सातारा प्रतिनिधी:
कर्मवीर भाऊराव पाटील व सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील (उर्फ वहिनी) यांनी अफाट काम केले. छ. शाहू बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांकाळात वहिनीनी जो त्याग केला त्याला तोड नाही. वहिनींच्या दातृत्वाच्या मूळाशी खूप मोठा त्याग आहे. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून रयतचा आदर्श समाज घेत आहे. चांगल्या कामाला सहाय्य करण्याचा आनंद खूप मोठा असतो.वाहिनीना तो मिळाला. कर्मवीर आणि लक्ष्मीबाई अफाट धैर्याचा व त्यागाचा विचार नव्या पिढीने करून त्यांच्या व दातृत्वाची वृत्ती गावोगाव समाजात पसरवली पाहिजे असे मत रयत शिक्षण संस्थेचे माजी ऑडीटर, प्राचार्य विश्वासराव गणपतराव काळे यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयतमाउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ वहिनी यांच्या ९४ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व स्थानिक शाखांच्यावतीने श्री.छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस शाखा क्रमांक १ धनिणीची बाग येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील होते सचिव विकास देशमुख,ॲड.दिलावर मुल्ला,उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के, माध्यमिक विभाग सहसचिव श्री..बी.एन.पवार,ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ.अनिल पाटील म्हणाले की ‘वहिनींचा जन्म १८९४ चा. १९३० ला त्यांचे अकाली निधन झाले. त्यांना मिळालेल्या ३६ वर्षाच्या आयुष्यात शेवटच्या ५ वर्षात त्यांनी जे काम केले ते खूप मोठे आहे. शाहू बोर्डिंगची स्थापना १९२४ ला अवघे ५ विद्यार्थी घेऊन झाली. १९३० पर्यंतचा विचार केला तर शाहू बोर्डिंगचा खर्च १०४४४ रुपये इतका होता. आणि समाजातून देणगी अवघी १५९ रुपये. विद्यार्थ्यांचा खर्च भागवणे शक्य नव्हते अशावेळी अण्णांनी घरातील जे होते ते सारे घातले. विहिरीला रहाट बनवण्यासाठी त्यांनी वडिलांची पॉलीसी मोडली. अण्णा या काळात बोर्डिंगसाठी धान्य व देणग्या गोळा करण्यासाठी जात असत. त्यावेळी वसतिगृहाची सर्व जबाबदारी वहिनीनी घेतली म्हणून तर रयत शिक्षण संस्था उभी राहिली. त्यांच्या अंगावर असलेले सगळे सोन्याचे दागिने त्यांनी मोडले. अण्णा परगावी गेल्यावर होस्टेलच्या सर्व मुलांची काळजी सौ. वहिनी घेत असत. केवळ धनिणीच्या बागेतच मुले रहात नव्हती तर सोमवार पेठेतल्या आमच्या घरी, येलू बापूचा वाडा ,शिर्के वाडा ,यादो गोपाळ पेठ,यवतेश्वर येथे गोसाव्याचा मठ, आर्यांग्लच्या परिसरात मुले रहात होती. या सर्वांची काळजी वहिनी घेत होत्या. वहिनींच्या प्रचंड त्यागावर हे बोर्डिंग उभे राहिले आहे असेही ते म्हणाले.
छत्रपती शाहू बोर्डिंग ही रयतची गंगोत्री आहे असे सांगताना ते पुढे म्हणाले की ‘ आज १९२४ ला या छ.शाहू बोर्डिंगला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभर वर्षात अनेक महान व्यक्तींनी या वसतिगृहास भेटी दिल्या. १९२६ पासून शेख चुनिलाल मेहता,प्रबोधनकार ठाकरे यांनी १० पानांचे पुस्तक कर्मवीरांच्या कार्यावर प्रकाशित केले.,महात्मा गांधींचे मेहुणे ठक्कर बाप्पा येऊन गेले. डॉ.आंबेडकर यांनी भेट देऊन २0 रुपयांची देणगी दिली . डॉ.बाळकृष्ण आणि डी.टी. मालिक,अभ्यास करण्यासाठी आलेले आयरिश गृहस्थ पेटवाल, इतिहासकर र.गो .देसाई व जदुनाथ सरकार,यांनी भेटी दिल्या .महर्षी शिंदे यांच्या समोरच वसतिगृहातील २१ विद्यार्थ्यांनी संस्थेचे आजीवन काम करण्याची प्रतिज्ञा घेतली. १९३२ ला महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भेट देऊन बोर्डिंग मध्ये भोजन केले.
