shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अमेरिकेने दक्षिण आफ्रिकेला झुंजविले



             नववी टि२० विश्वचषक स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात सुपर-८ साठी वेस्ट इंडिजमध्ये पोहोचली असून अंतिम आठ संघांच्या या फेरीसाठी ब गटातील पहिल्या सामन्यात अँटिग्वा येथे सह यजमान अमेरिका व दक्षिण आफ्रिका यांच्यात ब गटातील पहिला सामना झाला. आपल्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत खेळताना नवख्या अमेरिकेने साखळी गटात नेत्रदिपक कामगिरी करून चक्क सुपर आठसाठी पात्रता मिळविली. तोच झकास कामगिरीचा सिलसिला त्यांनी या फेरीतही कायम ठेवला, मात्र खेळाच्या अंतिम पर्वात त्यांचा अनुभव कमी पडला व एक सनसनाटी निकाल नोंदविण्याची अमेरिकेची संधी हुकली. पण या सामन्यातील त्यांची लढण्याची जिद्द व दिलेली झुंज उपस्थितांचे मन जिंकून गेली.

             या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेचा अठरा धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या दक्षिण आफ्रिकेने वीस षटकांत चार गडी गमावून १९४ धावा केल्या.  प्रत्युत्तरात अमेरिकेचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावाच करू शकला. अमेरिकेच्या डावात कागिसो रबाडाने १९ व्या षटकात झुंजार खेळी करणाऱ्या हरमीतसिंगची विकेट घेत सामन्याला कलाटणी दिली. अमेरिकेला शेवटच्या दोन षटकात २८ धावांची गरज होती. त्यावेळी हरमीत आणि अँड्रिज घॉस मैदानात होते.

           १९ वे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हरमीत झेलबाद झाला. त्याने २२ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. त्याची घौससोबत ९१ धावांची भागीदारीही झाली.  मात्र, हरमीत बाद झाल्याने बाजी उलटली. रबाडाने १९ व्या षटकात टिच्चून मारा करताना दोनच धावा दिल्या. शेवटच्या षटकात अमेरिकेला विजयासाठी २६ धावांची गरज होती आणि संघाला केवळ सात धावा करता आल्या. घौसने ४७ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावा केल्या. याआधी दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डि कॉकने ७४ धावांची खेळी साकारली. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने हा सलग पाचवा सामना जिंकला.  टी-20 विश्वचषकात हि त्यांची सर्वाधिक सलग सामना जिंकण्याची मालिका आहे.  यापूर्वी सन २००९ च्या टी-20 विश्वचषकातही त्यांनी सलग पाच सामने जिंकले होते. 

                 क्विंटन डि कॉक आणि कर्णधार एडन मार्कराम यांच्यात दुस-या विकेटसाठी ६० चेंडूत ११० धावांची भागीदारी झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सुपर-८ सामन्यात चार गडी गमावून १९४ धावा केल्या. डि कॉकने ४० चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने केलेली ७४ धावांची खेळी प्रमुखआकर्षण ठरली.  मार्करामने ४६ धावा केल्या. एकवेळ १४१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. पण क्लासेनने नाबाद ३६ आणि स्टब्सने नाबाद २० धावा ठोकल्या या दोघांत ३० चेंडूत नाबाद ५३ धावांची भागिदारी झाली. त्यामुळे आफ्रिकेला १९४ धावांपर्यंत पोहोचता आले. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावलकरने २१ धावांत प्रत्येकी दोन आणि हरमीतने २४ धावांत दोन बळी घेतले.

                अमेरिकेचा कर्णधार ॲरॉन जोन्सने नाणेफेक जिंकली आणि आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुळचा मुंबईचा असलेल्या सौरभ नेत्रावलकरने पुन्हा एकदा चमकदार गोलंदाजी सुरू ठेवत रीझा हेंड्रिक्सला अकरा धावांवर बाद केले. दरम्यान क्विंटन डि कॉकने आफ्रिकेचा डाव पुन्हा रुळावर आणला. त्याने चौथ्या षटकात जसदिप सिंगच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि एक चौकार लगावला.  या षटकात एकूण २८ धावा निघाल्या.  पाचव्या षटकात डि कॉकने केन्झिगेला सलग दोन चौकार ठोकले. द.आफ्रिकेच्या ४.५ षटकांतच पन्नास धावा झाल्या होत्या. डि कॉक इथेच थांबला नाही, त्याने सहाव्या षटकात अली खानला मिड-विकेटवर आणखी एक षटकार मारला. 

              पॉवर प्लेमध्ये आफ्रिकेने एक बाद ६४ धावा केल्या. डिकॉकने मार्करामसोबत २७ चेंडूत अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. मार्करामनेही डि कॉकचा कित्ता गिरवत टेलरला सलग चौकार आणि षटकार ठोकले. डि कॉकने हरमीतला चौकार मारून आपले अर्धशतक २६ चेंडूत पूर्ण केले. या दोघांच्या फलंदाजीचा परिणाम म्हणजे दक्षिण आफ्रिकेने ९.५ षटकातच शंभर धावा पूर्ण केल्या.

               सह-यजमान अमेरिकेने लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या षटकात सलामीवीर स्टीव्हन टेलरची (२४ धावा) विकेट गमावली, त्याला कागिसो रबाडाने उंच फटका खेळण्यास प्रवृत्त केले आणि हेनरिक क्लासेनने त्याचा झेल टिपला. घौस एका टोकाला उभा होता. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात नितीश कुमार (८) रबाडाच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर कर्णधार ॲरॉन जोन्सला खातेही उघडता आले नाही आणि तो केशव महाराजचा (२४ धावांत १ बळी) बळी ठरला.  ॲनरिक नॉर्कियाने (३७ धावांत १ बळी) नंतर कोरी अँडरसनला १२ धावांवर त्रिफळाचित केले.

           शायान जहांगीर तीन धावांवर बाद झाल्यानंतर घौस आणि हरमीत सिंग ( ३८ धावा, २२ चेंडू, दोन चौकार, तीन षटकार) यांनी अप्रतिम खेळ केला, ज्यामुळे अमेरिकेच्या विजयाच्या आशा निर्माण झाल्या. रबाडाने १९ व्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या दोन धावा देत हरमीतची विकेट घेतली.  यासह या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ४३ चेंडूत झालेली ९१ धावांची भागीदारी संपुष्टात आली. या स्पर्धेतील सहाव्या विकेटसाठी अमेरिकेची ही सर्वोच्च भागीदारी आहे. हरमीतच्या बाद होण्याने अमेरिकेच्या आशाही संपल्या. 

              एवढी मोठी स्पर्धा प्रथमच खेळत असले तरी अमेरिकेचे खेळाडू बिलकुल दबावात दिसत नाहीत. उलट प्रस्थापित प्रतिस्पर्ध्यास अडचणीत आणत आहे. या सामन्यात भले त्यांचा निसटता पराभव झाला पण पुढील दोन सामन्यात त्यांनी जास्तीचा जोर लावला तर उपांत्य फेरीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडू शकतात.

लेखक - 
डॉ.दत्ता विघावे. 
क्रिकेट समिक्षक. 
मो.नं. -९०९६३७२०८२
close