shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कमी धावसंख्येच्या सामन्यात द. आफ्रिकेला हरविण्यात बांगलादेशला अपयश


              वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे एकाच वेळी सुरू असलेल्या नवव्या टि२० विश्वचषक स्पर्धेत अतिशय रोमहर्षक व रंगतदार लढती होत आहे. एरव्ही टि२० म्हंटलं की तोडफोड फलंदाजी बघायला मिळते मात्र या सर्धेतील चित्र जर वेगळंच आहे. नेहमी दिसणाऱ्या धावांच्या टोलेजंग इमारती, षटकार -चौकारांची आतिषबाजी येथे फारशी दिसत नाही. नेहमी फलंदाजांचे शिकार ठरणारे गोलंदाज मग ते फिरकी असो वेगवान नावाजलेल्या व टि२० स्पेशालिस्ट फलंदाजांवर वरचढ ठरत असून छोटे छोटे धावांचे लक्षही भलेभले संघ साध्य करू शकत नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे येथील खेळपट्टया व अतिशय मंद असलेले आऊट फिल्ड. फलंदाजांनी कितीही जोरकस मैदानी फटका खेळला तरी तो सिमारेषेपर्यंत सहज जात नाही.एक तर चेंडूला क्षेत्ररक्षक अडवतात किंवा चेंडू आपणहून थांबतो. त्यामुळे फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेलं टि२० क्रिकेट व खास करून विश्वचषक स्पर्धा याला अपवाद ठरत आहेत.


               भारताने ठेवलेले १२० धावांचे लक्ष पाकिस्तानला गाठता आले नव्हते. या घटनेला चोवीस घंटे उलटत नाही तोच दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांच्यातील दुसरा फलंदाजी करणारा बांगलादेश संघ ११४ धावांचे किरकोळ दिसणारे विजयी आव्हान पार करू शकले नाही. त्यामुळे बांगलादेशला या स्पर्धेतील एकूण पाचवा उलटफेर करण्याची संधी गमवावी लागली.

             दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर चार धावांनी विजय मिळवता. सन २०२४च्या विश्वचषकातला आपला सलग तिसरा विजय साधला.  या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिका सुपर- आठसाठी पात्र ठरले आहे. सध्या संघ गुणतालिकेत ते पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात सहा गुण आहेत.  त्याचवेळी बांगलादेशला दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या ते दोन गुणांसह ड गटात दुसऱ्या स्थानावर आहे. 

              न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांत सहा बाद एकशे तेरा धावा केल्या.  टि२० विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी सन २००७  मध्ये मायदेशातच भारताविरुद्ध त्यांनी २० षटकात ९  गडी गमावून ११६ धावा केल्या होत्या. या सामन्यात ११३ धावांवरच आफ्रिकेचे ताबूत थंडावले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकांत सात बाद १०९ धावाच करता आल्या. या सामन्यात केशव महाराजच्या फिरकीचा बळावर आफ्रिकेने चार धावांनी विजय मिळवला.

            अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी अकरा धावांची गरज होती. कर्णधार मार्करामने केशव महाराजवर विश्वास व्यक्त करत चेंडू त्याच्या हाती सोपविला. महाराजने पहिला चेंडू वाईड टाकला. त्यामुळे सहा चेंडूत दहा धावांचे लक्ष्य उरले. यानंतर महाराजने षटकातला पहिला वैध चेंडू टाकला ज्यावर महमुदुल्लाहने स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव घेतली. त्यानंतर बांगलादेशला पाच चेंडूत नऊ धावा हव्या होत्या.  दुसऱ्या चेंडूवर झाकेर अलीने जोरदार बॅट फिरवली ज्यावर त्याने दोन धावा चोरल्या. आता लक्ष्य ठरले चार चेंडूत सात धावांचे. महाराजच्या तिसऱ्या चेंडूवर झाकेर अली मार्करामकडे झेल देऊन बाद झाला.  यानंतर टस्किन अहमद क्रिझवर पोहोचला. तीन चेंडूत सात धावांचे लक्ष्य होते. महाराजने चौथा चेंडू बाहेरच्या बाजूला टाकला.  यामुळे संघाची एक धाव झाली.  आता लक्ष्य दोन चेंडूत सहा धावांचे झाले. महमुदुल्लाह पाचव्या चेंडूवर बाद झाला. मार्करमने त्याचा झेल घेतला. आता रिशाद नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचला. शेवटच्या चेंडूवर संघाला सहा धावांची गरज होती,  शेवटच्या चेंडूवर टस्किनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही.  पण त्याने एक धाव घेतली.  याबरोबरच महाराजने संघाला चार धावांनी विजय मिळवून देत बांगलादेशच्या स्वप्नांवर पाणी फेरले.  

            विजयासाठ ११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. नऊ धावांवरच रबाडाने त्यांना पहिला धक्का दिला. त्याने तनजीद हसनला डी कॉककरवी झेलबाद केले. त्याने केवळ नऊ धावा केल्या  यानंतर केशव महाराजने लिटन दासला आपला शिकार बनवले. त्यालाही फक्त नऊ धावाच करता आल्या. या सामन्यात कर्णधार नजमुल हसन शांतोने १४, शाकिब अल हसनने तीन, तौहीद हृदयने ३७, महमुदुल्लाहने २०, तर झाकीर अलीने आठ धावा केल्या. तर रिशाद हुसेन शून्य आणि तस्किन अहमदने एक धाव घेत नाबाद राहिला. या सामन्यात केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक तीन बळी घेतले. तसेच कागिसो रबाडा आणि ॲनरिच नॉर्किया यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.

             तत्पूर्वी बांगलादेशच्या घातक गोलंदाजी समोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज डावाच्या सुरुवाती पासूनच झुंजताना दिसले. फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आलेल्या रीझा हेंड्रिक्स पहिल्याच षटकात खाते न उघडता एलबीडब्ल्यू  झाला. तनझीम हसन साकिबने त्याला बाद केले. यानंतर तनझीमने  क्विंटन डि कॉकलाही आपला बळी बनवला. तो अवघ्या १८ धावा करून बाद झाला. आफ्रिकेला तिसरा धक्का एडन मार्करामच्या रूपाने बसला. तो २३ धावांवर टस्किन अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला.  त्याला केवळ चार धावा करता आल्या. पाचव्या षटकात तनझीमने पुन्हा एकदा आपली किलर बॉलिंग दाखवत ट्रिस्टन स्टब्सला बळी बनवले. तो खाते न उघडताच बाद झाला.  पॉवर प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने २५ धावांवर चार विकेट गमावल्या.  टि२० विश्वचषकातील पॉवरप्लेमधील ही त्यांची तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.  यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी डावाची धुरा सांभाळली.  या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी झालेली ७९ धावांची मोठी भागीदारी टस्किन अहमदने तोडली. त्याने क्लासेनला संघाच्या १०२ धावा असताना बोल्ड केले.  क्लासेनने ४६ धावांची झंझावाती खेळी केली. तर मिलर २८ धावा करून बाद झाला. या सामन्यात मार्को जेनसन आणि केशव महाराज यांनी अनुक्रमे पाच आणि चार धावा केल्या. दोघेही नाबाद राहिले.  बांगलादेशकडून तनझिमने तीन तर तस्किनने दोन गडी बाद केले.  त्याचवेळी रिशाद हुसेनला यश मिळाले.

लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो.नं. -९०९६३७२०८२
close