shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सीएसके पुन्हा विजयी रथावर आरूढ


              सोमवारी, सन २०२४ च्या आयपीएलचा बावीसाव्या सामन्यात चेन्नईमध्ये सीएसके जुन्या लयीत परतल्याचे दिसले. सलग दोन सामने गमावल्यानंतर, चेन्नईने आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळविला, तर केकेआरला या हंगामात पहिला पराभव स्विकारावा लागला.  प्रथम फलंदाजी करताना केकेआरने वीस षटकांत ९ गडी गमावून १३१ धावा केल्या.  प्रत्युत्तरात चेन्नईने १७.४ षटकांत ती गडी गमावत १४१ धावा करून सामना जिंकला. रविंद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांच्या शानदार गोलंदाजीनंतर चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या ५८ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने खेळलेल्या ६७ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सात गडी राखून पराभव केला.  


             कोणत्याही संघासाठी पाचवेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सला त्याच्या घरच्या मैदानावर अर्थात चेपॉक स्टेडियमवर पराभूत करणे सोपे नाही, परंतु केकेआरचा विचार केला तर या दोन वेळच्या विजेत्या संघासाठी सीएसकेला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे खूप कठीण होते.  जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, केकेआरने आयपीएलमध्ये चेपॉक स्टेडियमवर एकूण १४ सामने खेळले आहेत आणि दहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर केवळ चार सामन्यांमध्ये यश मिळाले आहे.  तर चेन्नईने या स्टेडियमवर केकेआर विरुद्ध एकूण ११ सामने खेळले आहेत आणि त्यातील नऊ सामने जिंकले आहेत.  हा सामना एकतर्फी जिंकून चेन्नईने पुन्हा एकदा घरच्या मैदानावर केकेआरविरुद्ध आपला दबदबा कायम ठेवला आहे.

                या विजयानंतर चेन्नईचा संघ तीन विजय आणि दोन पराभवांसह पाच सामन्यांत सहा गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.  मात्र, या पराभवानंतरही कोलकाता संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.  पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे, त्यांनी चार पैकी चारही सामने जिंकले असून आठ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.  आता या स्पर्धेत राजस्थानचा संघ असा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

            या सामन्यात केकेआरचे फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले, तर ऋतुराजने कर्णधाराची जबाबदार खेळी खेळून चेन्नईला विजय मिळवून दिला.  चेन्नईने पहिले दोन सामने जिंकले होते, मात्र शेवटच्या दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.  त्यामुळे ऋतुराजच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र या सामन्यात दमदार कामगिरी करत त्याने टिकाकारांना गप्प केले.  लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेने लवकरच रचिन रविंद्रच्या रूपाने पहिली विकेट गमावली.  रचिन १५ धावा करून वैभव अरोराचा बळी ठरला.  यानंतर ऋतुराजने डॅरेल मिचेलसह डाव पुढे नेला आणि दोन्ही फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.  ऋतुराज आणि डॅरेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला.  मात्र, डॅरेल २५ धावा करून सुनील नारायणच्या गोलंदाजीवर बाद झाला.  त्यानंतर शिवम दुबेने झटपट धावा केल्या, मात्र वैभवने त्यालाही बाद करत सामन्यातील त्याची दुसरी विकेट घेतली.  शिवमने १८ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २८ धावांची खेळी खेळली.  यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात आला आणि चेपॉक स्टेडियमवर प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले.  धोनी एक धाव घेत नाबाद परतला आणि गायकवाडने सीएसकेसाठी विजयी चौकार ठोकला.

            तत्पूर्वी, सीएसकेने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने कर्णधार ऋतुराज गायकवाडचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले.  त्याने पहिल्याच चेंडूवर केकेआरचा सलामीवीर फिल सॉल्टला बाद करून संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले.  सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा सॉल्ट केकेआरचा पाचवा फलंदाज ठरला.  त्याच्या आधी ब्रेंडन मॅकलम, मनोज तिवारी, जॅक कॅलिस आणि जो डेन्ली हे केकेआरसाठी पहिल्याच चेंडूवर बाद झालेले फलंदाज होते.  त्याचवेळी, पहिल्या चेंडूवर यश मिळवणारा तुषार सीएसकेचा तिसरा गोलंदाज ठरला.  त्याच्या आधी लक्ष्मीपती बालाजी आणि दिपच चहार यांनी अशी कामगिरी केली होती.

