shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अफगाणिस्तानचा फडशा पाडत भारताची सरशी


              वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदिप सिंग यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने टि२० विश्वचषकात सलग चौथा विजय नोंदवला.  भारताने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव करत सुपर एट टप्प्यातील गट एक मधील आपला पहिला सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना सुर्यकुमार यादवच्या दमदार  अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बुमराह आणि अर्शदिपने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, त्यांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला २० षटकांत १३४ धावांत गुंडाळले. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईने २० चेंडूंत दोन चौकार व एकाषटकाराच्या मदतीने सर्वाधिक २६ धावा केल्या. 


             या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आणि आपल्या फलंदाजांनी केलेली धावसंख्या राखण्यात ते यशस्वी ठरले.  आता शनिवारी भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे.  सुपर एटमधील गट १ मध्ये भारत दोन गुणांसह अव्वल स्थानावर आहे.  दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघ ठराविक अंतराने ते विकेट गमावत राहिले.  डिसेंबर २०२३ पासून भारताने टि२० मध्ये सलग आठ सामने जिंकले आहेत.  यापूर्वी, भारताने जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान एकूण नऊ सामने आणि नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान सलग १२ सामने जिंकले होते. 

               सुर्यकुमारने अफगाणिस्तानविरुद्ध २८ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने घणाघाती ५३ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर सुर्यकुमारला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.  सूर्यकुमारला टि२० मध्ये हा पुरस्कार मिळण्याची ही पंधरावी वेळ आहे. यासह सुर्यकुमारने टि२० मधील सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या विराट कोहलीची बरोबरी केली आहे. कोहलीने त्याच्या टि२० कारकिर्दीत इतक्याच वेळा सामनावीराचा पुरस्कारही जिंकला आहे. 

                अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी या सामन्यात चांगली गोलंदाजी केली, पण त्यांच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.  प्रथम, बुमराहने अफगाणिस्तानला सुरुवातीचे धक्के दिले, तर शेवटी अर्शदीपने त्यांच्या शेवटच्या आशाही धुळीस मिळवल्या.  अफगाणिस्तानने दुसऱ्याच षटकात अकरा धावा करून बाद झालेल्या रहमानुल्ला गुरबाजची विकेट गमावली. यानंतर संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. अफगाणिस्तानची धावसंख्या एकवेळ २३ धावांत तीन विकेट्स अशी होती.  मात्र, गुलबदीन नईबने अजमतुल्लासह मैदानाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदिप यादवने नईबला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली.  नईब १७ धावा करून बाद झाला.  त्यानंतर ओमरझाईला बाद करून जडेजाने अफगाणिस्तानला मोठा धक्का दिला.  या विश्वचषक स्पर्धेत कुलदिपचा प्रथमच प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. 

             या विश्वचषकात भारताला आपल्या सलामीच्या जोडीकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे, पण विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीला आतापर्यंत संघाला दमदार सुरुवात करून देता आलेली नाही. फजलहक फारुकीने रोहितला बाद करून भारताला पहिला धक्का दिला.  रोहित १३ चेंडू खेळून आठ धावांवर बाद झाला. या वर्षात टि-२० क्रिकेटमध्ये डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध रोहित बाद होण्याची ही आठवी वेळ आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर १९ डावात हिटमॅनने ९८ चेंडूंचा सामना करत १२८ धावा केल्या. या कालावधीत त्याची सरासरी फक्त १६  इतकीच आहे. सध्याच्या स्पर्धेत रोहितने एका अर्धशतकाच्या मदतीने ९९ धावा केल्या आहेत.

               या चालू विश्वचषकात लय शोधण्यासाठी धडपडणाऱ्या कोहलीची बॅट या सामन्यातही विशेष करू शकली नाही. कोहलीला २४ चेंडूत केवळ २४ धावाच करता आल्या. राशिद खानने त्याला आपला शिकार बनवले.  कोहलीने मागील डावाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली असली तरी त्याला फारशी छाप पाडता आली नाही. कोहलीच्या खराब फॉर्मने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली. त्याच्या बॅटमधून एक षटकार वगळता एकही चौकार आला नाही. अफगाणिस्तानचा कर्णधार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खानने त्याला नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आपला बळी बनवले.  टि२० क्रिकेटमध्ये कोहली राशिद खानची शिकार बनण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या दहा डावांमध्ये कोहलीने या २५ वर्षीय गोलंदाजाविरुद्ध ८५ चेंडूत केवळ १०८ धावा केल्या आहेत. यामध्ये तो तीन वेळा बाद झाला आहे. याआधी गेल्या तीन सामन्यांमध्ये कोहलीला केवळ पाच धावा करता आल्या होत्या.

              अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा डाव एक वेळ फसला होता, तेंव्हा संघाची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा अशी होती, पण सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या यांनी शानदार भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. सुर्यकुमारने तेराव्या षटकात अजमतुल्ला ओमरझाईच्या चेंडूवर दोन चौकारांसह भारताचे शतक पूर्ण केले. हार्दिक पांड्यानेही नवीन आणि राशिदला चौकार मारून इरादे स्पष्ट केले.  त्याने सोळाव्या षटकात नूरच्या सलग चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकारही ठोकला. सुर्यकुमारने पुढच्याच षटकात फारुकीच्या लागोपाठ चेंडूंवर षटकार आणि चौकार मारत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, पण पुढच्याच चेंडूला हवेत उडवत नबीने त्याचा झेल घेतला. या षटकात भारताच्या दिडशे धावाही पूर्ण झाल्या. हार्दिकने पुढच्या षटकात नवीनच्या चेंडूवर षटकार मारला पण नंतर तो ओमरझाईच्या चेंडूवर झेलबाद झाला.  रविंद्र जडेजानेही सात धावा केल्यानंतर फारुकीच्या चेंडूवर गुलबदिन नईबकडे झेल दिला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद होण्यापूर्वी अक्षर पटेलने नवीनच्या षटकात दोन चौकारांसह चौदा धावा ठोकल्या, त्याच्या मदतीने भारताला १८० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले.

            पण अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात बुमराहाला सामनावीराचा मान मिळाला नसला तरी त्याने फेकलेल्या २४ पैकी २० चेंडू निर्धाव होते व केवळ ७ धावा खर्चून त्याने ३ बळी घेतले तेथेच सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागणार हे स्पष्ट झाले होते. शेवटी भारताने या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांच्याशी दोन हात केल्या नंतर भारताची खरी स्थिती लक्षात येईल. 

लेखक - 
डॉ.दत्ता विघावे. 
क्रिकेट समिक्षक. 
मो.नं. -९०९६३७२०८२
close