shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

फलंदाजांचा नाकर्तेपणा चेन्नईला नडला


              आयपीएलच्या सतराव्या सत्रातील पंधराव्या दिवशी आपल्या घरच्या मैदानावर खेळताना सनरायझर्स हैद्राबादने पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जला फलंदाजीच्या फडावर उघडे पाहून आपली पताका फडकवली. शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने पाच गडी गमावून १६५ धावा काढल्या.  प्रत्युत्तरात हैदराबादने सोळा चेंडू बाकी असताना चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.  हैदराबादसाठी एडन मार्करामने ३६ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावांची खेळी केली.  संघाला अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने वेगवान सुरुवात करून दिली. त्याचा फायदा सनरायझर्सला झाला.  चेन्नईकडून मोईन अलीने दोन बळी घेतले.  या आधी चेन्नईचा दिल्ली कॅपिटल्सकडूनही पराभव झाला होता आणि या मोसमात त्यांना सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.  अभिषेकला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

           लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी तुफानी खेळी केली.  दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली.  अभिषेक शर्माने डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या मुकेश चौधरीचा चांगलाच समाचार घेतला. अभिषेकने तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारून मुकेशचे जोरदार स्वागत केले.  यानंतर त्याने पुन्हा पाचवा चेंडू सीमापार पाठवला.  हा चेंडू नो बॉल घोषित करण्यात आला आणि त्यानंतर अभिषेकनेही फ्री हिटवर षटकार ठोकला.  चेन्नईसाठी हे षटक चांगलेच महागात पडले.  त्याआधी हैदराबादच्या डावाच्या दुसऱ्या चेंडूवर मोईन अलीने ट्रॅव्हिस हेडचा सोपा झेल घेतला.  त्यावेळी त्याने खातेही उघडले नव्हते.

            अभिषेक बाद झाल्यानंतर हेडने एडन मार्करामसह डाव पुढे नेला आणि त्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला.  त्याने सतत शॉट्स खेळले आणि पॉवरप्लेच्या शेवटपर्यंत चेन्नईला कुठलीही संधी दिली नाही.  पॉवरप्लेपर्यंत हैदराबादने एक बाद ७८ धावा केल्या होत्या, या धावा आयपीएलच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.  हेड हळूहळू आपल्या अर्धशतकाकडे सरकत होता, मात्र महेश तिक्षाणाने हेडला बाद करून हैदराबादला दुसरा धक्का दिला.

             हेड आणि अभिषेक यांनी हैदराबादच्या विजयाचा पाया रचला होता, पण संघाला लक्ष्य गाठण्याआधीच त्यांनी आपले बळी गमावले. त्यानंतर मात्र मार्करामने जबाबदारी स्विकारली.  पूर्णपणे जोमात फलंदाजी करताना त्याने ३६ चेंडूंत  चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने पन्नास धावा केल्या.  मात्र, मार्करामने अर्धशतक पूर्ण करताच स्वतःची विकेट गमावली.  त्याला मोईन अलीने पायचित केले.  त्याच्यानंतर मोईननेच शाहबाज अहमदलाही पायचितच्या जाळ्यात घेरले. मात्र, हेन्रिक क्लासेन (नाबाद दहा) आणि नितीश रेड्डी आठ चेंडूंत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १४ धावा करून नाबाद परतले.

           तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सीएसकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.  चेन्नईच्या डावाची सुरुवात  कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी केली..  ऋतुराज गायकवाडने रचिनसह संघाला वेगवान सुरुवात करून दिली, मात्र भुवनेश्वर कुमारने ही भागीदारी संपुष्टात आणली.  सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने संघाला पहिले यश मिळवून दिले.  चौथे षटक टाकायला आलेल्या भुवनेश्वरने रचिन रवींद्रला झेलबाद केले.  रचिन नऊ चेंडूत बारा धावा करून बाद झाला.  मग गायकवाडने अजिंक्य राहाणेसह डाव पुढे नेत पॉवरप्लेच्या शेवटपर्यंत हैदराबादला आणखी यश मिळवू दिले नाही.  मात्र, जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असलेल्या सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनेही आठव्या षटकात आपली विकेट गमावली.  शाहबाज अहमदने गायकवाडला आपला बळी बनवले.  गायकवाड २१ चेंडूत २६ धावा करून परतला.

               सुरुवातीच्या अपयशानंतर, युवा फलंदाज शिवम दुबे आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सीएसकेच्या डावाची धुरा सांभाळली.  रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांना बाद केल्यानंतर शिवमने जबाबदारी स्विकारत शाहबाज अहमद आणि मयंक मार्कंडेय यांच्यावर निशाणा साधला.  शिवमच्या झटपट खेळीमुळे सीएसकेने नऊ षटकांअखेर दोन बाद ८० धावा केल्या होत्या.  गायकवाड बाद झाल्यानंतर शिवम मैदानात आला आणि उतरताच त्याने शाहबाज अहमदवर एक षटकार आणि चौकार लगावला.  यानंतर पुढचे षटक टाकण्यासाठी आलेल्या मयंकचेही चौकार मारून स्वागत करण्यात आले.  सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संथ सुरुवातीपासून सावरत शिवम दुबेने वेगवान खेळ सुरूच ठेवला.  शिवम आणि राहाणेने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

              सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने सीएसकेचा युवा फलंदाज शिवम दुबेला बाद करून संघाला तिसरे यश मिळवून दिले.  शिवमला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही, कमिन्सने त्याची शानदार खेळी संपुष्टात आणली.  शिवम २४ चेंडूत ४५ धावा करून बाद झाला.  सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने सीएसकेला चौथा धक्का दिला.  यानंतर चेन्नईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे ३० चेंडूत ३५ धावा करून बाद झाला.  अशाप्रकारे सनरायझर्सने सीएसकेचा डाव डळमळीत केला.  चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघाचा डाव सांभाळला.  जडेजाने वेगवान खेळ करत सीएसकेची धावसंख्या दिडशेच्या पुढे नेली, पण विसाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर टी नटराजनच्या चेंडूवर डॅरिल मिचेलने त्याची विकेट गमावली.  मिचेलने अकरा चेंडूत १३ धावा केल्या.

               सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शेवटचे तीन चेंडू खेळण्यासाठी मैदानात आला.  तो क्रीझवर येताच हैदराबादमधील प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले.  धोनी चेन्नईत नव्हे तर हैदराबादमध्ये खेळायला आला होता, असे वाटले नाही, तेही या संघाचे घरचे मैदान असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध.  धोनी मात्र दोन चेंडूंवर एक धाव घेत नाबाद परतला.  यापूर्वी, धोनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता आणि त्याने १६ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी खेळली होती.  मात्र, अष्टपैलू रवींद्र जडेजा शेवटपर्यंत टिकून राहिला आणि त्याने २३ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने ३१ धावांची नाबाद खेळी खेळली.  केवळ जडेजा आणि शिवमच्या खेळीच्या जोरावर चेन्नईला संघर्षपूर्ण धावसंख्या उभारता आली.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close