shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

डॉक्टर बाबासाहेबांचा विचार घेऊन सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घ्यावा- प्रा.डॉ.सुभाष वाघमारे


सातारा प्रतिनिधी:
केवळ एक दिवस जयंती साजरी करून इतर दिवशी काहीच चांगले कार्य न करणे हे हितकारक नसते. डीजेच्या तालावर नाचून आंबेडकर यांची जयंती साजरी करणे हे केवळ तात्पुरता आनंद मिळविण्यासाठी आहे. याने बाबासाहेब आंबेडकर यांच्या इच्छा कदापि पूर्ण होणार नाहीत. बाबासाहेब हे विचारी व्यक्तिमत्व होते,अस्पृश्यांना सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी आपले सारे जीवन संघर्ष केला.सतत विविध विषयाचे ज्ञान आत्मसात करून त्यांनी जगातील विविध विद्यापीठाच्या पदव्या मिळविल्या, पाण्यासाठी ,मंदिरासाठी सत्याग्रह केले. अज्ञानी असलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी सतत वाणी आणि लेखणीचा उपयोग केला.गरीब , शेतमजूर, अस्पृश्य,महिला ,कामगार, एकूणच वंचित घटकांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कायदे निर्माण केले.

सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी काम केले. दैववाद नाकारून प्रयत्नवाद स्वीकारला. आधुनिक भारत घडविणारे एक परिपूर्ण समाज सुधारक म्हणून आपण बाबासाहेब यांचेकडे पाहतो .भारताच्या राज्यघटनेचे लेखन व बुद्ध धम्माचा त्यांनी केलेला स्वीकार या दोन्ही गोष्टी संपूर्ण भारताला दिलेले नवे मार्ग आहेत ज्याने भारतात एकोपा कायम राहील. प्रस्थापित अंधश्रद्धाळू,विषमता जोपासणारी व्यवस्था नाकारून त्यांनी शांतता, प्रगतीकडे नेणाऱ्या गौतम बुद्धांच्या विवेकी विचारांचा पुरस्कार केला.हे लक्षात घेऊन त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी काम करावे लागेल.देशातली गरिबी , बेरोजगारी, विषमता, अंधश्रद्धा, फुटीर वृत्ती,भ्रष्टाचार या पार्श्वभूमीवर आता व्यवसाय करून प्रगती करणे ,निर्व्यसनी राहणे, आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान मिळविणे,पंचशील पालन करणे, मुलामुलींना उच्च शिक्षण देणे, निरर्थक गोष्टीत वेळ न घालवणे, सतत कष्ट करीत राहणे ,न्याय हक्क मिळवण्यासाठी सतत अभ्यास करून स्वतःचे व समाजाचे चांगले होईल असे काम करण्याची गरज आहे. काळ कठीण आला आहे , बाबासाहेब यांचा विचार आचरणात आणून सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घ्यावा असे मत छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते चिंचनेर [वंदन ] येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सुदाम भिवा दणाणे, बौद्ध विकास तरूण मंडळाचे   बुद्धभूषण दणाणे,सुशांत दणाणे,राजेश दणाणे, सनी दणाणे प्रा.विश्वजित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 
        केवळ अस्पृश्यच नव्हे तर सर्व भारतीयांना भूषण वाटेल असे कार्य डॉ.आंबेडकर यांनी केले याबद्दल बोलताना ते म्हणाले की जवळपास ३४ पदव्या त्यांनी घेतल्या होत्या. पौंडाच्या  मानाने भारतीयांच्या रुपयाचे मूल्य इंग्रजांनी कमी केले असा दोष त्यांनी इंग्रजांना लावला होता. प्रॉब्लेम ऑफ रुपी या त्यांनी लिहिलेल्या प्रबंधाने भारतात नियोजन आयोग,रिझर्व्ह बँक, अर्थ आयोग ,इत्यादी गोष्टी आल्या. १९४२ ते ४५ या काळात त्यांनी व्हाईसरायच्या मंत्रीमंडळात काम केले. मजूर,भांडवलदार व शासन यांनी एकत्र येऊन मजुरांचे प्रश्न सोडवावेत.वेतन ठरवावे या गोष्टी त्यांनी केल्या. स्त्रियांना बाळंतपणाची रजा ,आठवडी सुट्टी ,कामगारांना संप करण्याचे अधिकार इतक्या अनेक न्याय गोष्टी त्यांनी केल्या .सामाजिक व आर्थिक विषमता जाण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही सरकारने न्यायी भूमिका घेतली पाहिजे हा इशारा त्यांनी दिला होता. मानवी हक्काची पायमल्ली करणारे कोणतेही धार्मिक तत्वज्ञान त्यांनी नाकारले आहे. कायदे करूनही माणसे नीट वागतील याची शास्वती नाही म्हणूनच चांगल्या भावनांची ,जोपासना करणारा धर्म त्यांनी स्वीकारला. आज जे बेताल वर्तन समाजात आढळते त्याला कारण अज्ञान आहे. खरा बुद्ध धर्म भारताच्या मनात रुजल्याशिवाय करुणा ,मानवता जागी होणार नाही. मद्यपान , चोरी ,व्यभिचार करू नये.चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी बाबासाहेब यांचे विचारच उपयुक्त आहेत’ असे ते म्हणाले. 
यावेळी प्रा. विश्वजित जाधव यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी लिहिलेल्या कवितेचे वाचन केले. दिनांक १३ च्या मध्यरात्री १४ एप्रिल या दिवसाची सुरुवात होताना त्यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमास  मेघा दणाणे, सुमन दणाणे ,पुष्पा ननावरे , सारिका ननावरे ,कमल दणाणे, माता रमाई महिला मंडळ, बौद्ध धर्मीय बांधव,तरुण कार्यकर्ते  इत्यादी उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग
प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये (सर), श्रीरामपूर 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close