shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अँडरसनच्या मॅरेथॉन कारकिर्दीची अखेर सांगता...


               क्रिकेट जेवढं मनोरंजक तितकंच कठोरही आहे. अनेक वर्ष जगभरातील क्रिकेट रसिकांना आनंद दिल्यानंतर एक दिवस त्यांना आपल्या आवडत्या खेळाचा निरोप घ्यावाच लागतो. अशीच वेळ इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनवर आली आहे. या चॅम्पियन खेळाडूची फेअरवेल टेस्ट पाहण्यासाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. जेम्स उर्फ ​​जिमी अँडरसनचा क्रिकेट प्रवास मोठा आणि यशस्वीही आहे.  भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक दोनशे कसोटी खेळण्याचा विक्रम आहे.  मात्र जिमी यापासून दूरच राहिला.  वेस्ट इंडीजविरुद्ध खेळलेली कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील १८८ वी कसोटी शेवटची ठरली. अनेक सामने खेळून इंग्लंडच्या या प्रमुख वेगवान गोलंदाजाने आपली कामगिरी आणखीनच मोठी केली. कसोटी क्रिकेटमधील अव्वल विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये फिरकीपटूंचे वर्चस्व असताना वेगवान गोलंदाजीचा झेंडा उंचावण्याचे श्रेय अँडरसनला जाते.

             आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या निवृत्तीमुळे सुवर्ण काळाचा अंत होणार आहे.  वयाच्या बेचाळीसाव्या वर्षापर्यंत वेगवान गोलंदाज म्हणून क्रिकेट खेळल्याने त्याची खेळाबद्दलची आवड दिसून येते.  क्रिकेटची मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर जेम्स आपल्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. कसोटी संपताच त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुवर्ण प्रवास संपला आणि त्याच्या नावापुढे 'माजी क्रिकेटर' असे लिहायला सुरूवात होईल.

                एकेकाळी, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे अव्वल तीन गोलंदाज (मुरलीधरन, वॉर्न आणि कुंबळे) हे फिरकीपटू होते, परंतु यांचे साम्राज्य मोडून काढत अँडरसन आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. शेवटच्या कसोटी पूर्वीच्या १८७ कसोटींमध्ये, त्याने २६.५२ च्या सरासरीने सातशे विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने बत्तीस वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत तर एका सामन्यात तीन वेळा दहा किंवा किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या.  डिसेंबर २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे कसोटी खेळून आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या जिमीने सप्टेंबर २०१७ मध्ये लॉर्ड्स येथे ४२ धावांत ७ बळी अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती. १९४ एकदिवसीय सामन्यात २६९ विकेट्स आणि १९ टि२० मध्ये अठरा विकेट्स घेतल्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय विकेट्सची संख्या ९८७ वर पोहचली होती. शेवटच्या कसोटीत चार बळी मिळाल्याने ती अखेर ७०४ वर स्थिरावली.

            आपल्या प्रदीर्घ कसोटी कारकिर्दीत तो इंग्लंडच्या १०९ खेळाडूंसोबत खेळला आहे.  कसोटीत सर्वाधिक संघ सहकाऱ्यांसोबत खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या ग्रॅहम गूचच्या नावावर आहे, जो सर्वाधिक ११३ संघ सहकाऱ्यांसोबत खेळला. त्याच्याच देशाचा फ्रँक वूली या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर (१११) आणि भारताचा सचिन तेंडुलकर (११०) तिसऱ्या स्थानावर आहे.  चौथ्या क्रमांकावर असलेल्या अँडरसन नंतर कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सहकाऱ्यांसोबत खेळणाऱ्या इंग्लंडच्या वॅली हॅमंडचे नाव येते.

