shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

उपांत्य फेरीत इंग्लंडलाही भारत आस्मान दाखविणार ?


                वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेला टी-२० विश्वचषक २०२४ आता अंतिम शिखराकडे वाटचाल करत आहे.  सुपर-८ सामने संपले असून आता उपांत्य फेरीचे सामने २७ जून रोजी होणार आहेत. पहिला सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता होणार आहे.  तर दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात प्रॉव्हिडन्स येथे रात्री ८ वाजता होणार आहे.  या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे. 

                 मागील टी२० विश्वचषकात सन २०२२ मध्ये इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा दहा गडी राखून पराभव केला होता. जोश बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडने भारताचा दणदणीत पराभव दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे इंग्लंडने सोळा षटकातच पूर्ण केले होते. त्या वेळच्या तुलनेत विद्यमान भारतीय संघ सध्याच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. 

             भारतीय संघ सदर विश्वचषक स्पर्धेत जोरदार फॉर्मात असून अफलातून कामगिरी करत आहे. भारत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे आणि ग्रुप स्टेजनंतर त्यांनी सुपर एटमध्येही अव्वल स्थान पटकावले आहे.  दुसरीकडे इंग्लंडने अमेरिकेचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. याआधीही सन २०२२ मध्ये दोन्ही संघ अंतिम चारमध्ये आमने सामने आले होते. तेथे इंग्लंड विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरला होता.

             बाद फेरीत भारतीय संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जोश बटलरच्या सेनेचा सामना करताना दिसणार आहे. टी२० क्रिकेटमध्ये दोन्ही संघ २३ वेळा भिडले आहेत ज्यात भारताचा वरचष्मा आहे. टीम इंडियाने १२ सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने ११ सामन्यात विजयाची चव चाखली आहे.  त्याचवेळी टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडचा भारताशी चार वेळा सामना झाला आहे. त्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. 

            या सामन्यात भारताला पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्माकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची बॅट जोरात गरजली होती.  त्याच्या ९२ धावांच्या तुफानी खेळीने  स्टार्क आणि पॅट कमिन्सचा नक्षाच उतरवला होता. आगामी सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.  विराट कोहली रोहितसह सलामीला उतरणार आहे. मात्र या स्टार फलंदाजाचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. चालू स्पर्धेत आतापर्यंत त्याला सहा सामन्यात केवळ ६६ धावाच करता आल्या आहेत. त्यात दोन शुन्याचाही समावेश आहे. या स्थितीत पुन्हा एकदा यशस्वी जयस्वालला संघाबाहेर बसावे लागू शकते.  त्याला या स्पर्धेत अद्याप अंतिम अकराचा भाग बनवण्यात आलेले नाही. 

              यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर असेल. गेल्या सहा सामन्यांमध्ये त्याने १३२.५३ च्या स्ट्राईक रेटने १६७ धावा केल्या आहेत.  सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. सध्याच्या स्पर्धेत त्याने दोन अर्धशतकांच्या मदतीने १४९ धावा केल्या आहेत.  आगामी सामन्यात तो भारतासाठी सर्वात मोठी आशा असेल.  शिवम दुबे पाचव्या क्रमांकावर उतरेल.  या स्थितीत संजू सॅमसनलाही बाहेर बसावे लागू शकते.  त्याचवेळी उपकर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा एकदा सहाव्या क्रमांकावरच खेळताना दिसू शकतो. विद्यमान स्पर्धेत त्याने चेंडू आणि बॅटने चमकदार खेळ केला आहे.

               फिरकी विभागात रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदिप यादव हे संघात निश्चित असतील. या तिन्ही गोलंदाजांनी आपल्या मारक गोलंदाजीने वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्यांवर विशेष प्रभाव टाकला आहे. त्याचबरोबर जसप्रित बुमराहावर नेहमीप्रमाणे वेगवान गोलंदाजीची धुरा असेल तर अर्शदिप सिंग त्याच्या साथीला असेल तर हार्दिक पांड्याही चार षटके टाकताना दिसू शकतो. 

उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे अंतिम संघ असे असू शकतात. 

 भारत : - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराहा व अर्शदिप सिंग. 

इंग्लंड : - फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार व यष्टिरक्षक), जॉनी बॅररिअस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद व रीस टोपली.

              भारत मागील अकरा वर्षात सन २०२१ टी२० विश्वचषक सोडल्यास प्रत्येक वेळी आयसीसीच्या किमान उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पाच वेळा अंतिम फेरीही गाठली आहे. मात्र प्रत्येक वेळी नाशिबाचा फासा उलटा पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रतिक्षेनंतर देशवासीयांच्या विजेतेपदाच्या आशा पुर्ण करण्याची जबाबदारी या संघावर आहे. आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा हाच टिम इंडियाचा कर्णधार असल्याने त्याच्या नेतृत्वाचा कस या सामन्यात लागणार असून भारतासाठी शनिवार शुभ ठरेल अशीच तमाम देशवासीयांची अपेक्षा आहे.

लेखक - डॉ.दत्ता विघावे.

क्रिकेट समिक्षक.  मो.नं. -९०९६३७२०८२
close