shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आयर्लंडवरील विजयाने पाकची विश्वचषक सांगता



             कर्णधार बाबर आझमच्या शांत फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने अ गटातील शेवटच्या सामन्यात आयर्लंडचा तीन गडी राखून पराभव करून टी-२० विश्वचषकातील मोहिमेचा शेवट केला.  प्रथम फलंदाजी करताना गॅरेथ डेलेनीच्या ३१  व जोशुआ लिटलच्या नाबाद २२ धावांच्या जोरावर आयर्लंडने वीस षटकांत ९ गडी गमावून १०६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र कर्णधार बाबरने जबाबदारीने खेळताना ३४ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा करत कमकुवत संघाविरूद्ध हात साफ करून घ्यायची स्वतःची परंपरा जपली. याच खेळीच्या जोरावर पाकिस्तानने सात चेंडू शिल्लक असताना सात गडी गमावत १११ धावा करून कसाबसा विजय मिळवला. 

             पाकिस्तानसाठी शेवटच्या टप्प्यात शाहीन आफ्रिदीने पाच चेंडूत दोन षटकारांसह नाबाद १३ धावा करून विजय साकारण्यास हातभार लावला. आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने तीन बळी घेतले.  तत्पूर्वी, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत आयर्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात यश मिळवले होते.  वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी व फिरकी गोलंदाज इमाद वसीमने प्रत्येकी तीन बळी घेत आयर्लंडचा डाव उद्ध्वस्त केला. 

              बाबर आझमने ३२ धावांची खेळी खेळताना टी-२० विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्यात त्याने महेंद्रसिंग धोनीला मागे सोडले.  बाबरने विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून १७ डावांत ५४९ धावा केल्या आहेत, तर धोनीने २९ डावांत ५२९ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यमसन आहे, त्याने १९ डावात ५२७ धावा केल्या आहेत. 

              ...कसोटी दर्जा प्राप्त आयरिश संघाची विश्वचषक वारी कोरडीच राहीली. यंदा त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. आयर्लंडने चारपैकी तीन सामने गमावले, तर त्यांचा युनायटेड स्टेट्सविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेला, ज्यामुळे त्यांना एक गुण मिळवता आला.  अ गटात आयर्लंड तळाच्या पाचव्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानने चार सामन्यांतून दोन विजय आणि दोन पराभवांसह चार गुणांसह तिसरे स्थान पटकविले.

              लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि पॉवर प्लेमध्येच त्यांनी दोन गडी गमावले.  सर्वप्रथम मार्क एडायरने १७ धावा करून बाद झालेल्या सॅम अयुबला बाद केले. त्यानंतर बॅरी मॅकार्थीने मोहम्मद रिझवानला बाद करून पाकिस्तानला दुसरा धक्का दिला.  रिझवाननेही १७ धावा केल्या. रिझवान आणि अयुब यांनी पहिल्या विकेटसाठी २३ धावांची भागीदारी केल्याने पाक सहज लक्ष्याचा पाठलाग करेल असे वाटत होते, मात्र पहिला धक्का बसताच पाकिस्तानचा डाव गडगडला. पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानने दोन गड्यांच्या मोबदल्यात ४० धावा केल्या, विद्यमान विश्वचषकातील पहिल्या सहा षटकांमध्ये पाकची हि सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानने अमेरिकेविरुद्ध तीन गडी बाद ३०, भारताविरुद्ध एक बाद ३५ आणि कॅनडाविरुद्ध एक गडी गमावून २८ धावा केल्या होत्या. 

              मॅककार्थी आणि कर्टिस कँफर यांनी आयर्लंडला एकापाठोपाठ यश मिळवून दिल्यावर पाकिस्तानसाठी खरी समस्या पॉवर प्लेनंतर सुरू झाली.  ५२ धावांवर पाकिस्तानची तिसरी विकेट पडली. कँफरने फखर झमानला बाद करून पाकिस्तानला तिसरा धक्का दिला.  त्यानंतर मॅककार्थीने खाते न उघडता उस्मान खान (दोन धावा) आणि शादाब खान यांना बाद करत पाकिस्तानचा डाव खिळखिळा केला. त्यानंतर कँफरने चार धावांवर इमाद वसीमला बाद करून आयर्लंडला सहावे यश मिळवून दिले. अशाप्रकारे पाकिस्तानने अवघ्या  धावांत चार विकेट्स गमावल्या. 