            अँडरसन ज्यांच्यासोबत खेळला त्या इंग्लंडच्या प्रसिद्ध खेळाडूंमध्ये पॉल कॉलिंगवूड, अँड्र्यू स्ट्रॉस, इयान बेल, केविन पीटरसन, ॲलिस्टर कुक, मॅट प्रायर, स्टुअर्ट ब्रॉड, जोनाथन ट्रॉट, ग्रॅमी स्वान, गेरेंट जोन्स आणि मॉन्टी पानेसर यांचा समावेश आहे.  या सर्व क्रिकेटपटूंनी अँडरसननंतर पदार्पण केले आणि आधी निवृत्ती घेतली आहे. यातील काही खेळाडू आता विविध संघांचे प्रशिक्षक किंवा निवड समिती सदस्य म्हणून काम करत आहेत. कॉलिंगवूड हे इंग्लंडचे अंतरिम प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक राहिले आहेत, तर अँड्र्यू स्ट्रॉस यांनी इंग्लंड क्रिकेटच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.  त्याचप्रमाणे जोनाथन ट्रॉट हे सध्या अफगाणिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

            अँडरसनविरुद्ध खेळलेले इतर देशांचे बहुतेक खेळाडू निवृत्तीनंतर समालोचक, प्रशिक्षक किंवा निवडकर्ता म्हणूनही काम करत आहेत. इंग्लंडच्या या तेज गोलंदाजानंतर पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियाचा स्टुअर्ट लॉ सन २०२४ च्या टि२० विश्वचषकात यूएस संघाचा प्रशिक्षक होता.  त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेला ड्वेन ब्राव्हो अफगाणिस्तान संघाच्या प्रशिक्षक चमूचा घटक होता, तर काही काळापूर्वी मॉर्ने मार्केल पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये शोएब मलिक हा एकमेव असा क्रिकेटपटू आहे की, ज्याने अँडरसनपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अद्याप 'पूर्ण' निवृत्ती जाहीर केलेली नाही.  मलिकने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे पण तरीही त्याने स्वत:ला टि२० साठी पाकिस्तान संघासाठी उपलब्ध असल्याचे घोषित केले आहे. जेम्ससोबत क्रिकेट खेळणारे भारताचे अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांनीही राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून डाव खेळले आणि सेवानिवृत्तही झाले आहेत.

             भारताचा चेतेश्वर पुजारा त्याच्या भक्कम बचावासाठी ओळखला जातो, परंतु अँडरसनने त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक तेरा वेळा बाद केले आहे.  याशिवाय सचिन तेंडुलकर ९ वेळा अँडरसनचा बळी ठरला आहे.  सन २०१४ च्या कसोटी मालिकेत अँडरसनने विराट कोहलीलाही खूप त्रास दिला होता.  टिम इंडिया २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली तेव्हा अँडरसनने त्याच्या स्विंगिंग बॉल्सने विराटच्या तंत्राची खडतर परीक्षा दिली. विराटला या वेगवान गोलंदाजाने सहा पैकी चार डावात बाद केले. विराटसाठी ही मालिका खूपच निराशाजनक ठरली होती. या मालिकेत त्याला एकही अर्धशतक झळकविता आले नाही.  मात्र, यानंतर इंग्लंड आणि भारतामध्ये झालेल्या कसोटी मालिकेत विराट, अँडरसन आणि इंग्लंड संघाने बॅटने सडेतोड उत्तरे दिली आहेत.

            दुर्देवाची बाब म्हणजे निवृत्तीच्या दिवशी अँडरसनला शेवटच्या दिवशी गुडाकेश मोतीचा त्याच्याच चेंडूवर झेल घेता आला नाही याबद्दल खेद व्यक्त केला.  अन्यथा त्याच्या विकेट्सची संख्या ७०५ झाली असती. एरवी त्याला ७०९ बळींचा टप्पा पार करून शेन वॉर्नला मागे टाकून सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचता आले असते. मात्र नियतीच्या मनात जे असते तेच घडते आणि शेवटी नियतीपुढे सर्वांनाच मान झुकवावी लागते.

डॉ.दत्ता विघावे - 
क्रिकेट समिक्षक.
मो.नं. - ९०९६३७२०८२
close