रमजान हा उपवासाचा (रोजा) महिना,काहींसाठी खाण्याचा तर काहींसाठी इफ्तार पार्ट्यांच्या आयोजनाचा महिना. इस्लामी शरीयतने त्याज्य (हराम) ठरविलेले गैरकाम, व्यवसाय धंदे केवळ एक महिन्यापूरते बंद करण्याचा काहींसाठी हा महिना.
" रमजान एक महिन्याचा "असे मनात ठरवून घेतल्याने अनेकांचा रस्ता चुकतो तो येथेच.
शरीयत ने घालून दिलेला नियम म्हणून दिवसाचे काही तास अन्न, पाणी न घेता उपाशी राहणे येथेच रोजाचा अर्थ संपत नाही.
रोजा हा मानवाच्या अंतरीच्या शुद्धी ची साधना आहे. स्वयम्शिस्तीसाठी मनापासून करायची मनाची एक मशागत आहे. भूक, लैंगिक गरज, आराम या मूलभूत गरजांना मर्यादा असते पण मनाची मर्जी अमर्याद असते.
इस्लामने मानवाच्या इच्छेवर त्यासाठी शरीयतचा लगाम घातला आहे. तब्येत म्हणजे मनाची मर्जी तर शरीयत म्हणजे रब (अल्लाह).
मर्जी, ईमान, नमाज, जकात, रोजा, हज ही शरीयतची फर्ज आचारण तत्वे आहेत. इस्लाम, शरीयत काही समस्या निर्माण झाल्या किंवा त्या निर्मिला गेल्या, त्या या थिअरी व प्रॅक्टिकलच्या गोंधळातून झाल्या आहेत. या मुस्लिमांना थियरीचे ज्ञान आहे, इस्लामचा अभ्यास आहे ते प्रत्यक्ष आचरणात मागे असतात.
ज्यांचा अभ्यास नाही,असे भोळे कुणाचेही बोट धरून चालतात. चार चांडाळाने निर्माण केलेल्या संशयित चष्म्यांनी मसजीद, मदरशांकडे वा मुस्लिमांकडे पाहण्याची घातकी वृत्ती संपवून निकोप वातावरण निर्मितीचा कमी अशा मुस्लिमांचे प्रबोधन जास्त गरजेचे असल्याचे वाटते.
मनाची शिस्त, जीवनाची शिस्त या हेतूने ट्रेनिंगचा महिना म्हणजे रमजान. या महिन्यात एका ईश्वराची अल्लाहची मर्जी निभावताना सारी मानवता एकसमान जीवन पद्धतीवर स्वतःला चालवते.
श्रीमंत असो वा गरीब, काळा- गोरा, शहरी-ग्रामीण, साक्षर - निरक्षर हेच स्तर विलीन होतात.
अल्लाहच्या मर्जीवर भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी रोजाची तयारी म्हणून जेवण्याला सहेरी म्हणतात. साखर झोपेची वेळ असते पण झोपावे ही मनाची मर्जी असते. पण झोप मोडून सहेरी करावी ही रब मर्जी असते. सहेरीची ठरलेली अंतिम वेळेची हद्द एका मिनिटाने ही ओलांडता येत नाही. हा अल्लाहच्या मर्जीवर मनाला शिस्तीचा पहिला धडा.
दिवसभरात असत्य कथन, शिव्या-शाप, निंदानालस्ती, दुसऱ्यांची चेष्टा, दुसऱ्यांबद्दल संकुचित वृत्ती बाळगणे, यापासून पथ्य हा जिभेचा रोजा. सिनेमा, तमाशे, दूरदर्शन शरीयतने ठरविलेल्या गोष्टी पाहणे वर्ज्य, हा डोळ्यांचा रोजा. सर्व प्रकारची मनमर्जी रोजाच्या माध्यमातून रमजान महिन्यात अनुशासित करण्यात येते ही जीवनाची धारणा करण्यासाठी याला फक्त रमजानसाठी, महिनाभरापूर्वी ते समजणे म्हणजे रमजान महिन्याला न समजण्यासारखे आहे.
भुकेची आग ज्यांनी आयुष्यभर अनुभवली नाही, त्यांना रोजाच्या निमित्ताने गरिबांच्या स्थितीची जाणीव होऊन सहृदयता वाढवावी. दान वृत्ती वाढावी हाही रमजान निमित्ताने शिस्तीचा चा धडा आहे. दिवसभराच्या रोजाने मनाचे मालिन्य किती झडते, ईश्वराप्रती प्रेम भय यांचा मनावर ताबा किती बसला, हे अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याची वेळ म्हणजे इफ्तार पार्ट्या यातला कोणत्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात, कोणते सामाजिक मूल्य अशा पार्टीतून समजले जाते?
मूल्य, पावित्र्य, आत्मपरीक्षण या दूरच्या गोष्टी. पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या " प " च्या वावटळीत दिशा ठरवलेल्या पार्ट्या, अलिकडे शक्ती प्रदर्शनासाठी, समाजकारणाच्या नावाखाली राजकारणासाठी वापरल्या जाव्यात ही विकृती संवेदनशील मनाला बोचणारी आहे.
मानवतावादी मूल्यांचा आशय असावा,सामाजिक ऐक्य जपलं जावं. राजकारण्यांनी निर्माण केलेल्या दर्या बुजून मनोमिलन घडावे, अशा उदात्त हेतूने आयोजिले जाणारे इफ्तार कार्यक्रम आज नाममात्रच आहेत.
रमजान हा मनाच्या मशागतीचा हृदयांच्या विकसनाचा महिना. कुराण हदीस मधील सुंदर जीवनाचे तत्वज्ञान प्रत्यक्ष आचरण करायला लावणारा ट्रेनिंगचा महिना. थोड्या गांभीर्याने घेतला तर रमजान पूर्ण वर्षभरासाठी आणि आयुष्यभरातील एकेक दिवसासाठी ईदचा दिन ठरेल, असे मला वाटते.
*हाजी शफीक बागवान*
श्रीरामपूर - *9860400685*
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*