श्रीरामपूर प्रतिनिधी:
प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे . त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, संशोधकीय आणि आर्थिक अंगाने केलेले कार्य आणि विचार त्यांच्या 'शब्दवैभव' पुस्तकात समाविष्ट झालेले असून हे पुस्तक शिक्षणक्षेत्राला अधिकच दिशादर्शक ठरणारे असल्याचे मत साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील साहित्यिक परिवारातर्फे माजी प्राचार्य शंकरराव अनारसे यांच्या 'शब्दवैभव' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अनारसे सभागृहात संपन्न झाला, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी स्नेहपरिवार ग्रुपचे संस्थापक ,अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक , अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष लेविन भोसले, प्रा. शिवाजीराव बारगळ, ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब चेडे, आंतरभारतीचे श्रीरामपूर शाखा अध्यक्ष सुभाष लिंगायत यांनी प्राचार्य अनारसे यांचा सत्कार करून त्यांनी ८६ वर्षात जे शैक्षाणिक, सामाजिक, साहित्यिक योगदान दिले त्याविषयी मनोगत व्यक्त केले. सौ.कमलताई अनारसे, डॉ.संजय अनारसे, डॉ. योगिता अनारसे, डॉ. अशोकराव शेरकर, डॉ. मंजुषाताई शेरकर यांनी कौटुंबिक संस्काराच्या आठवणी सांगितल्या.
डॉ. शिवाजी काळे पुढे म्हणाले, प्राचार्य अनारसे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर दादा पाटील यांच्या सहवासात दिवस घालविले, कर्मवीर दादा पाटील व वटवृक्षाचे मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक रयत संस्काराचे अमृतमय शब्दवैभव आजच्या शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थांना उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. प्राचार्य अनारसे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या शैक्षणिक संघर्षाची जीवन कथा सांगून श्रीरामपूरच्या आसरा प्रकाशनच्या सौ. मोहिनी काळे, डॉ. शिवाजी काळे यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. अनारसे परिवार आणि शेरकर परिवार यांनी सर्व मान्यवरांचा शाल, बुके, श्रीफळ, प्रवासी बॅग आणि भेटवस्तू देऊन सत्कार केले.
प्राचार्य टी.ई. शेळके यांनी अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य अनारसे यांचे ८६ वर्षाचे जीवन म्हणजे एक सेवाभावी ज्ञानतपस्वी वाटचाल असून त्यांचा अनारसे परिवार, शेरकर परिवार एक आदर्श परिवार असून आजच्या कुटुंब संस्कृतीला दिशावर्धक ठरणारा आहे असे सांगून शब्दवैभव हे त्या संस्काराचे रूप असल्याचे कौतुक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. संजय अनारसे यांनी आभार मानले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111