shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

धोनीच्या छत्रछायेत ऋतूराजचे गुजरातवर राज्य



            होळीचे रंग बाजूला सारून मंगळवारी चेन्नईस्थित चेपॉक स्टेडियमवर सतराव्या आयपीएलच्या पाचव्या दिवशी यजमान चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात जायंटस दरम्यान लढत झाली. आपापल्या पहिल्या सामन्यात अनुक्रमे आरसीबी व मुंबई इंडियन्सला चीत करणाऱ्या सीएसके व जीजी यांच्यातील या सामन्याकडे क्रिकेट रसिक मोठी आस लावून बसले होते. मात्र प्रत्यक्ष सामन्यात संघर्षाची ठिणगी कधीही व कुठेही पडली नाही. उलट चेन्नईने आपले सर्वस्व पणास लावून गुजरातला डोके वर काढण्याची कुठलीही संधी दिली नाही. एकतर्फी सामना काय असतो याचं हा सामना ज्वलंत उदाहरण होत. गुजरातला आपल्या तीन वर्षातल्या आयपीएल करिअर मधला सर्वात मोठा ६३ धावांचा पराभव या सामन्यात स्विकारावा लागला.
            नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर बावरल्यागत गुजरातचा कर्णधार शुभमन गिल गांगरला. फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी हे सांगताना त्याचा गोंधळ उडाला. त्या गडबडीत सामन्याच्या उत्तरार्धात पडणाऱ्या दवाचा लाभ घेण्यासाठी त्याने प्रथम चेन्नईला फलंदाजीस मैदानात धाडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचे सगळेच फासे चुकत गेले आणि त्याचा परिणाम सामन्याचा निकाल त्याच्या विरोधात जाण्यात झाला.



            सीएसकेने नवा कर्णधार ऋतूराज गायकवाड व रचिन रविंद्र यांच्या तुफानी टोलेबाजीच्या बळावर अवघ्या ३२ चेंडूत ६२ धावांची सलामी देत डावाचा भक्कम पाया रचला. २३० च्या स्ट्राईक रेटने केवळ २० चेंडूत ४६ धावांची खेळी करणारा रविंद्र पहिला बाद झाला. अजिंक्य राहाणेने फक्त १२ धावा काढल्या असल्या तरी त्याने कर्णधार ऋतूराजसह ४२ धावा संघाच्या खात्यात वाढविल्या. कर्णधार म्हणून पहिल्या अर्धशतकाच्या जवळ आलेला ऋतूराज ४६ धावांवर परतला. त्यासाठी त्याने ३६ चेंडू घेतले व पाय चौकार व एक षटकार लगावला. त्यानंतर शिवम दुबेच्या रूपात वादळच मैदानात अवतरले. आल्या आल्या दुबेने साई किशोरला षटकाराने सलामी दिली. बावीस चेंडूत अर्धशतक व २३ चेंडूत ५१ धावांच्या आपल्या खेळी दरम्यान दुबेने दोन चौकार व पाच गगनचुंबी षटकार ठोकले. त्याचे हे सातवे आयपीएल अर्धशतक ठरले. दुबने डॅरेल मिचेलसह ५७ धावांची भागीदारी केली. मिचेल २० चेंडूत २४, नवोदित समीर रिझवी सहा चेंडूत १४ धावा व त्यातील श्रेष्ठ स्पिनर राशीदखानला ठोकलेले दोन षटकार सर्वांचे मनं रिझवून गेले. जडेजा ७ धावांवर धावबाद झाला. पण सीएसकेने दोनशेचा टप्पा ओलांडून गुजरात समोर संकटच उभे केले.
             विजयासाठीचे २०७ धावांचे मोठे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल ८, वृध्दीमान साहा २१ यांना दिपक चहारने झटपट पिटाळले. त्यानंतर गुजरातची पडझड सुरूच राहिली. विजय शंकर १२, डेव्हीड मिलर २१, अजमतुल्लाह ओमरजई ११, राहुल तेवतिया सहा, राशिद खान एका धावेवर बाद झाले तर उमेश यादव १० व स्पेंसर जॉन्सन पाच धावांवर नाबाद राहिले. २० षटकात ८ बाद १४३ धावांवर आटोपला. दिपक चहार, मुस्तफिजुर रहमान व तुषार देशपांडेने प्रत्येकी दोन बळी मिळविले तर डॅरेल मिचेल व मथीशा पथिराना यांना एक-एक विकेट मिळाली.
            सीएसकेच्या फलंदाजांची नेत्रदिपक कामगिरी व गोलंदाजांचा टिच्चून केलेला मारा जितका प्रभावशाली होता तितकेच त्यांचे मैदानी क्षेत्ररक्षण वाखाणण्या योग्य होते. खास करून वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी महेंद्रसिंग धोनीने ०.६ सेकंदात २.३ मीटर सुर मारून घेतलेला विजय शंकरचा मिचेलच्या गोलंदाजीवर घेतलेला झेल त्याच्या तंदुरुस्तीचा दाखला देण्यास पुरेशा आहेत.
            गुजरातच्या डावातील बाराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर मिलरने लॉफटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो शॉट डीप मिड-विकेटवर हवेत मारला. अजिंक्य राहाणे खूप मागे होता, पण त्याने पुढे धावत डायव्हिंग करत उत्कृष्ट झेल घेतला. ३५ वर्षांचा उडता राहाणे बघून बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहिले नसेल.
            तर नवा कर्णधार ऋतूराज गायकवाड माजी कर्णधार एम एस धोनीच्या छत्रछायेखाली चांगलाच तयार होत असून तोही धोनीसारखाच थंड डोक्याने निर्णय घेताना दिसून येतो. चेन्नईचे भविष्य गायकवाडच्या रूपाने सुरक्षित हाती गेल्याचे सध्या तरी दिसत आहे. आगामी काळ मात्र त्याच्यासाठी निश्चितच कसोटीचा असेल यात तिळमात्र शंका नसावी.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close