shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

गांधीतीर्थ स्वच्छ शाळा”राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन


गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अजीजभाई शेख / राहाता:
जळगांव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने 'गांधीतीर्थ स्वच्छ शाळा' राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य परीक्षा नियंत्रक गिरीश कुुळकर्णी व राज्य समन्वयक डॉ.शरद दुधाट यांनी दिली आहे.


अहिंसक समाज निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या महात्मा गांधींचा विचार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने गांधी रिसर्च फाऊडेंशन या संस्थेमार्फत गांधी विचार संस्कार परीक्षा २००७ पासून घेण्यात येते. यावर्षी परीक्षेचे १८ वर्ष असून आजपर्यंत २२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. इ. ५ वी ते पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच शिक्षकही ही परीक्षा देऊ शकतात. मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड व इंग्रजी भाषांतून ही परीक्षा घेतली जाते. यात परीक्षार्थींना एक पुस्तक वाचण्यास दिले जाते. त्यावर आधारित परीक्षा घेण्यात येते. प्रत्येक इयत्तेतील जिल्हास्तरीय प्रथम ३ विद्यार्थ्यांना पदके व सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित केले जाते. विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या माध्यमातून ही परीक्षा देता येते. ही परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना खुली असून सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या परीक्षेमध्ये सहभाग घेऊ शकतात. शाळा व विद्यार्थ्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे, असेही त्यांनी कळविले आहे. 

ज्या शाळा गांधी विचार संस्कार परीक्षा घेऊ इच्छिता त्या शाळा 'गांधीतीर्थ स्वच्छ शाळा' प्रतियोगितेत सहभागी होऊ शकतात. यात शाळांना शाळा स्तरावर स्वच्छता समिती गठीत केली जाणार आहे. तसेच प्रत्येक वर्गाचीही स्वच्छता समिती असेल. शाळांनी आपली शाळा व परिसर नियमितपणे स्वच्छ ठेवण्यासाठीची रचना निर्माण करणे अपेक्षित आहे. विद्यार्थी, पालक व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन करणारे तसेच त्यांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. ऑगस्टपासून पूर्ण शैक्षणिक वर्षात या सर्व शाळांचे परीक्षण करण्यात येणार असून राज्यातील ५० स्वच्छ शाळांचे मानांकन करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाच्या शाळेला रु. १ लाखाचे बक्षीस देण्यात येणार असून ग्रामीण, शहरी व महानगरातील प्रथम तीन शाळांना अनुक्रमे रु. ३१,०००/-, रु. २१,०००/- व रु. ११,०००/- चे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. आपल्या जिल्ह्यातील ज्या शाळा, महाविद्यालयांना गांधी विचार संस्कार परीक्षेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी गांधीतीर्थ येथे परीक्षा नियंत्रक गिरीश कुलकर्णी व शरद दुधाट, श्रीरामपूर, ९८८१९४०८५२ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*वृत्त विशेष सहयोग* 
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close