shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पंजाबने गुजरातच्या तोंडातला घास पळविला



           क्रिकेट हा खरोखर किती अनिश्चिततेचा खेळ आहे हे समस्त क्रिकेट जगताला गुरुवारी रात्री पुन्हा एकदा समजले. आयपीएलच्या सतराव्या मोसमातील चौदाव्या दिवशी सोळाव्या सामन्यात पंजाब किंग्ज व गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या अतिशय रोमहर्षक सामन्याने क्रिकेट शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे तर फेडलेच पण एक चित्तथरारक अनुभवही मिळाला. आपल्या घरच्या मैदानावर म्हणजे अहमदाबादेत खेळताना गुजरातने आपले सर्वस्व पणास लावले पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. पंजाबने गुजरातला जवळ जवळ गमावलेल्या सामन्यात तीन गड्यांनी मात देत चौथ्या सामन्यात आपला दुसरा विजय नोंदविला. स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यात यजमान संघ सामने जिंकत होते. पण मागील काही सामन्यांपासून पाहुणे संघ बाजी मारून जात असल्याचे चित्र आहे.

           प्रथम फलंदाजी करताना गुजरातने कर्णधार शुभमन गिलच्या ४८ चेंडूतील नाबाद ८९ धावांच्या बळावर ४ बाद १९९ अशी मजल मारली. गिलने आपल्या जबाबदार खेळात सहा चौकार व चार षटकारांची उधळणही केली. एकशे वीस चेंडूत दोनशे धावांचं भलं थोरलं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबने सुरुवातीच्या पडझडीनंतर शशांक सिंग व इम्पॅक्ट प्लेयर आशुतोष शर्माच्या झंझावाती खेळाच्या बळावर एक चेंडू शिल्लक ठेवून तीन गडी राखून विजय मिळविला. या विजयाबरोबरच पंजाबने चालू मोसमात सर्वाधिक धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करून दाखविण्याचा पराक्रम केला.
           दोनशे धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या डावाला उमेश यादवने स्वतःच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार शिखर धवनचा एका धावेवर त्रिफळा उडवून गुजरातसाठी सनसनाटी सुरूवात केली. त्यानंतर जॉनी बॅरिअस्टो आणि प्रभसिमरन सिंगने डाव काहीसा सावरला असे वाटत असताना नूर अहमदने १३ चेंडूत चार चौकारांसह २२ धावा ठोकणाऱ्या बॅरिअस्टोचा त्रिफळा उडविला. त्यापाठोपाठ प्रभसिमरनलाही नूरने ३५ धावांवर परत पाठविले. अजमातुल्लाहने सॅम करनला पाच धावांवर तर मोहित शर्माने सिकंदर रझाला बाद करून पंजाबला मोठयाच धर्मसंकटात टाकले. पाच बाद ११५ अशा कठीण परिस्थितीत सर्व प्रमुख फलंदाज बाद झाले होते. त्यावेळी जितेश शर्माने दोन षटकार मारून आशा पल्लवीत केल्या असता राशिद खानने त्याला डग आऊटचा रस्ता दाखविला. नेमके त्याच वेळी शशांक सिंग व इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्मा या दोघांनी अनपेक्षितरित्या गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत सातव्या गड्यासाठी ४३ धावा जोडल्या व पंजाबला जिंकण्याचा मार्ग मोकळा केला.
           पंजाबला शेवटच्या षटकात सात धावांची गरज होती तेंव्हा नळकांडे गोलंदाजी करत होता. त्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने आशुतोषला राशिद खान करवी झेलबाद केले. दुसरा चेंडू वाईड गेला. नवा फलंदाज हरप्रित ब्रार पुढचा चेंडू निर्धाव खेळला व नंतरच्या चेंडूवर एक धाव घेतली. तीन चेंडूवर पाच धावा हव्या असताना शशांकने चौकार मारला व धावसंख्या बरोबर केली. तर पाचव्या चेंडूवर लेगबायची धाव घेतली व पंजाबला चमत्कारिक विजय मिळवून दिला.
           तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिलने या सत्रातले पहिले अर्धशतक ठोकले. आयपीएल करीयर मधील त्याचे हे १९ वे व पंजाब विरूध्दचे सहावे अर्धशतक ठरले. गिल शतक ठोकेल असे वाटत होते पण निर्धारीत षटके संपल्याने ८९ धावांवरच त्याला नाबाद परतावे लागले. गिलच्या या सत्रातील स्वतःच्या सर्वाधिक धावा गुजरातसाठी मौल्यवान ठरल्या.
          पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तेंव्हा आपल्या संघात लियाम लिव्हींगस्टोनच्या ऐवजी सिकंदर  रझाला संधी दिली तर गिलने डेव्हिडि मिलर ऐवजी केन विल्यमसनला संघात घेतले. गुजरातचा सलामीवीर वृध्दीमान साहा ११ धावाच काढू शकला. कागिसो रबाडाने त्याला बाद केले. मागच्या पाच डावातील चौथ्यांदा साहा रबाडाचा बळी ठरला. नंतर गिल व विल्यमसनने बऱ्यापैकी डाव सावरल्यानंतर विल्यमसन २६ धावांवर बाद झाला. हरप्रित ब्रारने त्याला बाद केले. 
         दोन गडी बाद झाल्यानंतर गिल व साई सुदर्शन जोडी जमली. सुदर्शने १९ चेंडूत सहा चौकारांसह ३३ धावा जोडल्या.त्याला हर्षल पटेलने यष्टीमागे झेलबाद करविले. वास्तविक पंचांनी त्याला बाद दिले नव्हते पण सुदर्शनने खिलाडूवृत्तीचं उदाहरण पेश करत स्वतःहून मैदान सोडले व क्रिकेटच्या महान परंपरेचा गौरव वाढविला.
           विद्ममान आयपीएल सत्र धावांनी भरगच्चपणे ओसंडून वाहत आहे. सामनेही चुरशीने खेळले जात आहेत. प्रेक्षकांचा उत्साहही मोठा असल्याने खेळाडू मनसोक्त फटकेबाजी करून दुग्धशर्करा योग साधत आहेत.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close