shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पाकिस्तान क्रिकेटचा त्रिफळाच नाही तर पूर्ण फांगळा



            पाकिस्तान व खास करून क्रिकेट म्हंटलं की वादविवाद व सत्तेसाठी जुगलबंदी हे ठरलेलं समिकरण पक्क होऊन गेलं आहे. क्रिकेट बोर्डावर सत्ता मिळविणं असो की संघाचं कर्णधारपद मिळविणं असो येथे कुरघोडीवर कुरघोडी करण्यात प्रत्येक जण टपलेला असतो. कोणी कोणाची शिकार कशी करायची हे शिकावं तर पाकिस्तान क्रिकेटकडून ! एकमेकांच्या जिरवा जिरवीच्या राजकारणात ते पाकिस्तान क्रिकेटचं पर्यायाने पाकिस्तानचं नाव सुध्दा खराब करायला मागे पुढे पहात नाहीत. त्यांच्या संघात गटबाजी, धोकेबाजी, हितसंबंध या गोष्टींना प्राधान्यक्रम दिला जातो. खेळासाठी लागणारी तंदुरुस्ती, कौशल्यात सुधारणा, एकमेकात ताळमेळ, एकजुटता या बाबी तर त्यांच्यात औषधालाही शिल्लक नाहीत. 

            दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू व सन २०११ च्या वनडे विश्वचषक विजेत्या टिम इंडियाचे प्रशिक्षक गुरू गॅरी कर्स्टन यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सन २०२४ टि २० विश्वचषका पूर्वी एक महिना अगोदर संघाचे प्रशिक्षक नियुक्त केले. वास्तविक हि नियुक्ती वर्षभर आधी होणे गरजेची होती.  जेणे करून. संबंधितांना तयारीला पुरेसा अवधी मिळावा. परंतु दूरदृष्टीचा अभाव असलेल्या पीसीबीने तसं काही केलं नाही, आणि हो ते करतीलही कसे ? कारण मागील वर्षभरात एक दोन नाही तर तब्बल वेळा पीसीबीचे चेअरमन व बॉडी बदलली आहे. एवढा सगळा सावळा गोंधळ झाला तर त्यांच्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी कशी होणार ? त्यांचा विचकोबा झाल्याशिवाय राहाणार नाही.

             सध्या वेस्ट इंडिज व अमेरिकेत टि२० विश्वचषक स्पर्धा सुरू असून साखळी गटातच पाकिस्तानची वाट लागल्याने सुपर आठ पूर्वीच त्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला होता. तरीही त्या अगोदर त्यांचा शेवटचा साखळी सामना आयर्लंड सोबत खेळला गेला. दोन्ही संघ विश्वचषकातून आधीच बाहेर झालेले असल्यामुळे हा सामना तसा औपचारिकच  होता. फक्त स्वतःचा आत्मसन्मान वाचवणे हाच दोन्ही संघांचा मुख्य उद्देश होता.  प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने २० षटकांत ९ गडी गमावून १०६ धावा केल्या.  मात्र, एकवेळ आयर्लंडने बत्तीस धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. असे असतानाही त्यांनी शंभरी पार केली.  या सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.  कर्णधार बाबर आझम, गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान यांच्यात रिव्ह्यूबाबत मोठा गोंधळ होता. कोणालाच कोणावर विश्वास असल्याचं त्या परिस्थितीवरून ती तरी दिसत नव्हतं. रिव्ह्यू घ्यायचा की नाही हे कोणालाच समजत नव्हते. खुद्द आयसीसीने या गोंधळाचा व्हिडिओ शेअर करून पाकिस्तान क्रिकेटमधील कुटिल डाव चव्हाट्यावर आणले. ज्यावर पाकिस्तानने रिव्ह्यू घेतला, त्यांचा बॅट्समन नाबाद राहिला, तर ज्यांचा रिव्ह्यू घेतला गेला नाही, ते बॅटर बाद दिसलेले. एव्हाना रिव्ह्यू घ्यायचा की नाही, हे गोलंदाज आणि कर्णधाराला सांगण्याची जबाबदारी यष्टिरक्षकाची असते, पण रिझवान काही बोललाच नाही.  तसेच शाहीन बाबरवर दबाव आणतानाही दिसला नाही.  यावरून पाकिस्तान संघात सर्व काही ठिक नसल्याचे दिसून येते.

