________________________________
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:- केज येथील १३२ के. व्ही. विद्युत उपकेंद्रात बसविण्यात आलेला १० एमव्हिएचा ट्रान्सफार्मर पूर्ण क्षमतेने सुरू नव्हता. त्यामुळे परिसरातील पाच गावांना कमी दाबाने वीज पुरवठा सुरू होता. नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत होता. त्यांची अडचण लक्षात घेत आमदार नमिता मुंदडा यांनी पाठपुरावा केल्याने आवश्यक विद्युत साहित्य उपलब्ध झाले. आता पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा सुरू झाला आहे.
केज शहरातील १३२ के. व्ही. विद्युत उपकेंद्रातून शहरासह तांबवा, सोनीजवळा, पिसेगाव, कासारी, मैंदवाडी या गावांना विद्युत पुरवठा केला जातो. या उपकेंद्रात पूर्वीचा ५ एमव्हिएचा ट्रान्सफार्मर काढून १० एमव्हिएचा ट्रान्सफार्मर बसविण्यात आला होता. मात्र हा ट्रान्सफार्मर पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने या पाच गावाला कमी दाबाने विद्युत पुरवठा सुरू होता. त्यामुळे विद्युत पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊन वीज टिकत नव्हती. तर विजेची भारनियमन सुरू होते. अशा अडचणींचा सामना करणाऱ्या नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार नमिता मुंदडा यांनी ट्रान्सफार्मर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी लागणारे विद्युत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला.
त्यानंतर सिटी , कंडक्टर, केबल , रिले हे साहित्य उपकेंद्रास उपलब्ध करून देण्यात आले. विद्युत महावितरणकडून हे साहित्य बसवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले आले व आता विद्युत पुरवठा पूर्ण क्षमतेने सुरू केला आहे. आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न सुटला असून या गावांना पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा सुरू झाला असून यामुळे या पाचही गावांची भारनियमनातून मुक्तता झाली आहे .