shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

धोकाधडी हा मोठा गुन्हा .... रमजानुल मुबारक -२२


रमजान महिन्याचे काही दिवस म्हणजे साधारण आठवडा शिल्लक आहे. आता दिवसभर तहानलेल्या अवस्थेत उपाशी राहण्याची सवय सर्वच रोजेदारांना झाली आहे तर शेवटच्या दिवसातील बडे रोजे धरण्याची भूमिका आबालवृध्दांसह सर्व धर्मिय बंधू भगिनी घेत आहेत.कुरआन शरीफचे पठन पूर्णत्वाकडे चालले आहे.ईदची खरेदी जोरात सुरु आहे. जकात,फितरा आदा होत आहे.रात्री उशीरापर्यत जागून लैल तुलकद्र चा शोध घेतला जात आहे.अल्लाहच्या प्रति नितांत श्रध्दा बाळगून सर्व प्रकारचे धार्मिक कार्य जोमाने केले जात आहे. 

कुरआन मध्ये अल्लाहने स्पष्ट केले आहे कि, या दुनियेत केलेल्या प्रत्येक कृत्याचा जाब (हिशोब) तुम्हाला दयावा लागेल. या दृष्टिने आपण सचेत होऊन जीवन जगले पाहिजे. कुणी जर आपल्याकडे काही अमानत दिली असेल तर तिचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.विश्वस्त म्हणून तुमच्यावर एखादी जबाबदारी दिली असेल तर त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे यातूनच आपली नैतिकता जपली गेली पाहिजे. कुणी विश्वासाने काही गोष्टी आपल्याला सांगितले असतील तर त्या दुसरीकडे जाणार नाही याची दक्षता देखील आपण घेतली पाहिजे ही सुद्धा मोठी अमानत आहे.दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेथे आपली खरी कसोटी असते. यावेळी आपण एखादया आमिषाला किंवा लालसेला बळी पडलो नाही तर आपण जिंकलो. पण जर आपण या सोपविलेल्या अमानत मध्ये खयानत करण्याचा प्रयत्न केला तर आपली विश्वासार्हता नष्ट होते.   


एका मित्राने त्याच्या सांगण्यावरुन दुसऱ्या एका मित्राला कर्ज काढून काही रक्कम उधार दिली.त्याने केलेल्या वायदयाप्रमाणे मुदतीत ती रक्कम परत केली.ज्या दिवशी रक्कम दयायची त्या दिवशी  घेणारा बाहेर असल्याने त्याने पहिल्या मित्राकडे ठेव,मी सायंकाळी घेतो असे सांगितले. त्याने मित्राकडे रक्कम दिली. या मित्राला पैसे पाहून अडचण आठवली.त्याने घेणाऱ्या मित्राला सांगितले कि मला पैशाची आवश्यकता आहे मी तूला आठ दिवसांनी ही रक्कम बँकेच्या होणाऱ्या व्याजासह परत करीन. मित्र प्रेमापोटी त्याने होकार दिला.तीन वर्ष झाले तरी ती रक्कम पूर्ण परत मिळाली नाही. थोडे थोडे करुन तीन वर्षात काही रक्कम मिळाली मात्र पूर्ण रक्कम मिळाली नाही व बँकेचे दरमहा चे व्याज ही सोसावे लागत आहे. ही एक सत्य घटना आहे. मैत्रीमुळे काही बोलता येत नसल्याने मित्र बिचारा गप्प आहे. मध्यंतरी बिचारा गंभीर आजारी पडला तरी या मित्राने पैसे दिले नाही अशा प्रकारचे व्यवहार अल्लाह ला मान्य नाही. दिलेले शब्द जे पाळतात तेच खरे अल्लाहचे पाईक समजावेत अन्यथा अल्लाह व त्याच्या रसूलचे नाव घेऊन खोटे बोलणारे, फसवणूक करणारे, गंडविणारे,धोका देणारे खूप लोक समाजात आहेत. त्यांच्या या वागण्यामुळे समाज बदनाम झालाय तर दुसरीकडे दिलेला शब्द पाळणारे,त्यासाठी स्वतः मोठा तोटा सहन करणारे ही समाजात आहेत.
कुरआन मध्ये अल्लाहने जीवन जगतांना घडणाऱ्या प्रत्येक घटनेबाबत मार्गदर्शन केले आहे.कसे वागावे, कसे रहावे, व्यवहार कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन कुरआन मध्ये केलेले आहे. एखाद्या संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असेल तर त्या ठिकाणी सचोटीने कारभार करणे आपले कर्तव्य आहे. संस्थेच्या पदाचा दुरुपयोग स्वतःच्या हितसंबंधासाठी करणे पाप आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना धोका देणे हा मोठा अपराध आहे. कयामतच्या दिवशी प्रत्येक केलेल्या कृर्त्याचा जाब द्यावा लागेल ही जाणीव ठेवून प्रत्येकाने वागले पाहिजे.(क्रमशः)

*सलीमखान पठाण (सर)
*श्रीरामपूर - 9226408082
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close