            ही घटना आयर्लंडच्या डावाच्या तिसऱ्या षटकात घडली. तेव्हा शाहीन गोलंदाजी करत होता.  ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शाहीनचा चेंडू कर्टिस कॅम्फरच्या पायाला लागला आणि तो फाइन लेगच्या सीमारेषेपलीकडे गेला. यावर शाहीनने जोरदार अपील केले, पण अंपायरने त्याला बाद दिले नाही. त्यानंतर शाहीनने बाबरवर रिव्ह्यू घेण्यासाठी दबाव टाकला. बाबरने तातडीने रिव्ह्यू घेतला. चेंडू,  खेळपट्टी आणि पायाच्या बाहेर गेल्याचे डीआरएसने दाखवले. अशा स्थितीत पाकिस्तानने रिव्ह्यू गमावला, पण कॅम्फर वाचला. यानंतर त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर हॅरी टेक्टर स्ट्राइकवर होता. चेंडू फलंदाजाच्या हातून चुकला आणि विकेटकीपर रिझवानकडे गेला. यावर शाहीननेही अपिल केले, पण रिझवानने त्याला साथ दिली नाही. शाहीन निराश होऊन गोलंदाजीला परतला. यानंतर मोठ्या स्क्रीनवरील पुनरावलोकनात असे दिसून आले की चेंडूने टेक्टरच्या बॅटच्या कडेला स्पर्श केला होता. मात्र रिव्ह्यू न घेतल्याने टेक्टर वाचला.  या षटकाचा शेवटचा चेंडू टेक्टरच्या पायाला लागला. शाहीनच्या अपिलवर पंचांनी त्याला एलबीडब्ल्यू आऊट घोषित केले.  तथापि टेक्टरने रिव्ह्यू घेतला नाही आणि नंतरच्या रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू पायाच्या बाहेर गेला होता. टेक्टरने रिव्हयू घेतला असता, तर तो वाचला असता, पण तसे झाले नाही.  यानंतर बाबरने धावत येऊन शाहीनला मिठी मारल्याचे दिसले.  मात्र, सुरुवातीच्या दोन्ही घटनांवरून बाबर, रिझवान आणि शाहीन यांच्यातील दुरावा स्पष्ट दिसत होता. 

             याआधी एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यामध्ये पाकिस्तानच्या टी२० विश्वचषक २०२४ मधून बाहेर पडण्यामागे गटबाजी कारणीभूत असल्याचे म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णधारपदी परतल्यानंतर बाबर आझमसमोर सर्वात मोठे आव्हान संघाला एकत्र आणण्याचे होते, परंतु गटबाजीमुळे तो तसे करू शकला नाही. शाहीन शाह आफ्रिदी कर्णधारपद गमावल्याने नाराज आहे आणि बाबर गरजेनुसार त्याला साथ देत नाही, तर मोहम्मद रिझवान कर्णधारपदासाठी विचार न केल्याने नाराज आहे. संघातील एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'संघात तीन गट आहेत.  एका गटाचे नेतृत्व बाबर आझम, दुसऱ्या कॅम्पचे नेतृत्व आफ्रिदी आणि तिसऱ्या टोळक्याचे नेतृत्व मोहम्मद रिझवान करत आहेत.

                या सर्व परिस्थितीत मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम सारखे वरिष्ठ खेळाडू संघात परतल्याने संघाची स्थिती बिकट आणखी झाली आहे. पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना विश्वचषकापूर्वीच संघाच्या समस्यांची चांगली जाणीव होती. त्यांचा जवळचा मित्र आणि राष्ट्रीय निवडकर्ता वहाब रियाझने त्यांना याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले, नक्वी यांनी सर्व खेळाडूंसोबत दोन-एक बैठका घेतल्या आणि वैयक्तिक हितसंबंधांऐवजी विश्वचषक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.  विश्वचषक स्पर्धेनंतर संघातील सर्व गैरसमज दूर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले, पण काही घडले नाही.

              आयर्लंडविरूध्दच्या सामन्यानंतर पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंची फिटनेस नसणे, अंतर्गत गटबाजी मोठया प्रमाण फोफावणे, संघनिष्ठा नसणे, एकजूट नसणे या बाबींवर दस्तुरखुद्द संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनीच मोहोर लावल्याने पाकिस्तानी संघात. दुफळी, त्रिफळी नसून संपूर्ण व्यवस्थेचाच फांगळा झाल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाकिस्तान संघाचेच नव्हे तर क्रिकेटचेच मोठे पोस्ट मार्टेम होण्याची शक्यता आहे. यातूनही जर काहीच निष्पन्न झाले नाही तर त्याच तिकीटावर तोच शो ठरलेला आहेच.

लेखक -.

डॉ.दत्ता विघावे.
क्रिकेट समिक्षक. 
मो.नं. -९०९६३७२०८२
close