आयपीएल २०२४ च्या चौदाव्या दिवशी पंधराव्या सामन्यात बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर लखनौच्या मयंक यादवच्या भन्नाट व नियंत्रीत माऱ्यासमोर कागदोपत्री महान फलंदाजांचा भरणा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाची पुरी वाताहत झाली. इतकेच नाही तर चालू आयपीएल सत्रात अवघ्या वीस षटकात संपूर्ण संघ बाद होणारा आरसीबी पहिला संघ ठरला. मयंक यादवने या सत्रातल्या मागच्याच सामन्यात पंजाबविरूध्द सनसनाटी पदार्पण केल्यानंतर आरसीबीविरूध्दही त्याचा तोच जोश व आवेश कायम होता. या सामन्यात तर त्याने मागच्या सामन्यापेक्षा जास्त तिखट मारा करताना प्रत्येक चेंडू ताशी १५० कि.मी. वेगाने फेकून आरसीबीच्या भल्याभल्या फलंदाजांची वाताहत करून टाकली. विशेष म्हणजे या सामन्यात त्याने टाकलेल्या चार षटकातील २४ पैकी १६ चेंडू निर्धाव होते.
आश्चर्याची बाब म्हणजे त्याने चालू आयपीएल सत्रातील सर्वात वेगवान म्हणजे ताशी १५७ कि.मी वेगाचा चेंडू टाकला. त्याच्या या कारनाम्यामुळे त्याने उमरान मलिक, एनरीच नॉर्किया, लॉकी फर्ग्यूसन, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स या मातब्बर गोलंदाजांना मागे टाकले. चार षटकात केवळ चौदा धावा देऊन तीन बळी मिळविणारा मयंक सलग दुसऱ्या सामन्याचा मानकरी ठरला. मयंक सारख्या वेगवान गोलंदाजाला नवा चेंडू न देता बाराव्या षटकात गोलंदाजी दिली जात आहे. तरीही तो आपल्या धारदार, नियंत्रित व वैविध्यपूर्ण माऱ्याने प्रतिपक्षी फलंदाजाचे शिरकाण करत आहे. जर त्याला डावाच्या सुरुवातीलाच गोलंदाजी दिली तर प्रतिपक्षाचा डाव सुरु होताच कोसळू शकतो. पुढच्या सामन्यात लखनौ संघ व्यवस्थापन कदाचित हा प्रयोग देखील करून बघू शकते. चार सामन्यातील सलग तिसऱ्या पराभवानंतर आरसीबी नवव्या स्थानावर घसरले असून त्यांच्या खाली फक्त मुंबई इंडियन्सच आहे. तर मयंकच्या घातक गोलंदाजीच्या बळावर लखनौ चौथ्या स्थानी गुणतालिकेत दिसत आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस यावे लागल्यानंतर लखनौ सुपर जायंटसचे सलामीवीर क्विंटन डिकॉक व के एल राहुल यांच्या दरम्यान ५३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. राहुल २०, देवदत्त पडिक्कल ६, मार्कस स्टेईनस २४, पाठोपाठ परतल्याने लखनौची परिस्थिती संकटाकडे जात असताना डिकॉकने आपले बावीसावे आयपीएल अर्धशतक ठोकून लखनौला सदृढता दिली. त्याने ५६ चेंडूत आठ चौकार व पाच षटकारांसह ८१ धावांची खेळी साकारली. कर्णधार निकोलस पूरनने २१ चेंडूत ४० धावा करून आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडले.
आरसीबीकडून मॅक्सवेलने दोन, तर रिस टॉपली, यश दयाल व मोहम्मद सिराजने प्रत्येक एक फलंदाज बाद केला. वीस षटकात पाच बाद १८१ अशा भक्कम धावसंख्येवर लखनौचा डाव आटोपला.
विजयासाठी १८२ धावांचे आव्हान स्विकारत आरसीबीचे दोर धुरंधर कर्णधार फाफ ड्यू फ्लेसिस व विराट कोहलीने झटपट ४० धावा जोडल्या. त्यानंतर कोहली २२, ड्यु फ्लेसिस १९ धावांवर बाद झाले. मग आला मयंक यादवचा भन्नाट स्पेल. त्याच्या झंझावातात ग्लेन मैक्सवेल, कॅमरून ग्रीन आणि रजत पाटीदार पार कोलमडून पडले. मॅक्सवेल तर आयपीएल इतिहासातला शुन्यावर सोळा वेळा बाद होणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला. आता त्याच्या पुढे प्रत्येकी १७ वेळा शुन्याचा धनी बनलेले रोहित शर्मा व दिनेश कार्तिक हे आहेत. मयंकची वेगवान गोलंदांजी खेळण्याची धमक एकाही बंगलोरच्या फलंदाजाकडे नव्हती. अनुज रावत ११, दिनेश कार्तिक ४ धावा हे अंतिम टप्प्यात जोरदार फलंदाजी करणारे फलंदाजही लखनौच्या गोलंदाजांपुढे हतबल झाले. शेवटी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या महिपाल लोमरोरने १३ चेंडूत प्रत्येकी तीन चौकार व षटकार ठोकून लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही निष्फळ ठरला. शेवटी मयंक डागर शुन्य, टॉपली तीन धावा हे धावा वाढविण्यात अपयशी ठरले. लखनौकडून मयंकने तीन, तर नवीन उल हकने दोन बळी घेतले. एम. सिध्दार्थ , यश ठाकूर व मार्कस स्टोईनस यांच्या खात्यातही एक एक बळी पडला. अखेर १९.४ षटकात १५३ धावांवर आरसीबीने गुडघे टेकले व २८ धावांनी पराभव स्विकारला.
मयंक यादवमुळे लखनौचं भाग्य उजळलं असलं तरी आरसीबीच्या नशिबीला ग्रहण लागले असून ते कधी व कसे सोडवायचे हे त्यांच्या सांघिक कामगिरीवर अवलंबून आहे. एकट्या दुकट्याच्या जोरावर त्यांचे ग्रहण सुटणार नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
मो. नंबर -९०९६३७२०८२