अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमानाने आयसीसी संचलित वीस संघांचा सहभाग असलेल्या नवव्या टि२० विश्वचषक स्पर्धेचा साखळी फेरीचा पहिला टप्पा संपला असून त्यात चाळीस सामने खेळले गेले. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या चढाओढीत आठ चांगले संघ पुढच्या म्हणजे सुपर एट स्पर्धेसाठी पात्र ठरले. तर बारा संघ आपापल्या मायदेशी रवाना झाले. सुपर आठसाठी पात्र ठरलेल्या आठ संघांची प्रत्येकी चार संघ असे दोन गट तयार करण्यात आले असून पहिल्या गटात भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका व अफगाणिस्तान यांचा तर दुसऱ्या गटात वेस्ट इंडिज, इंग्लंड, द. आफ्रिका व बांगलादेश यांचा समावेश असून प्रत्येक गटातले संघ आपसात प्रत्येकी एकदा भिडणार आहेत. त्यातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. २९ जूनला आपल्याला नवा टि२० चँपीयन मिळेल.
या स्पर्धेच्या साखळी मान्यता भारताने चार सामने खेळले. त्यातील तीन सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला तर कॅनडा बरोबरचा सामना पावसाने जिंकला. तरीही भारत अ गटातून अव्वल क्रमांकाने सुपर आठ मध्ये दाखल झाला. यामुळे टिम इंडियाचा आत्मविश्वासही दुणावला असेल यात कोणाचेही दुमत असूच शकत नाही. तसे पहाल तर भारताचे सुरूवातीचे सामने अमेरिकेत झाले. तेथील खेळपट्टया खास करून टि२० ला साजेशा बिलकुल नव्हत्या. त्यामुळे तेथे फलंदाजांना विशेष काही करून दाखवता आले नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ सुपर आठ ते पात्र झाल्यास उपांत्य व अंतिम सामन्यासाठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला. गुरुवारी १९ जून रोजी बार्बाडोस येथे भारताचा सुपर एटचा पहिला सामना अफगाणिस्तान बरोबर होणार आहे.
या दरम्यान संघातील काही त्रुटीही चव्हाटयावर आल्या. भारताचा माजी कर्णधार व नव्यानेच टि२० च्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलामीवीराची भूमिका बजवावी लागलेल्या विराट कोहलीला त्याच्या बॅटने दगा दिला. तीन सामन्यात एका शुन्यासह केवळ पाचच धावा त्याच्या नावे लागल्याने संघात चिंतेचे वातावरण आहे. कोहली सारख्या मोठ्या फलंदाजाला तातडीने संघाबाहेर काढणं दिसतं तेवढं सोपं नसल्याने कोहलीलाच आता आपल्या अपयशावर तोडगा काढावा लागेल. अन्यथा संघापुढे मोठा पेच निर्माण होऊ शकतो. वास्तविक सन २०२२ च्या टि२० विश्वचषकानंतर कर्णधार रोहित शर्मा व कोहलीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण या मोठ्या स्पर्धेत त्यांच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल या आशेने दोघांनाही संघात घेतले. पण कोहली त्याच्या लौकिका प्रमाणे कामगिरी करू न शकल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये त्याला बेस्ट बॅटरसाठीची ऑरेंज कॅप मिळाली होती. पण तो फॉर्म भारतातच विसरून कोहली वर्ल्ड कप आलेला दिसतो.
सध्या तरी भारतीय विराट कोहली फॉर्ममध्ये परतण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. सुपर एट टप्प्यात सहभागी होण्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजला पोहोचला असून संघाने येथे पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. सराव सत्रात कोहली, रविंद्र जडेजा आणि कुलदिप यादव यांनी खूप मेहनत घेतली. गुरुवारी किंगसन ओव्हलवर भारताचा पहिला सुपर एट सामना अफगाणिस्तानशी होणार आहे, त्यासाठी भारत पुर्ण तयारीने उतरेल हे नक्की.
