shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

"प्राचार्य आ.पां. खरात -निराधारांचे आधारवड" एका पोरक्या विद्यार्थ्याची भावपूर्ण श्रद्धांजली



शिक्षक हे विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक असतं. कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था ही गोरगरीब, निराधारांची मायमाऊली आहे. ज्याला नाही कोणी, त्याला रयतेचा स्वामी. याप्रमाणे ज्यांच्या समर्पित जीवनामुळे आणि ज्ञानशील वृतीनं रयत शिक्षण संस्था आकाराला आली, त्या ज्ञानयज्ञाचे एक विवेकशील व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. प्राचार्य आ.पां. खरातसाहेब होय.

१५ जुलै १९३६ रोजी त्यांचा जन्म झाला तर त्यांचे निधन शनिवार दि.१३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता सातारा येथे  झाले. ही बातमी प्राचार्य एस.सी.पाटील, प्राचार्या सौ. मंगलताई पाटील यांच्याकडून ऐकून आभाळ कोसळ्यासारखे झाले. रयत शिक्षण संस्थेचे माजी ऑडिटर, मॅनेजिंग कौन्सिल समिती अध्यक्ष, श्रीरामपूर येथील रयतच्या स्वामी सहजानंद शिक्षणशास्त्र महावियालय आणि सातारा येथील आझाद शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे आदर्श माजी प्राचार्य, विविध पदावर सेवाकार्य केलेले प्राचार्य खरात साहेब हे उत्तम क्रीडापटू, क्रीडा समीक्षक, क्रीडा मार्गदर्शक होते. याविषयी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी' अक्षरांचे आभाळ' हे प्रभावी आत्मचरित्र लिहिले. एक मानसशास्त्रज्ञ , याविषयी त्यांची पुस्तके मौलिक स्वरूपाची आहेत. 
गेल्या २५ वर्षावारून ते दोन्ही डोळ्यांनी अंध होते, तरी लेखन थांबले नाहीत, रयतची सेवा अखंड सुरूच होती. त्यांचे सर्व स्तरीय योगदान दीपस्तंभीय आहे. असे आदर्श प्राचार्य खरातसाहेब दीनांचे, दुर्बलांचे आधार होते. माझ्या निराधार,पोरक्या वाटेवर प्राचार्य खरातसाहेब कर्मवीरासारखे धावून आले होते. श्रीरामपूरच्या स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ते १९८३-८४
या काळात प्राचार्य असताना त्यांनी मला मोलाची मदत केली. मला आई,वडील, घरदार कोणी नव्हते. बी.एड. प्रवेशासाठी पैसे नव्हते. शिक्षण बंद होणार होते. माझी अडचण पाटील कुटुंबाने प्राचार्य खरातसाहेबांना समजावून सांगितली. त्यातून मला रात्रपाळीचे काम कमवा आणि शिका योजनेतून मिळाले. माझा प्रवेश झाला. माझे बी.एड. झाले. रयतमध्ये नोकरी मिळाली. मी २०१७ ला सेवानिवृत्त झालो पण प्राचार्य खरातसाहेब आज निघून गेल्याचे अपार दुःख आहे. रयतची ही माणुसकीची संस्कृती मी त्यांच्यात अनुभवली. ते नसते तर माझे बी.एड. झाले नसते, नोकरी मिळाली नसती. माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी त्यांनी घडविले, निराधारांचे आधारवड झाले. माझ्या उपासमारीत आणि एकाकीपणात ते माझे  कर्मवीर झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९०९ साली एका निराधार आणि उपेक्षित विद्यार्थ्यांस बरोबर घेऊन संस्था सुरु केली. तीच कर्मवीरांची विचारधारा आपल्या उक्ती,   कृतीने जपणारे प्राचार्य           खरातसाहेब म्हणजे रयतची खरी सेवा संकृती आहे. ग्रामीण जीवनाचा तळस्पर्शी अनुभव असलेले आणि शेती, माती, माणसांचे अनुभव त्यांच्याजवळ होते.अशी व्यक्तिमत्वे हीच खरी रयतची ओळख आहे. त्यांच्या' अक्षरांचे आभाळ' या आत्मचरित्रात माझ्या जीवनातील प्रसंग लिहिले आहेत. त्यांच्यावर विद्यापीठीय संशोधन करण्यासाठी मी आणि विद्यार्थीनी मुलाखती घेतल्या. त्यांची मुले, सुना, नातवंडे यांचेही त्यांनी सहकार्य मिळत असल्यानेच अंध काळात त्यांनी केलेले लेखन व रयतकार्य  दीपासारखे प्रज्वलित राहिले. माझ्यासारखे हजारो विद्यार्थी अशा आदर्श शिक्षकामुळेच शिकले, जीवनात स्थिरावले. हाती काही नसताना रयतने अशा लाखो निरक्षर कुटुंबातील मुलांना साक्षर केले. आज ह्याच कुटुंबातील मुलेमुली चांगल्या पदावर कार्यरत आहेत. झोपडीच्या जागे बंगले उभे राहिले आहेत. अज्ञानाची जागा ज्ञानाने घेतली. हे परिवर्तन केवळ रयतमुळे आणि रयतमध्ये प्रामाणिकपणे ज्ञानदान केलेल्या प्राचार्य  खरातसाहेबां सारख्या  शिक्षकांमुळे झाले. असे हे कर्मवीर विचारांचे आदर्श असणारे रयतनिष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले,हे दुःख अपार आहे,ही पोकळी भरून येणार नाही. प्राचार्य खरात साहेबांचा हा आदर्श पुढे        जपला पाहिजे.

"अशी पाखरे येती,
आणिक स्मृती ठेवूनी जाती/
दोन दिसांची रंगत संगत,
दोन दिसांची नाती""

अशी नाती मनात खोलवर पेरली आहे. त्यामुळेच डोळ्यातले अबोल अश्रू थांबतच नाहीत, याच आत्मीय जाणिवांची ही शब्दफुले अर्पण करून मी स्व. प्राचार्य आ.पां. खरातसाहेबांच्या चरणी श्रद्धांजली वाहतो!

*डॉ. बाबुराव उपाध्ये
सरांचा एक निराधार,पोरका विद्यार्थी
श्रीरामपूर जि.अ.नगर - *9270087640*
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close