           पहिल्या धक्क्यानंतर सुनिल नारायण आणि अंगकृष रघुवंशी यांनी केकेआरचा डाव सांभाळला.  नारायणने तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या तुषार देशपांडेचा खरपूस समाचार घेताना त्या षटकात १९ धावा वसूल केल्या. नारायणने सलग दोन चेंडूंत दोन चौकार मारून तुषारचे स्वागत केले. यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर चौकार मारला आणि पाचव्या चेंडूला षटकार खेचला.  त्याचप्रमाणे पुढचे षटक टाकायला आलेल्या शार्दुल ठाकूरचे रघुवंशीने चौकार मारून स्वागत केले.  त्यानंतर नारायणनेही शार्दुलवर जोरदार चौकार मारला.  दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत पाच षटकांअखेर ५० धावा स्कोअर बोर्डवर लावल्या.  पॉवरप्ले संपेपर्यंत केकेआरने एक बाद ५६  धावा केल्या होत्या,  सीएसकेसाठी चेपॉक स्टेडियमवर या मोसमातील हे सर्वात महागडे पॉवर प्ले ठरले.  या दरम्यान नारायण आणि रघुवंशी पुन्हा एकदा केकेआरला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जातील असे वाटत होते, पण ऋतुराजने जडेजाकडे चेंडू सोपवला आणि पहिल्याच चेंडूवर रघुवंशीला बाद करून केकेआरला दुसरा धक्का दिला.  रघुवंशी १८ चेंडूत २४ धावा करून परतला.

             या सामन्यात जडेजा आणि तुषारने अप्रतिम गोलंदाजी केली.  एकीकडे तुषारने पहिल्याच षटकात संघाला यश मिळवून दिले, तर जडेजाने नारायण आणि रघुवंशी ही जोडी फोडताना जडेजाने सीएसकेसाठी धोकादायक ठरणाऱ्या नारायणला डग आऊटचा रस्ता दाखवला. त्याने २० चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या.  त्यानंतर पुढच्याच षटकात व्यंकटेश अय्यरला बाद करून जडेजाने सामन्यातील तिसरा बळी मिळविला. व्यंकटेश पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आणि त्याने आठ चेंडूंत केवळ तीन धावा केल्या. जडेजाप्रमाणे तुषारनेही शानदार गोलंदाजी करत रिंकू सिंग आणि आंद्रे रसेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  रिंकू १४ चेंडूत ९ धावा तर रसेल १० चेंडूत दहा धावा करून बाद झाले.  तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.

              केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने अतिशय संथ फलंदाजी केली आणि धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला. श्रेयसने ३२ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३४ धावांची खेळी केली.  केकेआरच्या डावात श्रेयसने सर्वाधिक धावा केल्या होत्या, पण या काळात त्याचा स्ट्राइक रेट १०६.२५ होता, जो टी-२० मध्ये चांगला मानला जात नाही.  आयपीएलनंतर लगेचच टि२० विश्वचषक आयोजित केला जाणार आहे आणि श्रेयस आतापर्यंत आपल्या फलंदाजीने छाप पाडू शकला नाही.  या सामन्यात श्रेयसला चमकण्याची संधी होती, मात्र त्याला येथेही संधीचा फायदा उठवता आला नाही.
             या सामन्यादरम्यान जडेजाने गोलंदाजी सोबतच क्षेत्ररक्षणातही चमकदार कामगिरी केली.  त्याने आयपीएलमध्ये स्वतःचे झेलांचे शतक पूर्ण करण्याचा पराक्रम केला. आयपीएलमध्ये १०० झेल  पकडण्याचा कारनामा करणारा जडेजा हा पाचवा खेळाडू आहे. त्याच्याआधी विराट कोहली, सुरेश रैना, किरॉन पोलार्ड आणि रोहित शर्मा यांनी ही कामगिरी केली आहे.  आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर असून त्याने आतापर्यंत ११० झेल टिपले आहेत.

             एकंदर विचार केला तर या सामन्यातून सीएसके पुन्हा विजयीपथावर परतले असून अंतिम चार संघात पोहोचण्याच्या त्यांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत. नवा कर्णधार ऋतूराज गायकवाड महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनात ते कार्यही शब्दशः आघाडीवर राहूनच पुर्ण करेल असेच चित्र दिसू लागले आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close