१२ जून रोजी शेवटचा साखळी सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडू मैदानात उतरले नव्हते म्हणून सर्व खेळाडू सराव सत्रासाठी पोहोचले. खराब हवामानामुळे फोर्ट लॉडरडेलमध्ये कोणतेही प्रशिक्षण किंवा सामने शक्य नव्हते त्यामुळे खेळाडू सिझनचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी उत्सुक होते. तज्ञ आणि चाहत्यांना आशा आहे की सुपरस्टार कोहली जेव्हा सर्वात महत्त्वाच्या सामन्यात आपोआप चमकेल आणि संघाची गरज पूर्ण करेल.
मैदानावर वॉर्मअप केल्यानंतर, कोहली जडेजासह नेटवर पोहोचणारा पहिला होता. माजी कर्णधाराने कुलदिप आणि हार्दिक पांड्याचा सामना करण्यापूर्वी किमान ३० मिनिटे थ्रोडाउनचा सराव केला. जसप्रित बुमराहविरुद्ध त्याच्या पुलाचा सराव करण्यापूर्वी कोहली अतिरिक्त कव्हरवर लॉफ्टेड ड्राइव्हज खेळताना दिसला. जडेजाने नेट गोलंदाजाच्या लेग स्पिनविरुद्ध अतिरिक्त कव्हरवर स्लॉग स्वीप आणि इनसाइड आऊट ड्राइव्हचा प्रयत्न केला. जडेजानेही आतापर्यंत फलंदाजी किंवा गोलंदाजीत कोणतेही महत्त्वाचे योगदान दिलेले नाही. या स्पर्धेतला भारताचा सर्वोत्तम फलंदाज रिषभ पंतने बुमराह, हार्दिक, कुलदीप आणि अक्षर पटेल यांचा नेटमध्ये सामना केला. हार्दिकही फलंदाजीच्या सरावासाठी उतरला. सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनीही नेटमध्ये फलंदाजी केली. सिराज आणि अर्शदिप सिंगनेही भरपूर सराव केला.
चायनामन फिरकी गोलंदाज कुलदिपचे प्रकरण वेगळे आहे. कारण त्याला अद्याप अकरा जणांमध्ये स्थान मिळालेले नाही. तथापि कॅरेबियन खेळपट्टयांवर फिरकीपटूंना फायदा झाला आहे, तेथे त्याचे महत्त्वपूर्ण योगदान येण्याची अपेक्षा आहे. वेस्ट इंडिजमधील संथ खेळपट्टी लक्षात घेता भारत आपल्या अंतिम संघात काही बदल करू शकतो. कर्णधार रोहित शर्मा सहसा विजयी संघात बदल करत नाही, त्यामुळे संघ सुपर एटमध्ये कोणत्याही बदलांसह प्रवेश करतो की तीच जुनी इलेव्हन पुढे मैदानात उतरते हे पाहणे मनोरंजक असेल.
न्युयॉर्कच्या खेळपट्टीवर सातत्याने टीका झाली, आणि आता वेस्ट इंडिजमधील सहा ठिकाणी सामने खेळविले जाणार आहे. आयपीएलमध्ये २०० धावा सामान्य समजल्या जातात, परंतु हा आकडा वर्ल्ड कपमध्ये फक्त दोनदाच गाठला गेला आहे आणि तोही फक्त विंडीजमध्ये. अमेरिकेत १५० धावांचा पाठलाग करणेही सोपे नव्हते. हे पाहता, भारताचा कर्णधार रोहित शर्मा प्रत्यक्ष सामन्यापूर्वी संघाचे संयोजन कसे करतो हे महत्वाचे आहे. भारताला अफगाणिस्तानसोबत पहिला सुपर एट सामना खेळायचा आहे. त्यासाठी जरा जास्तच सतर्क राहावे लागेल. कारण अफगाणिस्तान संघ पूर्वीसारखा नवखा व कमकुवत नाही. चांगल्या संघाला लोळविण्याचे सर्व डावपेच त्यांच्याकडे आहेत हे त्यांनी साखळीत दाखवून देत न्युझिलंड सारख्या तगड्या संघाला स्पर्धेबाहेर फेकून त्यांनी ते सिद्धही केले आहे. त्यामुळे भारतीय संघ त्यांना हलक्यात घेण्याची चुक करणार नाही.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे.
क्रिकेट समिक्षक.
मो.नं. -९०९६३७२०८२