             एक वेळ पाकिस्तानची धावसंख्या सहा बाद ६२ अशी होती तेंव्हा पाक संकटात सापडलेला दिसत होता. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दुसऱ्या टोकाकडून डावाची धुरा सांभाळत संयमी खेळी केली. बाबरने अब्बास आफ्रिदीसोबत सातव्या विकेटसाठी ३३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.  बाबर आणि अब्बास यांच्यातील भागीदारीनेच पाकिस्तानला संकटातून वाचवले, पण बेंजामिन व्हाईटने अब्बासला बाद करून पाकिस्तानला सातवा धक्का दिला. अब्बास २१ चेंडूत १७ धावा करून बाद झाला.  मात्र, बाबरने शेवटपर्यंत टिकून राहून संघाला सामना जिंकून दिला. शाहीन आफ्रिदीने षटकार मारून सामना संपवला. 

                तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  त्यां नंतर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात आयर्लंडला धक्का देत कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले.  शाहीनने अँड्र्यू बालबर्नीला शुन्य व लॉर्कन टकर (२) यांना बाद करून आयर्लंडला लवकर धक्का दिला.  अशाप्रकारे सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा शाहीन चौथा गोलंदाज ठरला आहे.  त्याच्या आधी अर्शदीप सिंग, रुबेन ट्रम्पलमन आणि फजलहक फारुकी यांनी ही कामगिरी केली आहे.  यानंतर स्वतःचे पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या मोहम्मद अमीरने एक धावेवर  कर्णधार पॉल स्टर्लिंगला बाद केले.  त्यानंतर शाहीनने शुन्यावरच हॅरी टॅक्टरला बाद करत आयर्लंडचा डाव खिळखिळा केला. शाहीनने सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात पॉवर प्लेमध्ये एकूण दहा षटके टाकली आणि पाच बळी घेतले. या काळात त्याचा नेट रनरेट ६.६ असा होता.

               आयर्लंडची सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यांचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या तीन धावा करून माघारी परतले.  टि२० विश्वचषकाच्या एका डावात पहिल्या चार फलंदाजांनी केलेली ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याच विश्वचषक स्पर्धेत युगांडाच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी न्युझिलंडविरूध्द दोन धावा केल्या होत्या, तर सन २००७ च्या  विश्वचषकात केनियाचे आघाडीचे चार फलंदाज न्युझिलंडविरुद्ध खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले होते. 

               आयर्लंडने पाकिस्तानविरुद्ध पॉवरप्लेमध्ये पाच विकेट्सवर ३२ धावा केल्या, हि टी२० विश्वचषकातील त्यांची चौथी नीचांकी धावसंख्या आहे.  या जागतिक स्पर्धेत आयर्लंडची सर्वात कमी धावसंख्या ही भारताविरुद्ध दोन गडी गमावून २६ धावा आहे, ती त्यांनी याच त्याने विश्वचषक स्पर्धेत केली आहे.  त्याचबरोबर सध्याच्या विश्वचषकाच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स गमावणारा संघ संयुक्तपणे तिसरा संघ बनला आहे. आयर्लंडशिवाय पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांनीही पॉवरप्लेमध्ये पाच विकेट गमावल्या.  युगांडाच्या संघाने दोनदा पॉवरप्लेमध्ये पाच गडी गमावले होते.

                आयरिश फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजीपुढे झुकत असताना डेलेनी आणि जोशुआ लिटल यांनी संयमी खेळी करत संघाला १०० धावांच्या पुढे नेले.  एकवेळ आयर्लंडची धावसंख्या सहा  बाद ३२ अशी होती. त्यानंतर डेलेनीने मार्क एडेरच्या साथीने सातव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केल्यामुळे संघाला काही प्रमाणात अडचणीतून बाहेर काढता आले. मात्र इमाद वसीमने पुन्हा एकदा डेलानी आणि अडायरला बाद करत आयर्लंडचा डाव खिळखिळा केला. डेलानीने १९ चेंडूत ३१ धावा केल्या, तर अडायर १९ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. आयर्लंडने ८० धावांत नऊ गडी गमावले होते आणि संघ शंभर पेक्षा कमी धावांत बाद होईल असे वाटत होते, परंतु लिटलने चांगली फलंदाजी करत १८ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २२ धावांची नाबाद खेळी केली.  टि२० विश्वचषकात दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फलंदाजाची ही संयुक्त दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. शेवटी आयर्लंडचा डाव १०६ धावांवर संपला. हि पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही संघाची पाचवा निच्चांकी धावसंख्या आहे.

               पाकिस्तानसाठी हा विश्वचषक वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. सर्वांना त्यांच्याकडून किमान सुपर आठ मध्ये पोहचावी अशी अपेक्षा होती. मात्र ती देखील त्यांना पूर्ण करता आली नाही. शेवटी आयर्लंडविरुद्ध तोही रडतखडत विजय मिळवत अपयशी वारीची विजयाने सांगता केली.

लेखक -.

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

मो.नं. -९०९६३७२०८२
close