shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अमेरिकेचे आव्हान मोडित काढत भारत सुपर एटमध्ये



               वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसह सर्वच गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या उत्कृष्ट भागीदारीच्या जोरावर भारताने अमेरिकेचा सात गडी राखून पराभव करत सुपर एट फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने वीस षटकांत आठ गडी गमावून ११० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. पण त्यांनतर सुर्यकुमार आणि शिवमने संघाची धुरा सांभाळली आणि त्या जोरावर भारताने १८.२ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा करून विजय मिळवला. 

               या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. या सामन्याद्वारे भारताने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर आतापर्यंतचे सर्वोच्च लक्ष यशस्वीपणे गाठले. भारतातर्फे सुर्यकुमार यादवने ४९ चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या तर शिवम दुबे ३५ चेंडूंत एक चौकार व एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा करून नाबाद राहिला. विशेष म्हणजे सुर्याव दुबे आपल्या लौकिकाच्या विपरीत व परिस्थितीला अनुसरून खेळले. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने दोन बळी घेतले. 

             या सामन्यापूर्वी भारत आणि अमेरिका हे दोन संघ अ गटात अपराजित राहिले होते. भारताची निव्वळ धावगती गटात चांगली होती, त्यामुळे पुढील फेरी गाठणे जवळपास निश्चित मानले जात होते.  अमेरिकेने जर भारताला हरविले असते, तर पाकिस्तानचा प्रवास ग्रुप स्टेजमध्येच थांबला असता.  मात्र, भारताच्या विजयाने पाकिस्तानने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अ गटामध्ये भारत सध्या तीन सामन्यातील तीन विजयांसह सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर अमेरिकेचा संघ तीन सामन्यांतून दोन विजय आणि एक पराभवासह चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान तीन सामन्यांत एक विजय आणि दोन पराभव स्विकारून दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

           अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात विराट कोहलीला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. अमेरिकेविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना कोहली पहिल्याच चेंडूवर खाते न उघडताच बाद झाला व गोल्डन डकचा शिकार ठरला.  टि२० विश्वचषकाच्या सामन्यात कोहली शुन्यावर बाद होण्याची हि पहिलीच वेळ आहे. यंदाच्या टि२० वर्ल्ड कपमध्ये कोहलीची बॅट बिलकुल निस्तेज ठरत आहे.  पहिल्या तीन मॅचमध्ये कोहली निष्प्रभ ठरत असून तीन मॅचमध्ये त्याने फक्त पाच रन्स काढल्या आहेत. कोहलीने आयर्लंडविरुद्ध पाच चेंडूंत एक धाव आणि पाकिस्तानविरुद्ध तीन चेंडूंत चार धावा केल्या.  कोहलीपाठोपाठ सौरभने भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही परत पाठवले. तो सहा चेंडूंत केव तीन धावा काढून बाद झाला. 

              सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारतीय फलंदाज दडपणाखाली आले आणि पॉवर प्लेमध्ये त्यांना जास्त धावा करता आल्या नाहीत. भारताने अमेरिकेविरुद्ध पॉवरप्लेमध्ये दोन गड्यांच्या मोबदल्यात ३ धावा केल्या. टि२० विश्वचषकातील पॉवरप्लेमधील भारताची सहावी निच्चांकी धावसंख्या आहे. या जागतिक स्पर्धेतील पॉवर प्लेमध्ये भारताची सर्वात कमी धावसंख्या नागपूरमध्ये न्युझिलंड समोर चार बाद २९ इतकी होती.

              सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सुर्यकुमार यादवने यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसह संघाची जबाबदारी  स्विकारली. सुर्यकुमारने पंतसोबत तिसऱ्या विकेटसाठी २९धावांची भागीदारी केली. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेल्या पंतला अली खानने बोल्ड केले. तो २० चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह १८ धावा काढून बाद झाला. पंत बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या तीन बाद ३९ धावां अशी होती.  त्यावेळी अमेरिका आणखी एक उलट फेर करेल येर असे वाटत होते. परंतु सुर्यकुमारने शिवमसह दमदार कामगिरी करत संघाला संकटातून बाहेर काढले.  सुर्यकुमार आणि शिवम यांच्यात चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी झाली, ज्याच्या जोरावर भारतीय संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. 

               मागच्या दोनही सामन्यात फेल ठरलेल्या युर्यकुमार यादवने जबाबदारीने खेळ करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सुर्यकुमारने शिवम दुबेच्या साथीने केवळ डाव सांभाळला नाही तर शेवटपर्यंत टिकून राहून संघाला विजयापर्यंत नेले. सूर्यकुमारने १९ .व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने चेंडूत अर्धशतक झळकविले, की जे टि-२० विश्वचषकातील पाचवे सर्वात संथ अर्धशतक आहे.  या जागतिक स्पर्धेत सुर्यकुमार व्यतिरिक्त डेव्हन स्मिथ आणि डेव्हिड हसीने ४९ चेंडूत अर्धशतके झळकावली आहेत. टि२० विश्वचषकात सर्वात संथ अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे, त्याने याच स्पर्धेत न्यूयॉर्कमध्ये कॅनडाविरुद्ध अर्धशतक बनवायला ५२ चेंडू घेतले होते.

