इंदापूर:- नियतीने जन्मता: अपंग बनवलेली १३ वर्षीय तनुजा गणेश शेळके ही सध्या आजच्या तरुण पिढीला आदर्शवत ठरली आहे.त्याचे कारणही खास आहे,कारण नशिबी आलेल्या अपंगत्वाचा कोणताही न्यूनगंड मनामध्ये न बाळगता ही आबला बालिका आपल्या वडिलांचा व्यवसाय मोठया जिद्दीने संभाळून कुटुंबाला हातभार लावत आहे.
ही कहाणी आहे भिगवण ता.इंदापुर येथील तनुजा गणेश शेळके या बालिकेची..!!
आजकाल समाजामध्ये एखाद दुसऱ्या अपयशाने नैराश्येच्या गर्तेत अडकलेले अनेक तरुण जीवनात हतबल झालेले बघायला मिळतात.परंतु तनुजाची जिद्दी कहाणी अशा मानसिकतेवर झणझणीत अंजन घालणारी अशीच आहे.
मणक्याने अपंग असलेल्या तनुजाला पूर्ण क्षमतेने शाररीक हालचाल करता येत नाही तसेच तिला उठता-बसता ही येत नाही.मात्र असे असताना सुद्धा याचा कसलाही संकोच न बाळगता ती शुद्ध पाणी पुरवठ्याचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहे.
सहा महिन्यापूर्वी आमदार दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भिगवणला आले असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्या कानावर तनुजाविषयी सांगितल्यावर त्यांनाही तिला भेटण्याचा मोह आवरता आला नाही.यावेळी तनुजा विकलांगतेवर मात करुन ज्या जिद्दीने व्यवसाय सांभाळत आहे,तिचा आत्मविश्वास पाहून श्रीराज भरणे सुद्धा क्षणभर अवाक झाले.तनुजाच्या अविस्मरणीय कर्तृत्वाने मोहीत झालेल्या श्रीराज भरणेंनी तिला व्हील देण्याचे आश्वासन दिले होते.आणि आज हा शब्द खरा करत त्यांनी तनुजा शेळके हिस नवीकोरी व्हीलचेअर भेट दिली.