shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दक्षिण आफ्रिकेचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न पूर्ण



          टि२० विश्वचषक २०२४ चा पहिला उपांत्य सामना नऊ गडी राखून जिंकून दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ११.५ षटकात १० गडी गमावून केवळ ५६ धावा केल्या.  टि२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ८.५ षटकांत एक बाद ६० धावा केल्या आणि अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला.  सध्याच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि भारत हे दोनच संघ आतापर्यंत अपराजित आहेत.  दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.  यापूर्वी सन २०१४ मध्ये ते उपांत्य फेरीतूनच बाहेर पडले होते. 


            अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या ५७ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का फजल हक फारुकी याने अवघ्या पाच धावांवरच दिला.  त्याने क्विंटन डी कॉकला बोल्ड केले. यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांनी संघाची धुरा सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची नाबाद भागीदारी करत आपला उद्देश सफल केला.  सलामीवीर हेंड्रिक्स १९ तर कर्णधार मार्कराम २३ धावांवर नाबाद परतले.

              पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर केवळ ५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते.  या सामन्यात अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि संपूर्ण संघ आफिकन गोलंदाजांसमोर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.  अजमतुल्ला उमरजईने संघाकडून सर्वाधिक म्हणजे दहा धावा केल्या. उर्वरित फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.  दक्षिण आफ्रिकेने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले.  त्यांच्याकडून मार्को जेनसन आणि तबरेझ शम्सीने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर कागिसो रबाडा आणि ॲनरिक नॉर्किया यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.

             दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी अफगाणिस्तान विरुद्धचा पहिला उपांत्य सामना नऊ गडी राखून जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह संघाने चोकर्सचा डाग स्वतःच पुसून टाकला. आफ्रिकन संघ अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.  २९ जून रोजी बार्बाडोसमध्ये अंतिम सामना होणार आहे. ३२ वर्षात प्रथमच दक्षिण आफ्रिकेने आयसीसी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.  यापूर्वी त्यांनी आठ वेळा ( सन १९९२, १९९९, २००७, ०९, १४, १५, २३ आणि २०२४ ) उपांत्य फेरी गाठली होती जिथे त्यांना सहा वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते.  सन १९९९  मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला सामना बरोबरीत सुटला होता.  सदर लेखात टि२० वर्ल्ड कपमधील दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासा विषयी माहिती देत आहोत.

                 टि २० विश्वचषक २००७ च्या सुपर-८ चा शेवटचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने त्यांचा ३७ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.  रोहित शर्माच्या नाबाद ५० धावांच्या झंझावाती खेळीमुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत नऊ गडी गमावून केवळ ११९ धावाच करता आल्या.  भारताकडून आर पी सिंगने चार विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांचे कंबरडे मोडले.  ई गटात समाविष्ट असलेल्या दक्षिण आफ्रिकेने सुपर-८ मध्ये एकूण तीन सामने खेळले. यामध्ये त्यांना दोन जिंकावे लागले आणि एक पराभव पत्करावा लागला, तर ग्रुप स्टेजमध्ये त्यांनी त्यांचे दोन्ही सामने जिंकले.              ग्रुप स्टेजमध्ये दोन पैकी एक सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे.  तेथेही त्यांना तीन सामन्यांत केवळ एकच विजय मिळाला तर दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला.  दक्षिण आफ्रिकेला सुपर-८ च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानकडून दारूण पराभव पत्करावा लागला होता.  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने उमर अकमलच्या ५१ धावांच्या खेळीमुळे २० षटकांत ७ गडी गमावून १४८ धावा केल्या.  प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १३७ धावा करता आल्या.  या सामन्यात त्यांना ११ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

            सन २०१४  मध्ये दक्षिण आफ्रिकेने प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला.  मात्र, भारताने अंतिम फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या.  मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १७२ धावा केल्या.  प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या नाबाद ७२ धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारतीय संघाने १९.१ षटकांत चार बाद १७६ धावा केल्या आणि सहा विकेट राखून विजय मिळवला.  गट-१ मध्ये असलेल्या भारताने चारपैकी तीन सामने जिंकले होते. 

               सुपर दहाच्या ग्रुप- एक मध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेने चारपैकी दोन सामने जिंकले होते, तर दोनमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.  सुपर-१० च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय मिळवला होता. तरीही नेट रनरेट कमी असल्यामुळे ते पात्र ठरू शकले नाही. 

             विश्वचषक २०२१ च्या सुपर- बारा मधील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध जिंकला. असे असतानाही ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकले नाही.  या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २० षटकात २ बाद १८९ धावा केल्या.  प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १७९ धावाच करू शकला.  द.आफ्रिकन संघाने हा सामना दहा धावांनी जिंकला.  पाच सामन्यांमध्ये चार विजय मिळवूनही, त्यांची निव्वळ धावगती केवळ + ०.७३९ इतकी असल्यामुळे ते गट टप्प्यातूनच बाहेर पडले. 

               विश्वचषक २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा गट-२ मधील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सने १३ धावांनी पराभव केला. नेदरलँड्सने २० षटकात ४ बाद १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ८ गडी गमावून १४५ धावा केल्या. ग्रुप स्टेजवर त्यांना पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले होते.  त्याचवेळी त्यांना तीन पराभवांना सामोरे जावे लागले. 

              द. आफ्रिकेसाठी आताचा प्रसंग ताजा असून अंतिम फेरीत पहिल्यांदाच पोहोचण्याच्या आनंदाला विजेतेपदाची जोड लाभली तर या सारखा दुग्धशर्करा योग दुसरा कुठलाच असू शकत नाही. पण दुसरी उपांत्य लढत आयसीसी मानांकनातील अव्वल भारत व गतविजेता इंग्लंड यांच्यातील विजेत्याला नमविणं द.आफ्रिकेला आफगाणिस्तान एवढं सोपं जाणार नाही.

 डॉ.दत्ता विघावे - क्रिकेट समिक्षक.
 मो.नं. - ९०९६३७२०८२
close