shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कोहली - बटलरच्या शतकी जुगलबंदीत राजस्थानची सरशी


           गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएल २०२४ च्या १९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने गुलाबी जर्सी परिधान केली होती. गुलाबी प्रॉमिसमुळे राजस्थान रॉयल्स संघ गुलाबी जर्सी परिधान करून आरसीबीविरुद्धच्या सामन्यात उतरला. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राजस्थान संघ गुलाबी जर्सी परिधान करण्याचा अभिनव उपक्रम राजस्थान रॉयल्सने राबविला.  ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी राजस्थान रॉयल्स सातत्याने मदत करत आहे.  या अंतर्गत राजस्थान संघ गुलाबी जर्सी परिधान करून आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळला.  राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या या उपक्रमाला 'जर स्त्री असेल तर भारत आहे' असे नाव देण्यात आले आहे.  त्यानुसार फ्रँचायझी, तिकीट आणि जर्सीमधून होणारा नफा या उपक्रमासाठी दान करते.  या माध्यमातून महिला प्रगत झाल्यास देशाचा विकास होईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


            रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) फलंदाज विराट कोहलीने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले, मात्र राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने झंझावाती शतक झळकावून कोहलीचे शतक निरर्थक ठरविले.  कोहलीच्या नाबाद ११३ धावांच्या बळावर आरसीबीने २० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावा केल्या. मात्र जोस बटलरने विजयी षटकार मारून केलेल्या नाबाद शंभर धावा आणि कर्णधार संजू सॅमसनच्या अर्धशतकी (६९धावा) खेळीच्या जोरावर राजस्थानने पाच चेंडू शिल्लक असताना चार गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा केल्या. राजस्थान कडून या दोघांव्यतिरिक्त कोणीही मोठी खेळी केली नाही.

            आरसीबीवरील या विजयासह राजस्थान  चार सामन्यांत चार विजय आणि आठ विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.  त्याचवेळी, सलग तीन पराभवानंतर आरसीबी संघ पाच सामन्यांतून चार पराभव आणि एका विजयासह दोन गुणांसह आठव्या स्थानावर घसरला आहे.


           आरसीबीने दिलेल्या १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वाल  खाते न उघडताच बाद झाला. सध्याच्या आयपीएलमध्ये यशस्वीची बॅट नि:शब्द असून तो धावा काढण्यासाठी धडपडत आहे. आगामी टि२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, यशस्वीचा सतत धावा करण्यासाठीचा संघर्ष केवळ राजस्थानसाठीच नाही तर भारतीय संघासाठीही चिंतेचा विषय बनला आहे.  खातेही न उघडताच यशस्वीला गमावल्यानंतर बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि उभय फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला.  बटलर आणि सॅमसन सुरुवातीला थोडे संथ खेळत होते, पण पॉवर प्लेनंतर बटलरने आपले हात खोलायला सुरुवात केली.  या सामन्यापूर्वी या मोसमात बटलर धावा काढण्यासाठी धडपडत होता.  गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने ११, ११ आणि १३ अशा धावा केल्या होत्या. मात्र या सामन्यात बटलरची बॅट जोरात बोलली. त्याने प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला आणि राजस्थानच्या घरच्या मैदानावर फॉर्ममध्ये परत आला.  या दरम्यान कर्णधार सॅमसनने बटलरला शानदार साथ दिली.  सॅमसनने आणखी एक अर्धशतक झळकावले, पण अर्धशतक ठोकल्यानंतर त्याचा संयम सुटला व तो बाद झाला.  सॅमसन बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव मध्यंतरी थोडासा गडगडला आणि त्यांनी पाठोपाठ फॉर्मात असलेला रियान पराग ( ४ ) आणि ध्रुव जुरेल ( २) यांच्या विकेट्स गमावल्या. मात्र बटलरने दुसऱ्या टोकाला ठाम राहून षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले आणि संघाला विजयी लक्ष गाठून दिलेले.  बटलरने ५८ चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार आणि चार षटकार मारले.  बटलरसह शिमरान हेटमायर सहा चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ११ धावा करून नाबाद परतला. त्याचबरोबर आरसीबीसाठी धाडसी खेळी करणाऱ्या कोहलीचे शतक व्यर्थ गेले.

            तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीसाठी कर्णधार फाफ ड्यू फ्लेसिस आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली.  विराट कोहली आणि कर्णधार फाफ ड्यू फ्लेसिस या सलामीच्या जोडीने आरसीबीला राजस्थान रॉयल्सविरुद्ध दमदार सुरुवात करून दिल्याने सॅमसनचा निर्णय फसला असे वाटत होते.  पहिल्या गड्यासाठी पॉवर प्ले संपेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.  सहा षटके संपल्यानंतर आरसीबीने एकही बळी न गमावता ५३ धावा केल्या होत्या.  पॉवरप्ले दरम्यान आरसीबीने एकही बळी गमावला नसल्याची या मोसमातील ही पहिलीच वेळ होती.  विराट कोहली पॉवर प्लेमध्ये या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा बहुमान मिळविला.  या दरम्यान कोहलीने १२१ धावा ठोकल्या.  या दोघांनी आयपीएलमधील पाचवी शतकी भागिदारी नोंदवली.

             विराट कोहलीने सतराव्या आयपीएल सत्रातील आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आणि  चालू हंगामातील पहिले शतक झळकावले.  या मोसमात शतक झळकावणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे.  कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे आठवे शतक आहे.  कोहलीने ६७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.  मात्र, आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसचे राजस्थान रॉयल्सविरुद्धचे अर्धशतक हुकले.  फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने राजस्थानला पहिले यश मिळवून दिले.  ड्यू फ्लेसिस ३३ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला.  कोहली आणि  ड्यू फ्लेसिस यांच्यातील पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली.  आयपीएलमधील आरसीबीसाठी ही ४७ वी शतकी भागीदारी ठरली.  यानंतर नांद्रे बर्गरने राजस्थान रॉयल्सला दुसरे यश मिळवून दिले.  ग्लेन मॅक्सवेल तीन चेंडूत एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.  यानंतर चहलने पुन्हा एकदा आपल्या शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या सौरव चौहानला नऊ धावांवर बाद केले.  मात्र, दुसऱ्या टोकाला कोहली टिकून होता. शेवटी शानदार शतक झळकावून नाबाद परतला. आरसीबीकडूनही कोहली व ड्यु फ्लेसिस सोडून इतर कोणताही फलंदाज चालला नाही.

               आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यादरम्यान आयपीएलमधील आपल्या साडेसात हजार  धावा पूर्ण केल्या आहेत.  त्याने ३४ धावा केल्या तेंव्हा हा कारनामा घडला. अशी कामगिरी करणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे.  कोहली या सत्रात सर्वात जास्त धावा केल्याबद्दल ऑरेंज कॅप मिळविली असली तरी त्याच्या संघातील इतर फलंदाजांकडून त्याला योग्य ती साथ मिळत नसल्याने आरसीबी पाच सामन्यात चार पराभव व एक विजय मिळवून आठव्या स्थानावर घसरला असून त्यांचा सांघिक खेळ असाच राहिला तर प्ले ऑफ मध्ये पोहण्याचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिल. शिवाय त्यांच्या महिला संघाने महिलांची डब्ल्यूपीएल जिंकून पुरूष संघाच्या जखमेवर मीठ चोळल्याने पुरूषी अहंकाराच्या चिंधड्या होण्याची वेळ आली असेच लक्षणं सध्या तरी दिसत आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close