युरी पुर्ण केली, ते होते द. आफ्रिकेचे जॅक कॅलिस व शॉन पोलॉक तर न्युझिलंडचा स्टिफन फ्लेमिंग. सन २०१३ ला ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील पर्थ कसोटीत इंग्लंडचा अलिस्टर कुक व ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क यांनी हा कारनामा केला.
               एकंदर विचार केला तर कसोटी हेच खरे क्रिकेट आहे. मात्र बदलते मार्केटींग फंडे कसोटी क्रिकेट व खेळाडू यांच्या दरम्यान दरी निर्माण करत आहे. त्याचा परिणाम टि२० या कमी त्रासाच्या खेळाकडे आजची पिढी धावत आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट भविष्यात ऱ्हास नाही पावले तर खुप कमावले असं म्हणावं लागेल. आश्विन, बॅरअस्टो, साऊदी व विल्यमसन यांच्यानंतर नजीकच्या काही दिवसात कसोटीचे शतक पुर्ण करू शकेल असा एकही खेळाडू दिसत नाही. भारताकडून अजिंक्य राहाणे ८५ कसोटी खेळला आहे. मात्र त्याचा सध्याचा फॉर्म व बीसीसीआयचा त्याच्या विषयीचा दृष्टीकोन बघता त्याची गाडी पुढे सरकण्याची शक्यता दिसत नाही. रविंद्र जडेजा सध्या सत्तर कसोट्यांच्या घरात असून त्याचा फिटनेस व वाढते वय याचा विचार करून त्यालाही पुढे जाऊन शंभरी गाठता येईल की नाही हे सांगणे कठीण आहे.

           झटपट क्रिकेटचा प्रभाव वाढता असला तरी काही खेळाडूंची आवड बघून ते कसोटीकडे वळतीलही पण आपली कसोटी कारकिर्द शंभर कसोटीपर्यंत लांबवतील असे वाटत नाही. त्यामुळे असे कारमाने दुर्मिळ होत जातील असेच सध्या तरी वाटते.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close