           भारताच्या डावात अमेरिकेला पाच धावांचा दंड ठोठावण्यात आला. वास्तविक या सामन्यात अमेरिकेचा संघ वेळेवर षटक सुरू करू शकला नसल्याचा प्रकार तिसऱ्यांदा घडल्याने त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. नियमांनुसार कोणत्याही संघाला आधीचे षटक संपल्यानंतर साठ सेकंदात पुढीलषटकाची सुरुवात करावी लागते, परंतु  असे तीनवेळा घडले. त्यामुळे अमेरिकेवर संघ वेळेवर कारवाई करण्यात आली.

              तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून अमेरिकेला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले, परंतु वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंगने सुरुवातीच्याच षटकात अमेरिकेला दोन धक्के देत कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले.  टिम इंडिया प्रथम गोलंदाजी करण्यासाठी उतरली तेव्हा पहिले षटक डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंगला देण्यात आले. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट घेतली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदिपने शायन जहांगीरला एलबीडब्ल्यू आऊट केले. जहांगीरला खातेही उघडता आले नाही. याच षटकात अर्शदीपने आणखी एक विकेट घेतली. त्याने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अँड्रिज गॉसला दोन  हार्दिक पांड्या करवी झेलबाद केले. हे दोन बळी घेताच अर्शदिपने विक्रम केला. टि२० विश्वचषकात सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला भारतीय आणि एकूण चौथा खेळाडू ठरला.

           सुरुवातीच्या धक्क्यानंतर अमेरिकेची फलंदाजी खूप दडपणाखाली आली आणि पॉवरप्लेमध्ये केवळ एका चौकारासह केवळ अठरा धावा केल्या. पहिल्याच षटकात दोन विकेट गमावल्यानंतर अमेरिकेची संपूर्ण जबाबदारी स्टीव्हन टेलर आणि ॲरॉन जोन्स या अनुभवी फलंदाजांवर येऊन पडली. चौथ्या षटकात जोन्सने सिराजला षटकार ठोकला. पाठोपाठ चौकारही मारला असे असतानाही भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये . वर्चस्व गाजवले.  पहिल्या सहा षटकांत दोन गडी गमावून अमेरिकेच्या फलंदाजांना केवळ १८ धावा करता आल्या.  टि२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताविरुद्ध पॉवरप्लेमध्ये केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे.  याआधी मीरपूर येथे सन २०१४ च्या स्पर्धेत भारताविरुद्धच्या पॉवर प्लेमध्ये वेस्ट इंडिजने विकेट न गमावता २४ धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर दोन बाद १८ हा अमेरिकेचा टि२० इंटरनॅशनलमधील पॉवर प्लेमधील सर्वात कमी स्कोअर ठरला.

              नितीश कुमार आणि स्टीव्हन टेलरने अशा खेळपट्टीवर स्थिर राहून फलंदाजी केली की, जेथे फलंदाजी करणे कठीण होते. अमेरिकेकडून नितीश कुमारने २३ चेंडूंत दोन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने सर्वाधिक २७ धावा केल्या तर टेलरने ३० चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने २४ धावा केल्या.  नवव्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या शिवम दुबेला टेलरने षटकार ठोकला. बाराव्या षटकात अक्षर पटेलला डावातील दुसरा षटकार मारल्यानंतर तो बोल्ड झाला.  यानंतर नितीशने हार्दिकलाही सरळ षटकार आणि चौकार मारले. तर न्युझिलंडकडून खेळलेल्या कोरी अँडरसनने (१५) अक्षरचा चेंडू प्रेक्षकांच्या दिशेने पाठवला.  शेवटच्या तीन षटकांमध्ये ३२ धावा गेल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने अर्शिदिपकडे चेंडू सोपवला आणि या गोलंदाजाने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या नितीशला परत पाठवले, त्याला मोहम्मद सिराजने झेलबाद केले.  नितीश बाद झाल्यानंतर अमेरिकेचा डाव पुन्हा एकदा फसला आणि मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. चार षटकात केवळ  ९ धावा देऊन ४ बळी घेणारा अर्शदिप सामनावीर ठरला. बुमराहा व सिराजला तुलनेने चांगलाच मार बसल्याने अमेरिकेला किमान शंभरी पार करता आली.

               आता भारत सुपर आठ साठी पात्र ठरला असला तरी कॅनडा विरुध्द १५ तारखेला त्यांना शेवटचा साखळी सामना खेळावा लागेल.

लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो.नं. -९०९६३७२०८२
close