- बावडा येथे भाजपचा स्थापना दिन साजरा
बावडा : प्रतिनिधी दि.6/4/24
भारतीय जनता पक्षामुळे महाराष्ट्र राज्य व देशाची वेगाने प्रगती होत आहे. तसेच सद्या जगामध्ये भारताचे नाव आदराने घेतले जात आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली भारत देश सन 2047 मध्ये निश्चितपणे विकसित राष्ट्र बनेल, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.6) काढले.
बावडा (ता. इंदापूर) येथे भारतीय जनता पक्षाच्या 45 व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ध्वजारोहन करण्यात आला. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. हर्षवर्धन पाटील हे बावडा येथील भाजपच्या एका बुधचे अध्यक्ष आहेत.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील म्हणाले, दि. 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. जगातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेला भाजप हा एकमेव पक्ष ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यामध्ये भाजप हा एकमेव पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी व लाभार्थ्यांशी संवाद साधावा. आगामी लोकसभा निवडणकीनंतर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिह पाटील, बुथ अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
_____________________________
फोटो:-बावडा येथे भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी हर्षवर्धन पाटील.