१९३५ ला रयतची घटना रा.ब. काळे यांनी याच ठिकाणी लिहिली. हमीद अली हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. तेच म्हणाले होते वडाचे झाड वाढते आहे तशी रयत शिक्षण संस्था पसरत राहो ,हाच तेच आपल्याला दिसत आहे. ग्रीव्हज साहेबांनी रा.ब. काळे शाळेचे उदघाटन केले होते.लॅम्ले यांनी भेट दिली. बाळासाहेब खेर हे त्या काळात प्राथमिक शाळेच्या गॅदरिंगला उपस्थित होते त्यांनी १० एकर जागा संस्थेला दिली सातारचे शाहू महाराज ,औंधचे प्रतिनिधी ,मालोजीराजे ,सीडी देशमुख , वल्लभभाई पटेल ,लॉर्ड ब्रेगान ,यांनी भेट दिली. २५ फेब्रुवारी १९२७ ला रात्री ८ वाजता महात्मा गांधी यांनी भेट दिली. अस्पृश्य भेदभाव न मानता बंधुभावाने मुले राहतात हे बघून ते म्हणाले की मी साबरमती आश्रमात जे करू शकलो नाही ते काम आपण केले. गांधीजी आले होते तेव्हा ३१ पैकी १७ मुले ही हरिजन होती. १९४५ ला गांधीजीनी प्रार्थनेच्या वेळी थाळीतून मिळालेल्या देणगीतून ५०० रुपये शाहू बोर्डिंगसाठी दिले होते. २८ नोव्हेंबरला आण्णांना जो एक लाख रुपये देण्याचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमास येण्याचे निमंत्रण गांधीजीनी स्वीकारलेले होते. कमवा आणि शिकाचे संस्कार याच ठिकाणी झाले. त्या काळात राजे महाराजे जे करू शकले नाहीत ते काम अण्णांनी केले. मोरारजी देसाई ,धनजीशा कुपर ,स.का . पाटील ,घाटे ,हितेंद्र देसाई, अण्णासाहेब लठ्ठे ,मदन मोहन मालवीय , क्रांतिसिंह नाना पाटील ,नागनाथ अण्णा नायकवडी ,लाड ,जॉन मथाई , इत्यादींनी अण्णांच्या कार्याला वंदन केले आहे.
आण्णांच्या व वहिनींच्या सारखे कार्य आपण करू शकलो नाही. २०२४ ला पूर्वी १९२४ ला जसे बोर्डिंग होते तसे बोर्डिंग आम्ही तयार करून परत एकदा महाराष्ट्राला हे दर्शन घडवणार आहोत. कुणीही आले तरी एक दिवस बोर्डिंगमध्ये रहावे आणि त्यांना ही सर्व माहिती कळेल अशी व्यवस्था आम्ही करीत आहोत. अण्णा व वहिनींची त्यागाची परंपरा आचरणात आणणारी नवीन पिढी तयार करावी लागेल. २०२४ मध्ये छ.शाहू बोर्डिंग शताब्दी कार्यक्रमात अण्णा व वहिनींचे जीवंत स्मारक शाहू बोर्डिंगमध्ये उभे राहील. गंगेत गेल्यावर एक डुबकी मारली की पापे नाहीशी होतात म्हटले जाते तसेच आपण करूया असेही ते म्हणाले.
प्रारंभी कर्मवीर व सौ,लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. संभाजी पाटील व सहकारी यांनी कर्मवीर गीत गंधाली हा कार्यक्रम सादर केला. वाऱ्यावरील वाटसरू मी ,कर्ण विचारी लाजून ,जा बाळानो करा साजरा उद्याचा सण पाडवा,वटवृक्षावर सदा विहरतो थवा रयत पिलांचा --इत्यादी गीते सादर करून त्यांनी लक्ष्मीबाई यांचे योगदान सांगताना रसिकांना गहिवरून आले. प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव विकास देशमुख म्हणाले की लक्ष्मीबाई यांचे धैर्य आणि त्याग मोठा आहे. स्वतःच्या पतीबरोबर असताना आजसुद्धा स्त्रिया एवढ्या धडाडीने काम करू शकत नाहीत. या कार्यक्रमात साहेबराव घाडगे गुरुजी , शांताराम आवटे , जनरल बॉडी सदस्य मा.पल्लवी सागर वर्धमाने यांनी २५ हजार रुपये देणगी दिली.रा.ब.काळे शाळेचे लक्ष्मी फंड रुपये ५३६५० संकलित करणारे पालक प्रातिनिधी व मुख्याध्यापक अमोल कोळेकर ,इत्यादी देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला. छ.शाहू बोर्डीगचे रेक्टर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. शेवटी सहसचिव श्री.बी. एन.पवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर उपस्थिताना अल्पोपहार आणी कमवा व शिका योजनेतर्फे ऊसाचा रस देण्यात आला. या कार्यक्रमास कर्मवीर कुटुंबीय, संस्थेतील मॅनेजिंग कौंसिल सदस्य जगदाळे सर,जनरल बॉडी सदस्य मा. डॉ. अशोक भोईटे, हणमंतराव भोसले, लालासाहेब खलाटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, दिनेश दाभाडे, एन. टी. निकम, संभाजी पाटील, आर. के. शिंदे, शहाजी डोंगरे, आजी माजी प्राचार्य ,रयत सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.
वृत्तविशेष सहयोग
*प्रा. डॉ.बाबुराव उपाध्ये (सर)
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111