shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दूध उत्पादकांचा अंत पाहू नका


२५ जून रोजी हजारो दूध उत्पादक रस्त्यावर उतरणार - शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांचा इशारा

शौकतभाई शेख / श्रीरामपूर 
श्रीरामपूर तालुक्यातील मौजे उंदीरगाव येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शेकडो सह्यांचे निवेदन श्रीरामपूर चे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना देण्यात आले आहे .

सदर निवेदनात राज्य शासनाने दूध प्रश्न तात्काळ लक्ष घालावे . अन्यथा दिनांक 25 जुन 2024 रोजी मौजे हरेगांव फाटा येथे ठिक  अकरा वाजता बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व दूध उत्पादक अनिल औताडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिंदे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी ठाकरे सरकारच्या काळात दुधाला 36 ते 40 रुपये दर होते. परंतु शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर व राज्याचे दुग्ध मंत्री यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्यानंतर दुधाचे दर 20 ते 23 - 24 रुपये इतक्या इच्छांकी पातळीवर आले. सदर दर हे 2011 -12 मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत होते. बारा वर्षानंतरही शेतकऱ्यांच्या दूध दरात वाढ न होता 15 ते 18 रुपयांनी दूध दर कमी झाल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात दुधाचे पडलेले दरामुळे शेतकरी आत्महत्यात वाढ झाली आहे हे दुर्दैवी तथा सरकारचे पाप आहे. तरी राज्य शासनाने शेतकऱ्यांना खोट्या अनुदानाची बोळवण व दिशाभूल न करता दूधास योग्य भाव द्यावा.
दूधास पूर्वी 38 ते 40 रुपये दर असताना त्यामध्ये भाव पाडल्याने 15 ते 18 रुपये प्रति लिटर तफावत निर्माण झाली त्या फरकासह किमान 40 रुपये प्रति लिटर दुधाला दर मिळावा अथवा सदर कमी झालेल्या दरामुळे निर्माण झालेल्या फरकाची रक्कम देता येत नसल्यास चाळीस रुपये अधिक पंधरा रुपये असे 55 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला भाव मिळावा अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. 
राज्यात गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या दूधाचे दर पंधरा ते अठरा रुपयांनी कमी झाले परंतु शासन मान्यता असलेल्या सिलिंग प्लांटच्या पॅकिंग दुधाचे दर आहे तेच आहेत त्यामुळे हा मधला 15 ते 18 रुपये प्रति लिटरचा फरकाची रक्कम कुठे गेली ?, हा ही एक मोठा प्रश्न आहे. जानेवारीमध्ये दुग्ध मंत्र्यांनी 30 टक्के राज्यात भेसळयुक्त दूध असल्याचे वक्तव्य केले होते, सदर बाबी मानवतेच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. सदर वक्तव्यामुळे शहरी ग्राहकांकडून पॅकिंग युक्त दूध वापरण्यास नापसंती दर्शवली जात आहे याचाही फटका दूध उत्पादकांना बसला. वास्तविक राज्य शासनाने व दुग्ध मंत्रालयाने सदर भेसळ करणाऱ्या सिलिंग प्लांट वर कठोर कारवाया करून तयार होणारे भेसळयुक्त दूध थांबवणे गरजेचे होते. परंतु तसे न होता मंत्री महोदयांनी फक्त वक्तव्य करून भेसळ युक्त दुधाला अप्रत्यक्ष मान्यता दिली असल्याचे समजावे का ?, अथवा भेसळयुक्त दुधाचा व पडलेल्या दाराचा नेमका मलिदा कोण खात आहे ?, असाही प्रश्न निर्माण होत आहे. 
दुधाचे दर कमी झाल्यानंतर खाद्याचे व जनावरांच्या औषधांचे, चाऱ्याचे भाव कमी न होता त्यामध्ये वाढत होत गेली. अशा परिस्थितीत दूध उत्पादकांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत आपला रोजी रोटी असलेला दूध धंदा टिकून ठेवला.
        दिलेल्या निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व दूध उत्पादक शेतकरी अनिल औताडे, शेतकरी संघटनेचे साहेबराव चोरमल, प्रकाशराव ताके, बाळासाहेब घोडे , अनिल रोकडे, सागर गिऱ्हे, प्रमोद भालदंड, अनिल भालदंडसह शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहे. तरी राज्य सरकारने दूध उत्पादकांबाबत तात्काळ न्याय भूमिका घ्यावी. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील उद्या दिनांक 11 जून 2024 पासून प्रत्येक गावातील शेकडो शेतकरी अशा प्रकारचे निवेदन देऊन 24 जुनंच्या 2024 च्या मोर्चासाठी हजारो शेतकरी येणार आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू हा नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर असणार आहे. तरी सरकारने दूध उत्पादकांचा अंत पाहू नये दूध उत्पादकांचे आंदोलन हे सरकारला व सरकारमधील मंत्र्यांना न परवडणारे असेल असा इशाराही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला असल्याचे औताडे यांनी म्हटले आहे.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111
close